पर्वतावरील देखणा घाटातला गणेश
जुन्नर तालुका हा ऐतिहासिक आणि पौराणिक स्थळांचा खजिना. जुन्नरपासून अवघ्या 12 किलोमीटरवर असणार्या हडसर उर्फ पर्वतगडावरील देखण्या बाप्पाचं दर्शन आवर्जून घ्यायला हवं. गडावरील भगवान शंकरांच्या मंदिरात गणरायाची ही देखणी मूर्ती विराजमान झालेली आहे. चतुर्भुज, शेंदूरचर्चित गणरायांच्या मागील दोन्ही हातांत परशू आहे. चारही हात आणि पायांमध्ये माळा आहेत. मुकुटावरही माळेची नक्षी आणि नागाच्या फणा कोरण्यात आल्या आहे. गडाची कातळकोरीव वाट आणि बाप्पांचं इथे घडणारे दर्शन सुखावून जाते.