उमेदवारांसह नेतेमंडळींची दमछाक

मंगळवार, 1 एप्रिल 2014 (17:35 IST)
एप्रिलमध्ये ९ विवाह मुहूर्त
औरंगाबाद : संपूर्ण भारतात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. महाराष्ट्रात ऐन लग्नसराईत निवडणुकीची लगीनघाई आल्याने विविध पक्षांचे उमेदवार, नेते, कार्यकर्ते व नातेवाईकांची चांगलीच दमछाक होत आहे. या सोबतच प्रखर ऊन पडत असल्यामुळे या निवडणुकीत नेते मंडळींना प्रचारासोबत लगीनघाईसाठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र सध्या पैठण तालुक्यात दिसू लागले आहे.
 
निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच घोषित झाल्यामुळे मागील दोन-तीन दिवसांपासून राजकीय नेतेमंडळींची मांदियाळी जमू लागली आहे. वाडी-तांडे, गाव पातळीवरून सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपापल्या गावपातळीवरील सर्मथकांना घेऊन येण्यासाठी चढाओढ लागली होती. पैठण तालुक्यात दोन्ही उमेदवारांनी शक्तिप्रदर्शनात जोर लावला परंतु आता या शक्तिप्रदर्शनानंतर पक्षाच्या मोठय़ा नेत्यांच्या होणार्‍या सभा व त्या सोबतच आगामी एप्रिल महिन्यात २४ एप्रिल रोजी जिल्हय़ात मतदान होणार असल्यामुळे यापूर्वी लग्नसराई असल्याने मतदारांना आपल्या तंबूत खेचण्यासाठी उमेदवारांना लगीनघाई करावी लागणार आहे.
 
लोकसभेची ही निवडणूक सर्वच पुढार्‍यांसाठी प्रतिष्ठेची ठरणार असून सर्व कामे मागे सोडून गावपातळीवरील कार्यकर्ते नेत्यांसाठी जिवाचे रान करताना दिसत आहे. लग्न असो वा एखादी दु:खद घटना त्यासाठी वेळ काढून उमेदवार थेट पोहोचत आहेत. त्यासोबतच प्रचाराच्या रणधुमाळीच्या काळाने एप्रिल महिन्यात ११, १३, १४, १५, १६, २१, २२, २३ आणि २४ असे तब्बल ९ विवाह मुहूर्त आहेत. ज्यांचे लग्नकार्य आहे त्यांनी आधी लगीन कोंढाण्याचे म्हणत निवडणुकीच्या नंतरच्या तारखांना पसंती दिली आहे; दरम्यान निवडणुकीच्या तारखा जसजशा जवळ येतील तसे विवाह मुहूर्तांना हजेरी लावताना नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. पत्रिका देताना कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा राहावी यासाठी उमेदवारांकडून कुठे स्वत:, कुठे पत्नी, कुठे मुलगा तर कुठे भाऊ असे प्रतिनिधी पाठवावे लागत आहेत. परंतु यावर्षी विवाह मुहूर्त व निवडणुका एकाचवेळी आल्याने नेते मंडळींसह त्यांच्या नातेवाईकांचीही विवाह मुहूर्तासाठी दमछाक होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा