‘...पण योगीपेक्षा फडणवीसच पुढे जातील असं सध्या तरी दिसतंय’
गुरूवार, 10 मार्च 2022 (19:28 IST)
गोवा विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमताच्या जवळ पोहोचल्याचं चित्र आहे.
मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात भाजप पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरी गेल्यानं बरीच आव्हानं समोर असल्याचं बोललं जात होतं. मात्र, ही आव्हानं भाजपनं कणखरपणे पेलून त्यांवर मात केल्याचं निकालावरून दिसून येतंय.
गोव्यात भाजपसमोर आव्हानांना सामोरं जाण्यासाठी महाराष्ट्रातून महत्त्वाचे नेते तळ ठोकून होते. किंबहुना, गोवा निवडणूक प्रभारी म्हणून भाजपनं महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीच नेमणूक केली होती.
आधी बिहार निवडणूक आणि आता गोवा निवडणूक, अशा दोन्ही ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक प्रभारी म्हणून यशस्वी कामगिरी केल्याचं आकडेवारीवरून लक्षात येतं.
बिहारमध्ये भाजपला आधीपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या आणि नितीशकुमारांच्या पक्षाला मागे टाकत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला.
गोव्यात पर्रिकरांनंतर नेतृत्वाची निर्माण झालेली पोकळी आणि पक्षात अनके गट-तट असतानाही, देवेंद्र फडणवीसांनी गोव्यात भाजपला मिळवून दिलेल्या जागा सध्या चर्चेचा विषय ठरल्यात.
या निकालामुळे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाबाबतही चर्चा सुरू झाल्या आहेत.
महाराष्ट्रात सलग दुसऱ्यांदा सर्वांत मोठा पक्ष, त्यानंतर बिहार आणि गोव्यात निवडणूक प्रभारी म्हणून उत्तम कामगिरी या गोष्टींमुळे देवेंद्र फडणवीस यांचं भाजपमध्ये आणि पक्षाबाहेरील राजकीय वर्तुळातही वजन वाढेल का, हा प्रश्न आता विचारला जातोय. याचं उत्तर आपण राजकीय विश्लेषकांशी बातचित करून जाणून घेणार आहोत.
फडणवीसांसमोर गोव्यात नेमकी काय आव्हानं होती?
तत्पूर्वी, आपण हे पाहू की, गोवा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय वजनाची चर्चा का होतेय, तर अशी काय आव्हानं गोव्यात होती, जी फडणवीसांनी तोंड दिली आणि त्यातून मार्ग काढला.
गोव्यातील वरिष्ठ पत्रकार सागर जावडेकर आणि मयुरेश वाटवे यांच्याशी बोलून हे आम्ही जाणून घेतलं.
गोव्यात भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सर्वांत मोठं आव्हान होतं, पक्षाअंतर्गत बंडखोरीचं.
काँग्रेसमधून जे भाजपमध्ये आले होते, त्यामुळे पक्षाअंतर्गत नाराजी वाढली होती. किंबहुना, काही नेत्यांनी बंडखोरीही केली. प्रमोद सावंत आधीच मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांमुळे त्रस्त असताना, संघटनेतलं त्याचं लक्षं कमी झालं होतं. अशावेळी या नाराज आणि बंडखोरी यांच्यावर मात करण्यात फडणवीसांनी मोठी भूमिका बजावली.
मयुरेश वाटवे सांगतात की, काँग्रेसमधून जे भाजपमध्ये आले होते, त्यांच्यामुळे भाजपमधील काही नेते नाराज होते. त्यांची समजूत काढण्यासाठी फडणवीसांची चांगले प्रयत्न केले. मग त्यासाठी बाहेरून आलेल्या काही नेत्यांना तिकीट नाकारणं असो वा त्यांच्याशी बोलून समजावणं असो.
अनेक नाराजांना फडणवीस वैयक्तिकरित्या भेटले आणि त्यामुळे एक-दोन अपवाद वगळता, बाकी सगळ्यांना शांत करण्यात यश मिळवलं, असं वाटवे म्हणतात.
