अनघाष्टमी व्रत माहीती आणि पूजा विधी

गुरूवार, 5 डिसेंबर 2019 (14:35 IST)
श्री दत्तगुरु अवधूत स्वामींच्या रुपांमध्ये प्रसिद्ध झालेल्या या लिलामूर्तीचे एक गृहस्थ रुप पण आहे. नित्य अनेक रूपांत प्रकट होणारे स्वामी गृहस्थ रुपांत मात्र अनघास्वामी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पत्नीचे नाव अनघा देवी आहे. त्या साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे. हे दांपत्य नित्य तपोमय जीवनाने भक्तांना ऐहीक सुख, तत्वघ्यानाद्वारा अनुग्रहीत करतच असतात. ह्या दिव्य दांपत्याच्या अष्ट सिद्ध मुलांचा अवतारही झाला आहे.
 
पद्मासनस्थां पदयुग्मनूपुरां पद्मं दधानाममयं च पाण्यो:।
योगार्थे संमीलिता निश्र्चलाक्षींदत्तानुरक्ताम् अनघां प्रपद्ये॥
 
या अनघ दंपतिची उपासना पद्धती, कृतयुगांत साक्षात दत्त सद्गुरुंनी आपला प्रिय भक्त कार्तवीर्यार्जुनाला स्वत: सांगितली, ह्याचे विवरण व्यासलिखीत व रचित दत्तपुराणामध्ये आहे. या युगात या उपासनेचा. व्रताचा प्रचार केल्याने कार्तवीर्य चक्रवर्ती होऊन त्याने एका स्वर्णयुगाचे निर्माण केले. त्रेतायुगांत प्रभु श्रीराम व दशरथ महाराज यांनी हे व्रत आचरण केले. ह्याचा पुराणांत उल्लेख केला आहे.
 
हे व्रत केवळ मार्गशीर्ष कृष्णा अष्टमीस व श्रीपाद चारितामृतात प्रत्येक महिन्याच्या कृष्णाष्टमीस अनघाष्टमी मानून हे व्रत करण्यास सांगितले आहे.
 
श्री दत्त म्हणजे अघा पापांचा नाश करणारे हे पंचमाश्रमी आहेत. गृहस्थमाचे आचरण ही त्यांनी केलेले आहे. अत्रिपुत्र दत्त हे अनघा दत्त आहेत व त्यांची पत्नी अनघा लक्षमी रूप आहे. या दाम्पत्यास 'निमी , ह्रिमान, किर्तीमान, जितात्मा, मुनींवीर्यक, दिप्तीरोम, अंशुमन, शैलाभ अशी आठ मुले आहेत. यांचे पूजनात्मक श्री कर्तवीर्यराजा ने प्रथम केले. व पृथ्वीवर त्याचा प्रसार केला, या अनघा-दत्तव्रताच्या प्रभावानेच कार्तवीर्य आदर्श, महाशक्तिशाली राजा झाला.
 
अनघालक्ष्मीचा ‘अनघ’ हे दत्तस्वरूप आहे. अर्थातच श्रीदत्तमूर्ती ही त्रिगुणात्मक त्रैमूर्ती आहे. तिच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देव व त्यांच्या शक्ती एकवटलेल्या आहेत. म्हणून महासरस्वती, महालक्ष्मी व महाकाली या तिन्ही तत्त्वांचे मिळून एक आगळे दिव्य मातृस्वरूप आहे व तोच अनघालक्ष्मीचा आविर्भाव आहे म्हणून अनघालक्ष्मी ही महासरस्वती, महालक्ष्मी व महाकाली या तिघींनी धारण केलेल्या शक्तीचे प्रतीक आहे. अनघ हे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या एकत्रीकरणाचे तादात्म्य धारण करून व्यक्त केलेले शक्तिस्वरूप आहे. या शक्तिस्वरूपाचा अनघालक्ष्मी हा आधार आहे. ती एक दिव्यशक्ती आहे. या दिव्यशक्तीला अनघदेवाने वामभागी धारण केले आहे.
 
पूजाविधी 
पूजा स्थळ स्वच्छ करुन चौरंग अथवा पाटावर वस्त्र घालून त्याभोवती रांगोळी काढावी. त्यावर मध्यभागी एकमूठ तांदूळ घालून पूर्वेपासून आठ दिशेस एक एक मूठ तांदूळ घालावे. त्यानंतर मध्यभागी शुद्धपाण्याने भरलेला कलश ठेवावा. कळशाला पाच हळदी, कुंकवाची बोटे ओढावीत. त्यामध्ये गंध, अक्षता, फूल, सुपारी-नाणे व आंब्याचा डहाळा घालावा, त्यावर तांदळाने भरलेले ताम्हाण ठेऊन त्यात अनघदत्तमूर्ती ठेवावी. या दत्तपीठाच्या डावीकडे चौरंगावर एकमूठ तांदूळ घालून त्यावर गणपतीची सुपारी, समोर पाच विडे, केळे, फळ मांडावे. गूळसाखर व 2 नारळ ठेवावे. 
 
नंतर शास्त्रविधानानुसार मध्यभागी ताम्हणातील मूर्तीवर श्रीअनघादत्ताचे आवाहन करावे, कलशाभोवती आठ दिशेस ठेवलेल्या तांदळाच्या पुंजावर अणिमादि अष्टसिद्धीस्वरुप अष्टदत्तपुत्रांचे आवाहन करावे. यानंतर श्रीअनघासहित श्रीअनघदत्ताय नमः ॥ या मंत्राने श्रीअनघादत्त, अणिमादि दत्तपुत्र व व्रतसूत्र इ. देवतांचे पूजन करावे व श्रीदत्तदेवासं तु़ळ्सीपत्राने व श्रीअनघामातेस कुंकवाने शतनामार्चन करावे.
 
श्री अनघदत्तात्रेयांच्या मुर्तीजवळ लालदोरा ठेवावा. (व्रतसमाप्तीनंतर तो पुरुषांनी उजव्या मनगटात तर स्त्रियांनी डाव्या मनगटात बांधावा.) पुढील अनघाष्टमी पूजेवेळी पहिल्यापूजेचे सूत्र काढून निर्माल्यात विसर्जित करावे.
 
व्रताच्या दिवशी उपवास करावा, दिवसभर केवल फलाहार अथवा उपवासाचे पदार्थ खावेत. सायंकाळी  आरतीनंतर भोजन करावे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती