शरद पवार सत्तेसाठी हापापले आहेत- उमा भारती

शनिवार, 10 मे 2014 (15:38 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे सत्तेसाठी हापापले असून गुळाभोवती फिरणार्‍या माशी सारखे असल्याची घणाघाती टीका भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी केली आहे. तसेच शरद पवार हे सत्तेच्या मागे-मागे नेते आहे. केंद्रात कोणत्याही पक्षाची सत्ता येऊ द्या, शरद पवार त्यात असतील, असा टोलाही उमा भारती यांनी लगावला आहे.

उमा भारती आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. उमा भारती पत्रकाराशी बोलतांना म्हणाल्या, नागपूर येथे आपले दुसरे घर असून, मोहन भागवत यांची भेट घेण्यामागे कोणतेही राजकीय कारण नाही. तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपला 150 पेक्षा कमी जागा मिळतील, असे भाकीत करणार्‍या अखिलेश यादव यांनी स्वत:च्या सरकारचा विचार करावा. त्यांच्या पक्षाचे साठपेक्षा अधिक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा गोप्यस्फोटही केला.  लोकसभा निवडणुकीनंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा त्यांनी या वेळी केला.

काँग्रेस नेत्यांच्या पापाचा घडा भरला आहे. त्यांची पापे धुण्यासाठी गंगाही कमी पडेल. त्यामुळे राहुल गांधी यांनी वाराणसीमध्ये कितीही मोठी रॅली काढली तरी विजय हा भाजपचाच होईल. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे वाराणसीतून सहा लाख मते घेऊन निवडून येतील आणि अमेठीत राहुल गांधी स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वेबदुनिया वर वाचा