गणपतीची मूर्ती कशी असावी आणि घरी आणण्याचे शास्त्रोक्त नियम जाणून घ्या

शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020 (15:50 IST)
स्कंद पुराणामध्ये श्रीकृष्णाने धर्मराजाला सिद्धीविनायक व्रत करण्यास सांगितले आहे. या वेळी मूर्ती कशी असावी याचे सविस्तर वर्णन आले आहे.
 
स्वशक्त्या गणनाथस्य स्वर्णरौप्यमयाकृतिम् ।
अथवा मृन्मयी कार्या वित्तशाठ्यं न कारयेत् ॥ 
 
अर्थात सिद्धिविनायकाच्या पूजेसाठी आपल्या सामर्थ्याप्रमाणे सोने, चांदी अथवा माती यांची मूर्ती बनवावी. यांव्यतिरिक्त अन्य वस्तूंपासून मूर्ती बनवणे शास्त्रानुसार 
 
अयोग्य आहे. 
 
गणपतीची मूर्ती कशी असावी
गणपती बाप्पा ची मूर्ती शक्यतो बैठी म्हणजे बसलेली असावी. आपण प्राण-प्रतिष्ठा करतो तेव्हा मूर्ती जिवंत असते.
एक ते दीड फुटांपेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी.
मूर्ती एकदंत, चतुर्भुज, पाश आणि अंकुश धारण केलेली असावी.
एका हाती मोदक आणि दुसर्‍या हात वरदमुद्रेत असावा.
पाटावर, सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम
गणेशमूर्तीची शरीरयष्टीत बदल करणे योग्य नाही. चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये
गणपतीची सोंड उजवीकडे नसावी. उजव्या सोंडेच्या गणपती उपासनेमध्ये कडक सोवळ्याची आवश्यकता असते.
मूर्ती सुबक, प्रसन्न आणि पिवळे पितांबर नेसलेले असेल अशी घ्यावी. 
मूर्ती भंगलेली, रंग उडालेली नसावी. कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही.
शिव-पार्वतीसोबत बसलेल्या गणपतीची मूर्ती निषिद्ध आहे
 
 
मूर्ती घरी आणताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी
श्रीगणेशाची मूर्ती घेण्यासाठी घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी घालून घराबाहेर पडावे. 
गणेश मूर्ती कपड्याने झाकून घरी आणण्याची प्रथा आहे.
गणपती घरी आणताना त्या जागेवर अक्षता, गुलाल वाहून गणपती घरी आणावा. कारण अक्षता या अखंड असतात आणि त्या भंग पावत नाहीत. 
श्रीगणेशाची स्थापना ईशान्य दिशेला करावी. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती