भारतीय जनता पक्षाजे नेते नितीन गडकरी मानहानीप्रकरणी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनायण्यात आली आहे. नंतर केजरीवाल यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले. परंतु आपच्या कार्यकर्त्यांनी रात्री उशीरा तिहार तुरुंगाबाहेर निदर्शने केल्यानंतर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र केजरीवालांचा हा पब्लिसिटीचा स्टंट असून त्यांच्या डोक्यात पंतप्रधानपदाची हवी गेली असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे.
दरम्यान, आपच्या कार्यकर्त्यांनी तिहार तुरुंगाबाहेर निदर्शने केली. सरकारविरोधी घोषणा दिल्या. पोलिसांनी तिहार तुरुंगाबाहेर कलम 144 लागू केले आहे. तुरुंगाबाहेर मोठ्या संख्येने आप कार्यकर्ते उपस्थित झाले होते. त्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
नितीन गडकरी मानहानीप्रकरणी दहा हजार रुपये जामिनाची रक्कम भरण्यास केजरीवाल यांनी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे त्यांना दिल्लीच्या कोर्टाने दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आता 23 मे रोजी त्यांना कोर्टात सादर केले जाणार आहे.
यापूर्वी केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने जनतेचा आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांची माफी मागितली होती. सध्याच्या परिस्थितीत दिल्लीत सत्ता स्थापन करणे अशक्य असल्याचे केजरीवाल यांनी यावेळी सांगितले.