फैसला थोड्यात वेळात

शुक्रवार, 16 मे 2014 (07:12 IST)
९८९ केंद्रांवर मतमोजणी Ÿ। ११ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होणार 
 
 
देशातील १६ वी लोकसभा निवडणूक नुकतीच नऊ टप्प्यांत पार पडली. एकूण ५४३ जागांसाठी पार पडलेल्या या निवडणुकीच्या मैदानात एकूण आठ हजार उमेदवार होते. या उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला शुक्रवारी १६ मे रोजी होत आहे. जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतातील या लोकसभा निवडणुकीकडे सा-या जगाचे लक्ष लागलेले असून, निकालाची वेळ अगदी जवळ येऊन ठेपल्याने यासंबंधीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता या निवडणुकीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी बाजी मारणार की, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या बाजूने कौल मिळणार, हे उद्याच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उमेदवारांची धकधक वाढली आहे. 
 
निवडणूक आयोगाने उत्कृष्ट नियोजन करून निवडणूक अधिका-यांना दक्ष केल्याने गैरप्रकारांना आळा घालत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे फारसा गोंधळ पाहायला मिळाला नाही. तथापि, निवडणूक प्रचारादरम्यान अनेक नेत्यांची जीभ घसरली. त्यामुळे एकमेकांविरोधात तक्रारी वाढल्या आणि त्यांच्या विरोधात कारवायाही झाल्या. त्यातूनच अनेक नेत्यांच्या तोंडाला लगाम घालता आला. तब्बल एक ते दीड महिना देशभर निवडणूक प्रचाराची रणधुमाळी रंगली. त्यातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत गेल्या. अखेर अशाच स्थितीत निवडणूक कार्यक्रम पार पडला. आता निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 
 
पाहता पाहता निवडणूक निकालाची वेळ टप्प्यात आली असून, मतमोजणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने तब्बल ९८९ मतमोजणी केंद्रे उभी केली आहेत. संपूर्ण देशभरातील निकाल पाच वाजेपर्यंत जाहीर होतील, तर दुपारी अकरापर्यंत सर्वसाधारण कल समजेल, असे आयोगाने म्हटले आहे. जवळजवळ आठ हजार उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल आदी मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि ११ पासून एक-एक निकाल लागायला सुरुवात होईल. मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर विविध एक्झीट पोलमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहूत मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. देशातील ९८९ मत मोजणी केंद्रात सकाळी आठ वाजता मत मोजणीला सुरुवात होईल. पहिल्या तासात पोस्टाद्वारे आलेली मते मोजली जातील आणि त्यानंतर ईव्हीएम यंत्रातील मत मोजणीला सुरुवात केली जातील. ईव्हीएम यंत्र निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकारी आणि उमेदवारांच्या उपस्थितीत सुरू केले जातील आणि मतमोजणी होईल, असे आयोगाने म्हटले आहे. या लोकसभा निवडणुकीत प्रथमच मतदारांना उमेदवार नाकारण्याचा ‘नोटा’ चा अधिकार मिळाला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आयोगाने या पर्यायाचा ईव्हीएम यंत्रात समावेश केला आहे. नऊ टप्प्यात झालेल्या मतदान प्रक्रिया काही अपवाद वगळता शांततेत झाली आहे. त्याच बरोबर देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात सर्वाधिक म्हणजे ६६.३८ टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीदरम्यान ८१.४ कोटी मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. आतापर्यंतच्या निवडणुकीतील मतदारांची ही सर्वाधिक संख्या आहे.

वेबदुनिया वर वाचा