दुसरं मोठं आव्हान होतं ते, अँटी-इनकम्बन्सीचं. मात्र, मयुरेश वाटवे सांगतात, "या अँटी-इनकम्बन्सीचा फायदा काँग्रेसला उचलता आला नाही. उलट भाजपविरोधातल्या नाराजीचा सामना करण्यासाठी आणि ती शांत करण्यासाठी फडणवीसांनी यश मिळवलं."
याचबाबत वरिष्ठ पत्रकार सागर जावडेकर सांगतात की, "अँटी-इनकम्बन्सीबाबत सांगायचं झाल्यास, विरोधकांची फाटाफूट भाजपच्या पथ्यावर पडली. किंबहुना, दहा दिशेला दहा तोंड करून असलेल्या विरोधकांचा फायदा फडणवीसांनी उचलला."
'नाही मनोहर तरी...'
मनोहर पर्रिकरांनंतर गोव्यात भाजप पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे गेली. पर्रिकरांचं गोव्यातलं स्थान पाहता, भाजपला निवडणूक कठीण जाईल असं वाटत असतानाच, भाजपनं पर्रिकरांचे पुत्र उत्पल पर्रिकरांनाही पणजी मतदारसंघातून तिकीट नाकारून अनेकांना धक्का दिला.
आधीच पर्रिकर नाहीत, त्यात पर्रिकरांच्या मुलाला नाराज केल्यानं भाजपला फटका बसेल, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, आता निकाल पाहता, लोकांना आपलं म्हणणं समाजवण्यात फडणवीसांना यश आल्याचं दिसून येतं.
सागर जावडेकर म्हणतात, "काम करा आणि उमेदवारी मिळवा, असं म्हणत उत्पल पर्रिकरांना उमेदवारी नाकारली गेली. त्यावरून फडणवीसांवर टीका करण्यात आली. मात्र, लोकांना समजावण्यात त्यांना यश मिळालं, असे निकाल सांगतायेत."
गोव्यात 2012 मध्ये भाजपला 21, तर 2017 मध्ये 13 जागा मिळाल्या होत्या.
आताची स्थिती अशी होती की, मनोहर पर्रिकर हयात नाहीत, प्रमोद सावंत हा नवीन चेहरा, कोव्हिडचं संकट, पक्षाअंतर्गत नाराजी, नोकरभरतीतल्या घोटाळ्याचे आरोप या सर्व आव्हानांनंतरही 19 जागा भाजपला मिळाल्या.
"गोवा जिंकणं भाजपच्या हातात नव्हतं. ते गेल्यात जमा होतं. अशा स्थितीत एवढ्या जागा आणणं हे जबरदस्त संघटनकौशल्याचंच फळ आहे. त्याचं श्रेय नक्कीच फडणवीसांकडे जातं," असं सागर जावडेकर सांगतात.
भाजपच्या गोव्यातील कामगिरीनंतर देवेंद्र फडणवीसांना ज्याप्रकारे श्रेय दिलं जातंय, त्यावरून राजकीय वर्तुळातील त्यांच्या वाढू शकणाऱ्या वजनाचीही चर्चा होतेय.
देवेंद्र फडणवीसांचं राजकारण सुरुवातीपासून पाहणाऱ्या पत्रकारांशी बीबीसी मराठीनं बातचित केली आणि आढावा घेण्याचा प्रयत्न केला.
गोव्यातल्या यशामुळे फडणवीसांचं राजकीय वजन वाढेल का?
या प्रश्नावर बोलताना महाराष्ट्र टाइम्सचे नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजित काहीशा हलक्या स्वरात म्हणाले की, "गेल्या काही वर्षात देवेंद्र फडणवीसांनी शारीरक वजन कमी केलं आणि राजकीय वजन वाढवलं."
श्रीपाद अपराजित यांनी जरी हे हलक्या स्वरात म्हटलं असलं तरी ते खरं मानण्यासारखी स्थिती सुद्धा आहे आणि त्याबाबत श्रीपाद अपराजितच अधिक सांगतात.
ते म्हणतात की, ज्यांना असं वाटत होतं की केवळ नरेंद्र मोदींच्याच छत्रछायेखाली देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांचा समज दूर करण्याचं काम फडणवीसांनी केलंय.
पक्षाचं केंद्रीय वर्तुळ एखाद्या नेत्याला जोखण्यासाठी जे काही निकष वापरतं, त्या निकषांसाठी फडणवीस पात्र ठरल्याचे दिसून येतात, असंही श्रीपाद अपराजित म्हणतात.
फडणवीसांचं राजकीय वजन वाढेल का, याबाबत ज्येष्ठ पत्राकर देवेंद्र गावंडे म्हणतात की, "वजन वाढेल म्हणजे आता योगी हे मोदींनंतर असतील असं म्हटलं जातंय, पण योगीपेक्षा फडणवीसच पुढे जातील असं सध्या तरी दिसतंय. आताही केंद्रात फडणवीस गेले असते, तर केंद्रीय मंत्री म्हणूनही छाप पाडलीच असती. पण ते स्वत:हून गेले नाहीत. राज्याच्या राजकारणात त्यांनी राहणं पसंत केलंय."
भाजपच्या अंतर्गत वर्तुळातील देवेंद्र फडणवीस आता महत्त्वाचे नेते झालेत आणि त्याचा त्यांना येत्या काळात फायदा होईल, असं देवेंद्र गावंडे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणालेत.
फडणवीसांमधील कोणत्या गुणांमुळे ते यशस्वी ठरतात?
महाराष्ट्रात सलग दोनदा क्रमांक एकचा पक्ष म्हणून भाजपला पुढे आणणं, बिहारनंतर आता गोव्यातही देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक प्रभारी म्हणून यशस्वी कामगिरी करणं, यामुळे त्यांच्या नेतृत्वगुणांची चर्चाही सुरू झाली आहे.
याबाबत बोलताना श्रीपाद अपराजित हे फडणवीसांमधील चार प्रमुख नेतृत्वगुणांचा उल्लेख करतात.
श्रीपाद पराजित म्हणतात, "देवेंद्र फडणवीस अभ्यासू नेते आहेत, त्यांची परिश्रमाची तयारी आहे, प्रचंड टीकेनंतर विचलित न होण्याची कला गेल्या दोन वर्षात त्यांनी कमावलीय.
"सातत्य हा तर आजच्या राजकीय क्षेत्रात अभावानं आढळणारा गुण फडणवीसांमध्ये आहे. म्हणजे पाहा, 2014 पूर्वी विरोधी पक्षनेते असताना फडणवीसांचा जो लौकिक होता, तोच लौकित सत्तेत असताना आणि आता पुन्हा विरोधी पक्षनेता असतानाही कायम आहे. हे सातत्याशिवाय शक्य नसतं."
फडणवीसांच्या झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीबद्दलही श्रीपाद अपराजित सांगतात.
ते म्हणतात, नागपुरात जवळच्या लोकांचे कार्यक्रम असताना त्याकडे पाठ फिरवून ते गोव्यात तळ ठोकून होते, हे इतर नेत्यांना जमेल का, याबाबत शंका आहे.
फडणवीसांच्या स्वभाववैशिष्ट्याबद्दल बोलताना देवेंद्र गावंडे म्हणतात की, "ते उत्तम प्रशासक आहेतच. मात्र, सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, राजकारणात थंड डोक्यानं निर्णय घेण्याची सवय असावी लागते. फडणवीसांना ती आहे. कमी बोलायचं आणि व्यवस्थित राजकारण करायचं, हा त्यांच्यात गुण आहे. भाजपमधले बाकीचे नेते बोलतात खूप. पण फडणवीस कमी बोलून राजकारण करतात."
मग शेवटी एक सहाजिक प्रश्न अनेकांना पडतो, तो म्हणजे, महाराष्ट्रासह बिहार आणि गोव्यातही आपल्या कामाची चमक दाखवल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना केंद्रात घेतलं जाईल का?
तर या प्रश्नावर श्रीपाद अपराजित म्हणतात, "केंद्रात जाण्यासाठी लागणारे सर्व निकष देवेंद्र फडणवीसांच्या अंगी असले तरी त्यांना दिल्लीत नेऊन भाजप महाराष्ट्रात नेतृत्वाचा रिक्तपणा आणणार नाही."