एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धांत महाराष्ट्रात अनेक विख्यात संत झाले आहे. श्रीब्रह्मचैतन्य तथा गोंदवलेकर महाराज त्यात एक.
ह्यांचा जन्म माघ शुद्ध द्वादशी शके १७६६ (इ.स. १८४५) रोजी गोंदवले बुद्रुक या गावी झाला. हे गाव सातारा-पंढरपूर रस्त्यावर सातार्यापासून चाळीस मैलांवर आहे. श्री महाराजांचे मूळ नाव गणेश रावजी घुगरदरे आहे. त्यांचा घराचा व्यवसाय शेती वाडी असून कुळकर्णीपणाचे काम करीत असत. संपूर्ण घराणे सदाचारी व लौकिकवान होते. घरात विठ्ठलभक्ती, पंढरीची वारी असायची.
तल्लख बुद्धी, चांगली स्मरणशक्ती, पुढारीपण, निर्भयवृत्ती, एकांतप्रियता, रामनामाची गोडी ह्याचा समावेश त्यांच्यात होता. वयाच्या नवव्या वर्षी गुरूस शोधण्यास ते घर सोडून गेले. त्यांच्या वडीलानी त्यांना कोल्हापुरातून शोधून आणले. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. प्रपंचात चित्त नव्हते म्हणून ते पुन्हा गुरुस शोधायला घरातून निघून गेले.
त्यांनी अनेक थोर महापुरुषांच्या भेटी घेतला. पण त्यांना खरा गुरु काही सापडला नाही. ते उत्तर भारतात देखील गुरू शोधले पण यश मिळाले नाही. अखेरीस रामदास स्वामींच्या परंपरेतील एक थोर सत्पुरुष श्रीरामकृष्ण त्यांना हे भेटले. त्यांनी ह्यांना नांदेड जवळ येहळे गावी जाण्याचा सल्ला दिला. तिथे श्रीतुकाराम चैतन्य यांना भेटले. तिथे ह्यांनी नऊ महिने राहून त्यांची एकनिष्ठेने गुरु सेवा केली. ते तिथे देहबुद्धिविरहित व पूर्ण ज्ञानी झाले.
तुकाराम चैतन्यांनी त्यांचे 'ब्रह्मचैतन्य' असे नांव ठेवले आणि गृहस्थाश्रमी राहून लोकांना भक्तिमार्गाला लावण्याची आज्ञा केली. सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गोंदवलेकरांनी हजारों लोकांना रामभक्तीला लावले. त्यांचे शिष्य मध्यमवर्गीय असून महाराष्ट्र व कर्नाटकचे असून जास्त करून उत्तरभारतीय आहे.
त्यांची प्रथम पत्नी वारल्यावर त्यांनी जन्मांध मुलीशी लग्न केले. त्यांनी आपल्या घरात रामाचे देऊळ उभारले. तसेच अनेक ठिकाणीपण रामाचे देऊळ उभारून उपासनकेंद्रांची स्थापना केली. त्यांनी व्यक्तिगत उपदेश, प्रवचन, भजन, कीर्तन या माध्यमाने कौटुंबिक कलह मिटवून अनेकांचे संसार सुखी केले. तसेच अनेक लोकांना व्यसने, दुराचरण, दुराभिमान, सांसारिक काळजी ह्या पासून मुक्त केले. त्यांचा लोकसंग्रह खूप मोठा होता.
घोर गरिबांना त्यांनी आश्रय देऊन आधार दिला. दुष्काळ ग्रस्तांना अन्न, वस्त्र, निवारा देऊन काम दिले. गोरक्षण, अन्नदान केले, उद्योग लावले. नामजप, भजन सप्ताह, तीर्थयात्रा करून प्रापंचिकांना परमार्थात लावले. लोकांमधील अश्रद्धा घालवून त्यांना धर्माबद्दलची भक्ती व आदर उत्पन्न केले. धर्म जागृतीचा प्रसार केला. नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ साधन आहे, याची जाणीव करुन दिली.
त्यांनी हे कळकळीने व बुद्धीला पटेल अश्या रीतींने सांगितले. त्यांनी अनेक चमत्कार केले आहे. त्याचा मधील एक मोठा चमत्कार म्हणजे पापी लोकांना सद्भक्ती आणि सन्मार्गावर लावणे. लोकांना नाम स्मरणाला लावून प्रपंच व परमार्थाचे मिलन कसे होईल हे त्यांनी शिकवले. ह्या साठी त्यांनी खूप धडपड घेतली.
मार्गशीर्ष वद्य दशमी शके १८३५ (२२ डिसेंबर १९१३)च्या दिवशी गोंदवले मुक्कामी त्यांनी देहत्याग केले. गोंदवलेला त्यांचे समाधी मंदिर बनवले आहे.