16 मे रोजी जन्मलेल्या जुळ्या मुलांची नावं ‘नरेंद्र’ आणि ‘मोदी’
बुधवार, 21 मे 2014 (14:35 IST)
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या लाटेत भाजपला घवघवीत यश मिळालं. नरेंद्र मोदींच्या व्यक्तिमत्त्वाने एक दाम्पत्य अतिशय प्रभावित झालं. त्यामुळेच 16 मो रोजी जन्मलेल्या आपल्या जुळ्या मुलांची नावं त्यांनी ‘नरेंद्र’ आणि ‘मोदी’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नवजात जुळ्या मुलांची आई व इंदूर येथील रहिवाशी आरती कुमावत यांनी सांगितलं की, ‘मी आणि सिव्हिल इंजिनीअर असलेले माझे पती देशाचे भावी पंतप्रधानांच्या व्यक्तिमत्त्वाने फारच प्रभावित झालो आहोत. त्यामुळेच आम्ही आमच्या मुलांची नावं ‘नरेंद्र’ आणि ‘मोदी’ ठेवण्याचं ठरवलं आहे.
‘या नावांमुळे आमच्या दोन्ही मुलांना आयुष्यात काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणा मिळेल आणि त्यांच्यामुळे आमचा ऊर अभिमानाने भरुन येईल,’ असंही आरती कुमावत म्हणाल्या. ‘मी 16 मे रोजी एका स्थानिक रुग्णालयात जुळ्या मुलांना जन्म दिला. याच दिवशी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाली होती, ज्यामध्ये मोदींचा पंतप्रधान बनण्याचा मार्ग मोकळा झाला होता. आम्ही आमच्या मुलांच्या नामकरणाच्याबाबतीत हा योगायोग म्हणजे देवाचा संकेत मानला आहे,’ असं मुलांची आई आरती यांनी सांगितलं.