भागवत पाठ आणि भाव जागृती

एक पंडित राजाकडे जाऊन म्हणाला की, ‘महाराज, मी आपणास भागवत ऐकवू इच्छितो, आपण ते ऐकावे.’ राजा त्याला म्हणाला, ‘महाराज, अजून आपलला भागवत नीट समजलेले नाही. अजून चांगल्याप्रकारे पठण करून नंतर यावे.’ पंडित खूप चिडला व तेथून निघाला. त्याने  विचार केला की, राजा बुद्धिहीन आहे. मी इतक्या वर्षापासून भागवताचे पाठ करीत आलो तरी अजून पाठ करून या असेच म्हणतो. घरी येऊन पुन्हा पंडितजी पाठ करीत होते. मनात विचार आले. राजा खरोखरच मूर्ख आहे. या भागवतात समजण्यासारखे मला काही राहिलेले नाही. काही दिवसानी पंडित पुन्हा राजाकडे गेला. राजाने पुन्हा तेच उत्तर दिले. पंडित बिचारा राजापुढे का बोलणार? तो मनातूनच राजावर खूप रागावून घरी आला. पण आता त्याच्या मनात वेगळा विचार चालला होता. त्याने विचार केला, राजा सतत तेच सांगत आहे यात काही तथ्य असावे. पुन्हा पंडिताने पोथी पुढे ओढली. पठण आरंभले. आज वाचत असताना नवे नवे भाव जागृत होत होते. तो एकटाच खोलीत बसून वाचन करीत असे. तर तो भक्तिभावाने व्याकूळ बनून त्याच्या डोळतून अश्रू वाहू लागले. राजभवनात जाण्याचा विचार त्याने केव्हाच सोडला होता. 
 
तो पंडित अलीकडे आला नाही हे राजाला कळून आले. मग राजा स्वत:च उठून त्या पंडिताच्या घरी गेला. पंडितजींचे भागवत पठण चालू होते. डोळतून अश्रू ओघळत होते, ते पाहून राजा म्हणतो, पंडितजी आपले भागवत पठण योग्य प्रकारे चालले आहे. आता मी आपल्याकडून भागवत ऐकेन. श्रीरामकृष्ण कथित बोधकथेतील हा प्रसंग. 

वेबदुनिया वर वाचा