भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/गौरीच्या प्रतिमा वा प्रतीके बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात.
मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी सौ. माधवी संदेश एकतारे यांनी सौ. दिप्ती गडक यांच्यासह श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रसिद्ध सिंहगड किल्ल्याची प्रतिकृती तयार करुन महालक्ष्मीचे राजेशाही थाटात आगमन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा किल्ला मराठा गौरवाचे प्रतीक आहे. शास्त्रात तेजाने युक्त गौरीला शक्तीचे रूप मानले जाते. अशात विजयी सिंहगडावर आईचे पूजन एक वेगळीच ऊर्जा प्रदान करत असून मनाला प्रसन्न वाटत असल्याचे जाणवते, असे माधवी एकतारे म्हणाल्या.
पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या. तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. याला गौरी गणपती किंवा महालक्ष्मी पूजन देखील म्हटले जाते.