गौरीपूजनाच्या निरनिराळ्या परंपरा आणि पद्धती

मंगळवार, 18 ऑगस्ट 2020 (16:23 IST)
गौरीपूजन हे हिंदू महिलांचे भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत आहे. गौरीपूजन हा महाराष्टातल्या सणांपैकी एक सणही आहे. यास महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात.
 
भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/गौरीच्या प्रतिमा वा प्रतीके बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात.
 
एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली. त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपापल्या सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या.
 
गौरींच्या पूजेची पद्धत आणि परंपरा वेगवेगळ्या असतात. काही कुटुंबात गौरींचे मुखवटे असतात, तर काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात. 
 
काही कुटुंबात धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. काहीजण पत्र्याच्या, लोखंडी सळयांच्या किंवा सिमेंटचे कोथळ्यावर मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवतात. सुपात धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवून देखील पूजा केली जाते तर काही लोक गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात. 
 
तेरड्याचीही गौर देखील पूजली जाते. तेरड्याची रोपे मुळासकट आणतात. ही मुळे म्हणजेच गौरींची पावले, असा समज आहे. गौरीला घागरी फुंकण्याचीही पद्धत काही ठिकाणी आहे.
 
काही ठिकाणी मातीची पाच मडकी आणून त्यात हळदीने रंगविलेला दोरा, खोबर्‍याच्या वाट्या आणि खारका घालून त्यांची उतरंड रचतात आणि त्याच्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. अश दोन प्रतिमा तयार करुन पूजा करतात.
 
काही ठिकाणी सुवासिक फुलांच्या वनस्पतीची रोपे पटून त्यांनाच गौरी करतात. त्यांना घरी आणून रोपट्यांच्या जुडग्यांना स्त्रीचा आकार देतात आणि मुखवटा बसवतात.
 
गौरी आगमनाच्या दिवशी शुभ वेळ बघून गौरीची स्थापना केली जाते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा आणि महानैवेद्य दाखवला जातं. तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे/महालक्ष्मींचे विसर्जन करतात. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती