करा समाधान चित्त माझे।

गुरूवार, 8 जानेवारी 2015 (17:38 IST)
महापुरुष या जीवाला उपदेश करताना सांगतात की, प्रत्येक जीवामध्ये परमात्मा राहतो, प्रत्येक जीव म्हणजे भगवंताचं राहण्याचं ठिकाण आहे. प्रत्येक रूपात भगवंतच अवतरित होतात असा मनाचा निश्चय करून प्रत्येक जीवाने या भूमंडलावर असणार्‍या सर्व जीवांचा सन्मान करणे हे आपले आद्य कत्वर्य आहे. कोणताच जीव हीन नाही, कमी नाही याकरीता दुसर्‍या जीवाला तुच्छ समजू नका. दुसर्‍यामधील व्यंग, कमीपणा व दोष न पाहता या सर्व दोषापासून मी मुक्त आहे कां? हे दोष माझ्यात नाहीत ना याची चाचपणी नेहमी जीवांनी करीत जावी तरच एकेक पारी चढत चढत आपण आपल्या इच्छित मुक्कामी पोहोचू. इतर जीवांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करून आपले अंत:करण भावशुद्ध व स्वच्छ करण्याचा जीवापाड प्रयत्न करावा. अल्पज्ञ असणारा हा जीव सर्वज्ञ असणार्‍या प्रभूच्या चरणकमली बसून त्याच्यापर्यंत कसे जाता येईल, याचा धस घेऊन आपल्यामधील एकेक दोषाचा पाढा आर्त स्वरूपात म्हणावा म्हणजे या अनाथ जीवाची दया येऊन आपल्यावर   भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. श्री तुकोबारा आपल्या नामाच अभंगात या जीवाने देवाची कशी प्रार्थना करावी ते सांगतात. 
 
‘आता मज धरवावी शुद्धी। 
 
येथून परतवावी बुद्धी।।
 
घवे सोडूवनि कृपानिधी। 
 
सांपडलो संधी काळचक्री।।
 
करिसील तरी नव्हे काई। 
 
राईचा डोंगर पर्वत राई।
 
आपुले करूणेची साई।
 
करी वो आई मजवरी।।’ 
 
हे देवा आजवर माझे जीवन या मायाजाळ प्रपंचाच्या मोहात व्यर्थ गेले आहे. माझ या दुर्बुद्धीला सद्विचार देऊन मला या संसारपाशातून सुटण्यासाठी कृपा करा. ‘मी पुनरपि जननं पुनरपि मरणं’ अशा दुष्ट कालचक्रात अडकलेलो आहे, त्यातून सोडव. देवा तू जर मनात आणशील तर मोहरीचा डोंगर आणि डोंगराची मोहरीदेखील होते. म्हणून हे आई माझ्यावर करुणेची सावली करून या दु:खातून मुक्त कर. जे जे महापुरुष भेटतात त्यांना लीनतेने एकच प्रश्न विचारावा की हे संतसज्जन हो, माझा उद्धार कशाने होईल, भगवंत माझ्यावर कृपा करतील का? या माझ्या प्रश्नांची उत्तरे सांगा. 
 
‘काय मी उद्धार पावेन। काय कृपा करील नारायण। ऐसे तुम्ही सांगा संतजन। करा समाधान चित्त माझे।।’ किंवा ‘पुसावेसी हेचि वाटे। जे जे भेटे तयासी।। देव कृपा करील मज। काय लाज राखील।। अवघियांचा विसर झाला। हा राहिला उद्योग।। तुका म्हणे चिंता वाटे। कोण भेटे सांगेसा?।।’ 
 
श्री तुकोबारा या अनाथ जीवाच्या भूमिकेतून जे कोणी संत महात्मे भेटतील त्यांना माझ्यावर देवाची कृपा कशी होईल, हाच प्रश्न विचारा असे सांगतात. इतर सर्व सामान्य विषयांचा विसर पडलेला असून देवाची कृपा माझ्यावर कशी होईल ही एकच चिंता मी सदा सर्वकाळ करीत आहे. त्या महानुभावाच्या शोधात मी असून तेवढा एकच उद्योग माझ्याकरिता राहिला आहे, असे श्री तुकोबाराय या जीवाला आपल्या  उद्धाराच्या शोधात राहणेविषयी जागे करतात. 
 
काशीनाथ सर्जे 

वेबदुनिया वर वाचा