दंगलीसाठी दोषी असेन तर फाशी द्या

शनिवार, 19 एप्रिल 2014 (09:55 IST)
गुजरात राज्यात 2002 मध्ये झालेल्या दंगलीबाबत जे काही बोलायचे होते ते मी बोललो आहे. आता मी  जनतेच्या न्यायालयात उभा असून मला जनतेकडून निकाल हवा आहे. जर मी दंगलीसाठी गुन्हेगार असेन तर भर चौकात मला फाशी द्या, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी ‘एशियन न्यू इंटरनॅशनल’ला विशेष मुलाखत देताना केले.

दंगलप्रकरणी आपण गप्प बसल्याचा इन्कार करून मोदी म्हणाले, 2002 ते 2007 या दरम्यान दंगलीबाबत विचारलेल्या प्रश्नांना देशातील प्रत्येक बडय़ा नेत्याला उत्तरे दिली. मात्र त्या पत्रकारांना सत्या समजून घ्यायचेच नव्हते. दंगलीबाबत अनेक आरोप झाले. दंगलीशी माझे नाव जोडण्याचा प्रयत्न अनेकवेळा करण्यात आला. या दंगलीत 790 मुस्लीम आणि 254 हिंदूंचा बळी गेला होता. अडीच हजार लोक जखमी झाले होते. तर 223 जण बेपत्ता झाले होते.

या मुलाखतीत मोदी यांनी लोकशाही तत्त्वाशी कटिबध्द असल्याचे स्पष्ट करून प्रसारमाध्यमांनीच प्रतिमा मलीन करण्याचे काम केले. अर्थात प्रसारमाध्यमे माझ्या मागे हात धुवून लागल्याने मला संपूर्ण देश ओळखू लागला.

मोदी पंतप्रधान झाल्यास काही वृत्तपत्रांचे संपादक देश सोडून पळून जातील, अशी टीका आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केली होती. यावर बोलताना मोदी म्हणाले, गेली 14 वर्षे भाजप गुजरातमध्ये सत्तेवर आहे. या काळात कोणी संपादक अथवा पत्रकार गुजरातमधून पळून गेल्याचे तुम्हाला माहीत आहे का?

2014 च्या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी सर्वात असमाधानकारक असेल असे सांगून मोदी म्हणाले की, काँग्रेस आणि संयुकत संयुक्त पुरोगामी आघाडीची कामगिरी आतापर्यंतच्या   निवडणुकांच्या इतिहासापेक्षा सर्वात खराब असेल. त्याचवेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची कामगिरी उत्तम असेल. गेल्या दहा वर्षातील सरकारच्या कामगिरीबद्दलची नाराजी जनतेच्या   मनात आहे. प्रचारादरम्यान जनतेसमोर हे मांडण्यावरच माझा भर आहे.

वेबदुनिया वर वाचा