पाकविरोधीधोरणाबाबत शिवसेनेची कोंडी!

शनिवार, 24 मे 2014 (16:22 IST)
देशाचा पारंपारिक शत्रु असलेल्या पाकिस्तानला शिवसेनेने आतापर्यंत अनेकदा कडाडून विरोध केला आहे. भारतीय जवणांचे शिर कापणार्‍या पाकिस्तानसोबत कोणतही संबंध ठेवू नये, असेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले आहेत. परंतु देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आमंत्रित केल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे. विशेष म्हणजे शरीफ यांनी मोदींची निमंत्रण स्विकारले असून ते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनेसमोर अवघड प्रसंग निर्माण झाला आहे. अशा वेळी कोणती भूमिका घ्यावी, असा रोखठोक सवाल उपस्थित झाला आहे.

पाकिस्तानसोबत कोणत्याही मुद्यावर चर्चा करण्यास शिवसेनेचा पूर्वीपासून विरोध आहे. देशात दहशतवादी हल्ले घडवून आणणे तसेच घातपाती कारवायांना खतपाणी देणार्‍या पाकिस्तानला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वी विरोध केला होता.

पाकिस्तान विरोधात भारताच्या क्रिकेट लढतीची वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्‍टी शिवसेनेने उखडून टाकली होती. परिणाम पाक क्रिकेट संघासोबत भारताशी अनेक वर्षे लढती होऊ शकल्या नव्हत्या. पाकिस्तानी कलावतांना मुंबईत पाऊल ठेवू देणार नसल्याच्या मुद्यावर शिवसेनेने अनेक आंदोलने केली होती.

आता मात्र नरेंद्र मोदींच्या शपथविधीला नवाझ शरीफ उपस्थित राहणार असल्याने शिवसेना काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

वेबदुनिया वर वाचा