गिरिराज सिंह यांच्या वक्तव्याशी सहमत नाही- मोदी

बुधवार, 23 एप्रिल 2014 (15:41 IST)
भारतीय जनता पक्षाचे नेते गिरिराज सिंह यांच्या 'नरेंद्र मोदींशी जे सहमत नसतील त्यांनी पाकिस्तानात चालते व्हा', या विधानाशी सहमत नसल्याचे खुद्द नरेंद्र मोदी यांनी सांगितले. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी गिरीराज सिंह यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. तसेच गिरिराज सिंह यांच्याकडून अशा बेजबाबदार वक्तव्याची अपेक्षा नव्हती, अशी खंतही मोदींनी व्यक्त केली.

दरम्यान, मोदी यांनी पक्षाच्या नेत्याना अशा प्रकारची निरर्थक वक्तव्य करू नये, असे आवाहन केले आहे. दुसरीकडे, वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गिरिराज सिंग यांच्यावर निवडणूक आयोगाने निर्बंध लादले आहेत. त्यांना बिहार आणि झारखंडमध्ये प्रचारास बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे त्यांना स्वतंत्र कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. गिरीराज सिंग यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरची तातडीने चौकशी करावी, असे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत.

वेबदुनिया वर वाचा