Gudi Padwa 2023: गुढीपाडवा माहिती मराठी, संपूर्ण पूजन विधी Gudi Padwa Puja Vidhi
बुधवार, 22 मार्च 2023 (07:43 IST)
Gudi Padwa Puja Vidhi हिंदूंचा वर्षारंभाचा दिवस म्हणजे वर्ष-प्रतिपदा. या दिवसाला गुढीपाडवा म्हणतात. गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदय झाल्यावर गुढीचे पूजन करून गुढी उभारण्याची पद्धत आहे. शास्त्रानुसार गुढीचे पूजन कसे करावे हे जाणून घ्या-
पूजाविधी-
सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः ।
आचमन-
डाव्या हातात पळी घेऊन उजवा हात उताणा धरावा. पळीने उजव्या हातावर पाणी घ्यावे आणि पुढील नावे घेत कृती करावी-
श्री केशवाय नमः ।
(पाणी तोंडात घ्यावे)
श्री नारायणाय नमः ।
(पाणी तोंडात घ्यावे)
श्री माधवाय नमः ।
(पाणी तोंडात घ्यावे)
श्री गोविंदाय नमः ।
(असे म्हणत उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे)
हात पुसून घ्यावे आणि हात जोडावे आणि म्हणावं-
श्री विष्णवे नमः । श्री मधुसूदनाय नमः । श्री त्रिविक्रमाय नमः । श्री वामनाय नमः । श्रीधराय नमः । श्री हृषीकेशाय नमः । श्री पद्मनाभाय नमः । श्री दामोदराय नमः । श्री संकर्षणाय नमः । श्री वासुदेवाय नमः । श्री प्रद्युम्नाय नमः । श्री अनिरुद्धाय नमः । श्री पुरुषोत्तमाय नमः । श्री अधोक्षजाय नमः । श्री नारसिंहाय नमः । श्री अच्युताय नमः । श्री जनार्दनाय नमः । श्री उपेंद्राय नमः । श्री हरये नमः । श्रीकृष्णाय नमः ।
अक्षता उजव्या हाताच्या बोटांनी घ्यावा आणि हाताचा तळवा वरच्या दिशेला करावा. अंगठा सोडून उरलेल्या चार बोटांवरून अक्षता हळूहळू तळव्यावरती घसरत स्वतःचे गोत्र आणि नाव उच्चारावे. मग पुढील संकल्प करावा.
करिष्ये म्हणताना उजव्या हातातील अक्षतांवर पाणी घालून ताम्हणात सोडाव्या. हात पुसावे.
गणपतीपूजन करावे आणि पूजनं करिष्ये, असे म्हणत सुपारीवर किंवा नारळावर गणपतीची पूजा करावी. गणपती पूजन येत नसल्यास स्मरणं करिष्ये, असे म्हणावे गणपतीचे स्मरण करावे.
वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।
महागणपतिं चिंतयामि नमः ।
कलश, घंटा, दीप पूजन-
गंध-फूल, अक्षता वाहून कलश, घंटा, दीप यांची पूजा करावी
(फुल, तुळशीचे पान अन् दुर्वा वहाव्या आणि फुलांचा हार घालावा)
ॐ ब्रह्मध्वजाय नमः । धूपं समर्पयामि ।
(उदबत्ती ओवाळावी)
ॐ ब्रह्मध्वजाय नमः । दीपं समर्पयामि ।
(निरांजन ओवाळावी)
नैवेद्य-
उजव्या हातात तुळशीची दोन पाने घेऊन त्यावर पाणी सोडावे. नैवेद्याच्या ताटाभोवती एकदाच पाणी फिरवावे. नैवेद्यावर तुळशीच्या दोन पानांनी पाणी प्रोक्षण करून एक पान नैवेद्यावर ठेवावे आणि दुसरे ब्रह्मध्वजाच्या चरणी वहावे.