गुढी- नवीन नात्याची

©ऋचा दीपक कर्पे

बुधवार, 25 मार्च 2020 (07:57 IST)
जोशी काकू फ्लेटच्या दाराजवळ येवून थबकल्याच. रात्रभराचा प्रवास झाला होता. थकवा तर होताच पण मनावर खूप दडपणही होते संपूर्ण प्रवासात. सुमितच्या लग्नाला सहा महिने झाले होते, पण त्या पहिल्यांदाच त्याच्या घरी आल्या होत्या. सुमीतने परजातीची मुलगी पसंत केली होती हे काकूंना पटले नव्हते, म्हणजे असा फारसा विरोधही केला नव्हता त्यांनी, पण फारश्या खूषही नव्हत्या. खूप सोहळे ओवळे नसले तरी निदान आपले सण वार गुढीपाडवा, हळदी कुंकू, सवाष्ण थोडक्यात आपली संस्कृती जपणारी सून हवी होती त्यांना. 
 
संपूर्ण प्रवासात त्यांची जोशी काकांजवळ तक्रार सुरूच होती, "त्याला कळत नाही पण तुम्हाला तर कळतं? आजचं रिजर्वेशन करण्या अगोदर विचारलं तर असतं.. आता अगदी सणावाराच्या दिवशी जाऊन पोहोचू.. गुढीची तयारी.. श्रीखंड पुरीचा बेत ... गेल्या गेल्या सर्व बघावे लागणार.. नवीन जागा आहे. सुनबाईंना पटली पाहिजे माझी लुडबुड स्वयंपाकघरात.. मलाही उमजायला हवं नवीन घरात....." 
 
पण सुमितच्या घरी पोहोचल्यावर फ्लॅटच्या दारापुढे काढलेली सुरेख रांगोळी, व्यवस्थित उभारलेली गुढी त्यांचे स्वागत करत होती. सुनबाईंनी दार उघडले, जरीची साडी आणि नथ घातलेली ती लक्ष्मीसारखी शोभत होती. तिने काका काकूंना लगेच नमस्कार केला, "वेलकम आई बाबा! शेजारच्या काकूंने मुझे हे सब शिकवला... अभी आप आ गए तो.. मी लवकर शिकून .. जाईल.. सगळं" 
 
काकूंना आनंदाश्रूच आले, तिला जवळ घेत त्या म्हणाल्या "सब धीरे धीरे ही सीखते हैं, मी सर्व शिकविन तुला" 
सासू-सुनेने एका नवीन नात्याची गुढी उभारली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती