असे करतात हे पूजन
हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये परंपरेनुसार धातूची, मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवितात. गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावले काढतात. थाटामाटात घरात आणता प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करतात.
महापूजनात पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळवतात. हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकाराचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. माहेरवाशीण ज्येष्ठ गौरीला पुराणाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबिरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा समारंभ केला जातो. अनेक जागी रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.