अधिक मास- विष्णू कृपेचा महिना

पुरूषोत्तम मास अर्थात अधिक मास चार वर्षांत एकदा येतो.  बुधवार, १७ जून २0१५ पासून सुरू होणारा आषाढ महिना हा अधिक महिना म्हणून आला आहे. आपल्या पंचांगात येणारा अधिक महिना हा धार्मिकदृष्ट्या जितका महत्त्वाचा आहे, त्यापेक्षा पंचांगकर्त्या पूर्वजांच्या बुद्धिमतेचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून महत्त्वाचा आहे. येणारा आषाढ हा अधिक आषाढ म्हणूनच नव्हे, तर तो अठरा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीने आला आहे. म्हणून या महिन्याचे महत्त्व अधिकच आहे. धार्मिक व पुण्य कार्ये करण्यासाठी हा महिना विशेष उपयुक्त आहे. अधिक पुण्य गाठीला बांधण्यासाठी या महिन्याचा उपयोग करून घ्यावा.
 
श्राद्ध, स्नान व दान ही तीन कर्मे प्रामुख्याने या महिन्यात होतात. पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासह अनेक पुण्यफल देणारा हा महिना आहे.

मुक्ती मिळविण्यासाठी मनुष्यजीव आयुष्यभर काही ना काही करत असतो. पण तरीही त्याला मुक्तीचा मार्ग काही मिळत नाही. तो मार्ग जाणून घेण्यासाठी अधिक मास उपयुक्त आहे. भगवान विष्णूंचे स्मरण केल्यास हा मुक्तीचा मार्ग सापडू शकतो. त्यासाठी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे, गणपती अथर्वशीर्षाचे आवर्तन करणे केव्हाही चांगले.

भागवत वाचणे हाही पुण्यफल मिळविण्याचा एक मार्ग आहे. कारण भागवताचे महात्म्य अपार आहे. त्यातही अधिक मासात ते वाचणे अधिक पुण्यदायी आहे. विष्णूनेच अधिक मास पुण्य कमाविण्यासाठीच तयार केला आहे. हिरण्यकश्यपूला बारा महिन्यात कधीच मरणार नाहीस असे वरदान मिळाले होते. त्यामुळे त्याला मारण्यासाठी हा अधिक मास विष्णूने निर्माण केला होता. नरसिंह अवतार घेऊन विष्णूने हिरण्यकश्यपूला संपवले होते. त्यामुळे सहाजिकच हा मास त्याच्या स्तवनाचा आहे. विष्णूचा जप या महिन्यात करावा. या जपाने नक्कीच मुक्ती मिळू शकते.

वेबदुनिया वर वाचा