मोदींनी गुजरातला 1 मिनिटातच चमकवले

सोमवार, 21 एप्रिल 2014 (12:33 IST)
स्वातंत्र्यांनतर अनेकांनी गुजरातच्या विकासासाठी योगदान दिले. परंतु मोदींनी त्याचे श्रेय घेऊन गुजरातला एक मिनिटात चमकवले, अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर रविवारी मुंबईत केली. 
 
मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात आयोजित एका सभेत राहुल यांनी मोदी सांगत असलेले विकासाचे गुजरात मॉडेल, महिला पाळत प्रकरण आणि अडाणी उद्योग समूहासोबत मोदींच्या संबंधावर अनेक प्रहार केले. सोबतच राहुल यांनी यूपीए सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचला. या सभेला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी संबोधित करणार होत्या. परंतु तब्येत बरी नसल्याच्या कारणावरून त्यांच्याऐवजी राहुल गांधी या सभेला उपस्थित होते.
 
गुजरातच्या विकासासाठी स्वातंत्र्यानंर 60 वर्ष अनेक महिलांनी रक्त आणि घाम गाळले, हिरे आणि कपडय़ांचे उद्योग आलेत, परंतु याचे श्रेय मोदी घेऊन जातात. मुंबईत येऊन मोदी तेच बोलतात. मुंबईत काही काम झालेले नाही. मी मुंबई बदलणार, असे ते बोलतात. परंतु असे लोक फक्त बोलतात, करत काहीच नाही. आम्ही तुमच्यासोबत बोलून योजना तयार करतो. (पान पाच पाहा) 
 
गुजरात मॉडेल गुजरातच्या जनतेने तयार केला आहे, महाराष्ट्राचे मॉडेल महाराष्ट्रातील जनताच तयार करेल, असे राहुल म्हणाले. 
 
मोदी लोकांना सांगतात की त्यांना देशाचा चौकीदार बनवा, देशाची चावी माझ्या हातात द्या. गुजरातमध्ये त्यांनी ठाणे शहराच्या आकाराची 45 हजार एकर जमीन एका टॉफीच्या किमतीत एका उद्योगपतीला दिली आहे. 
 
ही गरिबांची आणि शेतकर्‍यांची जमीन होती. परंतु ती अडाणी समूहाला देण्यात आली, असा आरोप राहुल यांनी केला.
 
राहुलच्या सभेला पवार आलेच नाही..
 
शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे या सभेला ते येऊ शकणार नाही, अशी घोषणा यावेळी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी यावेळी केली.
 
जसवंतसिंह आणि लालकृष्ण अडवाणी या भाजपच ज्येष्ठ नेत्यांना जसे पक्षातून बाजूला करण्यात आले. त्याप्रमाणेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी जर सार्वजनिक जीवनात सक्रिय असते तर त्यांचीही नरेंद्र मोदी यांनी हकालपट्टी केली असती, असेही ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा