श्रीप्रभुगजाननाला, वरेण्य पुसतो पुढील प्रश्नास ।
१.
कथिलें ज्ञान नि कर्मा, यांतिल सांगा सुयोग्य एकास ॥१॥
गणपति म्हणे वरेण्या, सृष्टिस्थितिचे प्रकार हे कथिले ।
२.
प्रतियोग सांख्य यांना, कर्माला ते सुयोग्य विधि कथिले ॥२॥
विधिपरि कर्म न केलें, तर तो निष्क्रिय असाच होत असे ।
३.
कर्माच्या त्यागानें, त्याला सिद्धी मुळींच प्राप्त नसे ॥३॥
कर्मावांचून मानव, राहत नाहीं कदापि भूपा तो ।
४.
प्रकृतिगुणधर्मानें, सहजच घडतें स्वकर्म तो करितो ॥४॥
इंद्रियनियमन करुनि, करितो कर्मास चिंतुनी विषया ।
५.
मंदमती तो होतो, तुच्छहि होतो जगांत तो राया ॥५॥
इंद्रियनियमन करितो, मनही अवरी तयापरी जो तो ।
६.
होतो निरिच्छ योगें, करुनी कर्मास योग साधी तो ॥६॥
कर्म करुं नये ऐसें, भूपा इच्छूं नयेस यापेक्षां ।
७.
कर्मफलाची इच्छा, त्यजिणें उत्तम असेच त्यापेक्षां ॥७॥
देहस्थिति ही होते, कर्मापासून योग्य भूपा ही ।
कर्म न करितां तैसी, देहस्थिति मिळे न केव्हांही ॥८॥
मजसी कर्म न अर्पी, तो होतो बद्ध त्याच कर्मांनीं ।
कर्मीं निरिच्छ होउन, कर्माठायीं अलिप्तता मानी ॥९॥
कर्म मर्दपण करणें, ध्यानीं धरणें प्रमूख हें तत्त्व ।
८.
तुजला प्रामुख्यानें, सांगितसें हें गुपीतसें तत्त्व ॥१०॥
कर्मठ कर्म मदर्पणिं, दक्ष असे तो सुबद्ध होत नसे ।
९.
इच्छुनि कर्म करी तो, कर्मामध्येंच बद्ध होत असे ॥११॥
पूर्वी यज्ञासह ते, निर्मियले वर्ण मीं तयासंगें ।
यज्ञ करुनियां निर्मा, भूवरि आधीं प्रजाहि त्यायोगें ॥१२॥
कल्पद्रुमापरी हे, फळ देती ते सुयोग्यसें यज्ञ ।
१०.
यास्तव याज्ञिककर्मा, उत्तेजन दीधलें करुन प्राज्ञ ॥१३॥
जेथें यज्ञहि होती, तेथें येती समस्त ते देव ।
घेउन अन्नग्रासा, तोषित होती तिथेंच ते देव ॥१४॥
सुखवुन कर्मठ याज्ञिक, देती त्यांना सुयोग्यसें स्थान ।
११.
यास्तव याज्ञिककर्मा, दिधलें मीं तें तयांस प्रोत्सान ॥१५॥
तोषित होउन दिधल्या, इच्छित वस्तू सुयज्ञ कर्त्यांसी ।
मोबदला कर्त्यांनी, दिधला नाहीं सुशांत देवांसी ॥१६॥
मोबदला देती ना, यांना तस्कर असें म्हणावें कीं ।
१२.
यापरि गणेश वदती, भूपति ऐकें सुशांतचित्तें कीं ॥१७॥
हवनीय शेष अन्ना, भक्षिति ते होति कीं रहित पापी ।
१३.
अपुलेसाठिंच केवळ, पचविति तें अन्न भक्षुनी पापी ॥१८॥
विधिपासुन यज्ञाची, निपज असे तीमुळेंच देववर ।
१४.
निपजति अन्नापूर्वी, अन्नापासुन समस्त प्राणिवर ॥१९॥
विधियुक्त कर्म जनी तों, विधि आहे तो मदीय सुत आहे ।
१५.
यास्तव मी विश्वानें, यज्ञानें नी भरुन स्थित राहें ॥२०॥
अज्ञ असे जो मानव, इंद्रियसुख पावुनीच तो राहे ।
१६.
ज्ञानी मानव भूपा, भवचर्कांतुन सूटून मज पाहे ॥२१॥
अंतरबाह्यहि तृप्ती, ज्ञान्यांची ती सदैवशी असते ।
१७.
अंतरबाह्यहि आत्मा, तोषित असुनी निरिच्छमति असते ॥२२॥
कार्यांकार्यांमाजी, पाहत नाहीं शुभाशुभा कांहीं ।
१८.
त्याला जगतामाजी, साध्य नसे ही उरेच ना पाहीं ॥२३॥
कर्मावरि आसक्ती, असणें हें देत ना च गति चांग ।
१९.
यास्तव कर्म करावें, अनसक्त असे मजसि हो गतीयोग ॥२४॥
कर्मत्यागापासुन, पावति मुनि नी सुविप्र सत्सिद्धी ।
२०.
कर्मावरि नासक्ती, यानें साधे सुलोकशी सिद्धी ॥२५॥
स्वकर्म करणाराचें, करिती जन तें त्वरीत अनुकरन ।
२१.
मानुन प्रमाण त्यांना, त्यापरि करिती स्वयेंच आचरण ॥२६॥
२२.
कर्म करीं मी भूपा, इच्छित नाहीं सुवस्तु वा स्वर्ग ।
व्हावी प्राप्त म्हणूनी, न करीं वर्तोत जाण जनवर्ग ॥२७॥
कर्म न करिं मी भूपा, आलस्यें युक्त होउनी जेव्हां ।
२३.
वर्ण समस्तहि ध्यानीं, गुंगुनि कर्में करीतना तेव्हां ॥२८॥
ऐसें झालें असतां, औपासक नष्ट होउनी जाती ।
२४.
नाशहि पावति भूपा, केला संकर सु-वर्ण मज म्हणती ॥२९॥
कामी मानव करितो, मूढपणें तें सहेतुकें कर्म ।
२५.
उपदेश त्यास व्हावा, यास्तव ज्ञानी अहेतुकें कर्म ॥३०॥
कर्मठ कर्म करीती, मूढपणें भेदबुद्धि ते असती ।
२६.
ते बुद्धिनाश करुनी, योगानें सर्व देत कर्मे तीं ॥३१॥
कर्म करावें भूपा, फलाभिसंधी त्यजून योगानें ।
पुढती तुजसी सांगें, ऐकें राया सुशांतचित्तानें ॥३२॥
मूढपणानें करितां, भेद नि ताठा जनीत कर्में तीं ।
२७.
कर्माठायीं होतें, मीपण उपजे अशीच बुद्धी ती ॥३३॥
गुणकर्मविभागानें, जाणे जो योग विषय आत्मत्व ।
तो योगसाधनासी, पदार्थठायीं असक्त ना तत्त्व ॥३४॥
सत्त्वरजतमात्रीणीं, युक्त गुणांनीं अशी असे माया ।
२८.
तीतें मोहित होउन, फलइच्छेनें करीत कर्मा या ॥३५॥
शास्त्रावरती त्यांचा, नसतो विश्वास मुख्य कारण तें ।
२९.
स्वात्माद्रोहक होती, उल्लंघन करित नाच शास्त्रांतें ॥३६॥
ऐसेच वागती त्या, नाम असे जाण विश्ववेत्ते हें ।
तदुपरि परिसें भूपा, सुबोध करितों सुतत्त्व योगा हें ॥३७॥
ज्ञात्यांनीं नित्याचीं, कर्में करणें निमित्तशीं साचीं ।
अर्पावीं मजला तीं, माझें मी नी त्यजून मति हेची ॥३८॥
यापरि वर्ते मानव, परमगती ती त्वरीत तो पावे ।
३०.
चित्तीं धरुन ऐसें, भूपापरि त्या सदैव वर्तावें ॥३९॥
माझ्या बोधापरि ते, हेतू त्यजुनी सुवर्तती भक्त ।
३१.
कर्म करुनियां होती, नृपनाथा ते त्वरीत कीं मुक्त ॥४०॥
माझ्या बोधापरि ते, वागत नसती अजाण मानव ते ।
३२.
मम अरि जाणावे ते, होती मतिनष्ट भ्रष्ट आदि मानव ते ॥४१॥
ज्ञानेंयुक्त असुनहि, प्रकृतिपरि कर्म करुनिया राहे ।
३३.
प्रकृति प्रचीत पावे, त्यांची श्रद्धा अजाणशी आहे ॥४२॥
जे विषय इंद्रियांचे, त्यांमाजी काम क्रोध अदि असती ।
३४.
होऊं नयेच वश त्या, जीवात्मा नाश कारणा होती ॥४३॥
परधर्म दिसे सुगुणी, स्वीकृत करणें घडेच पापद हें ।
दिसतो स्वधर्म अगुणी, आचरणें तें सुपुण्यदायक हें ॥४४॥
स्वधर्म पाळुन भूपा, मरणें हें स्वर्गलोकिं हितकारी ।
परधर्म पाळुनी तो, मरणें हें अन्य लोकिं भयकारी ॥४५॥
यास्तव परधर्माला, अनुसरणें हें अयोग्य भूपा हें ।
३५.
स्वधर्मपालन करणें, योग्य असें बोधितों तुला मी हें ॥४६॥
भूपति वरेण्य यानें, पुशिलें प्रभुला मुनीस सुत सांगे ।
मुनिगण ऐकति प्रश्ना, ठेविति चित्तास त्यास्वयें जागें ॥४७॥
इच्छा नसतां होते, दुष्कर्माची बळेंच ती इच्छा ॥४८॥
३६.
कोण करवितो देवा, सांगें हें स्पष्टही असे इच्छा ॥४८॥
गणपति म्हणे वरेण्या, रज तम गुण हे अनुक्रमें जनिते ।
कामक्रोधादिक हे, मोठे पापी जनांस वशकर्ते ॥४९॥
तसले प्रकार परि ते, कर्म करविती म्हणून ते दोनी ।
३७.
अपुले द्वेषी शत्रू, ऐसें त्यांना सुनिश्चयें मानी ॥५०॥
माया जशी जगाला, बाष्प तसा उदक व्यापुनी राहे ।
३८.
वर्षा ऋतूंत रविला, व्याप्त जसा मेघ काम हा आहे ॥५१॥
इच्छात्मक काम असे, शूर जवा द्वेषकारि गुण पाहे ।
३९.
तैसाच पोषणाला, कठिण असे ज्ञान झाकुनी राहे ॥५२॥
मन बुद्धि इंद्रियांच्या, काम वसे आश्रयास भूपा तो ।
४०.
त्यांच्या साह्यें करुनी, मति नासुनि भुलवि काम ज्ञाना तो ॥५३॥
मन इंद्रियेंहि सारीं, नियमन करि नी अधींच विज्ञान ।
४१.
पापी काम तयांना, नाशक तो जिंकणेंच त्या म्हणुन ॥५४॥
इंद्रिय मन बुद्धी नी, आत्मा यांची अनुक्रमें आहे ।
ओळख होणें दुर्घट, जाणें हें तत्त्व सांगतों मी हें ॥५५॥
आत्मज्ञानें योगें, निश्चय करितो अधींच आत्म्याचा ।
४२.
जो कामरुप शत्रू, जिंकी तो ठाव परमपद साचा ॥५६॥
येणेंपरि भूपाला , सांगति तो कर्मयोग साद्यन्त ।
४३.
सूत मुनींना कथिती, दुसरा अध्याय ईशगीतेंत ॥५७॥
प्रभुकंठींही घाली, दुसरी माळा सुरेख दूर्वांची ।
तस्तम काव्यें प्रभुला, प्रिय वाटो कीं मयूरसूताचीं ॥५८॥
(गीति)
विधि म्हणती हो व्यासां, पुराण रचण्याअधीं करा तपसा ।
गणपतिपूजा विधिसा, साधा साध्यार्थही धरा मन सा ॥१॥
विधिबोध करित ऐसा, तदुपरि वर्तुन करीत ते तपसा ।
प्रभुवर प्रसन्न ऐसा, झाला वर दे सुपूर्ण हो मनसा ॥२॥
नंतर रचिलीं व्यासें, मुख्य पुराणें सुबोधशीं अठरा ।
त्यानंतर पूरकशीं, पुराणसंख्या तयांपरी अठरा ॥३॥
त्यांतिल गणेश नामें, पुराण आहे प्रसिद्धसें जगतीं ।
त्यांतिल एकादशही, अध्यायांची गणेशगीता ती ॥४॥
व्यासमुखें ती गीता, कळली सूतास तेधवां त्यांणीं ।
शौनक मुनिगण यांना, सत्रामाजी कथीत ती वाणी ॥५॥
व्हावा पुनीत म्हणुनी, वरेण्य नामा सुभक्त तो नृपती ।
प्रश्नोत्तरेंच कथिलीं, भगवद्गीतेपरीच ती नीती ॥६॥
भूपति वरेण्य प्रार्थुनि, बोले विघ्नेश्वरास विनयानें ।
आपण सर्वहि विद्या, आणिक शास्त्रें सुजाण तें मननें ॥७॥
यास्तव मजला सांगा, योगाचा हा सुबोधसा अर्थ ।
ऐकुन गणेश वदले, त्वन्मति झाली अनुग्रहें आर्त ॥८॥
योगार्थ उघड करितों, भूपति ऐके सुशांत चित्तानें ।
भूपति उत्सुक झाला, ऐकाया पूज्यभावभक्तीनें ॥९॥
योग म्हणुन ये ज्याला, ऐसीं चिन्हें श्रवी अधीं भूपा ।
संतति संपद आणिक, इंद्रियसंपन्न हीं नव्हे बापा ॥१०॥
मातापितासमागम, तैसा बंधूसुतादि कांता या ।
वाजी गजराज्यादी, मिळता शक्रापदास तरि राया ॥११॥
शिव सत्यलोक विष्णू, तैसे रवि शशि कुबेर हे लोक ।
मिळतां जरी तयाला, साध्य नसे योग जाहला ऐक ॥१२॥
वायू वरुण अग्नी, देव तशीं काल आदि रुपें तीं ।
तैशींच सार्वभौमीं, चिन्हें नसती सुयोग्य योगा तीं ॥१३॥
कैसा योग असे हा, करितों तुजला श्रवीं अतां शांत ।
(गणेशगीता श्लोक १ ते १२)
शांतपणानें ऐके, भूपति कथनांत तेधवां चित्त ॥१४॥
ज्यायोगें मानव तो, ज्ञानी होतो विरक्तसा होतो ।
आहार वासनादी, जिंकुनि होतो निरिच्छसा मग तो ॥१५॥
त्याला योग म्हणावें, हें साधे तो नृपा असे योगी ।
तें ज्ञान सदय हृदयें, देउन करितो पुनीतसा योगी ॥१६॥
अपुल्या कक्षेमाजी, त्रैलोक्याचे समस्त जन घेती ।
(गणेशगीता श्लोक १३ व १४)
योगी करिती त्यांना, अपुल्यापरि योग साधुनी देती ॥१७॥
अत्यानंदें योगी, ईश्वररुपी समुद्रडोहांत ।
होती निमग्न मग ते, डोळे मिटुनी हृदींच प्रभु बघत ॥१८॥
योगें वश केलेल्या, ब्रह्माचें ध्यान करुन सर्वत्र ।
आपणांपरीच भूतें, मानिति योगी सदैव ते तत्र ॥१९॥
अच्छिन्न होति ऐसे, ताडण ओढण करुन आश्रित वा ।
कारुण्ययुक्त हृदयें, जिंकुनि क्रोधा तशींच इंद्रियं वा ॥२०॥
लोकानुग्र करणें, यास्तव फिरणें प्रमूख हा हेतू ।
(गणेशगीता श्लोक १५ ते १८)
चित्तीं असे जयांच्या, ज्ञानी योगी तयास जाणें तूं ॥२१॥
जे देहधारि असती, देहावरिती नसेच आसक्ती ।
काष्ठ सुवर्ण नि अष्मा, योगी बघती समान भूपा तीं ॥२२॥
बहु भाग्यवान ऐसे, ज्या योगानें पुरुष दिसतात ।
त्याला योग म्हणावें, योगी त्यांना सुजाण म्हणतात ॥२३॥
योग तुला मी सांगें, श्रवण करीं तूं नृपा अतां श्रवण ।
(गणेशगीता श्लोक १९ ते २१)
होशी पुनीत त्यानें, महत्त्व आहे तयांत हें जाण ॥२४॥
गणपति रवि शिव शक्ती, हरि ऐसे पांच देव हे भूपा ।
भेद न मानी ऐसी, बुद्धी होई सुयोग हा बापा ॥२५॥
हा योग मान्य मजला, वाटे ऐसें गणेश त्या वदती ।
जगतीं अनेक रुपें, घेउन करि जनन मरण तारण तीं ॥२६॥
हरिहर रविदेवी हीं, आहें मी हें नृपोत्तमा समज ।
पांचहि देव असें मी, मायेनें जाणतीच ना समज ॥२७॥
माझेपासुन झालीं, पांचहि भूतें तसेंच विधि हरिहर ते ।
तैसेच लोकपाल नि, झाले माझेकडून दिक्पति ते ॥२८॥
तैसे माझेपासुन, अष्ट वसुमुनि मनूज गो पशुही ।
सरिता समुद्र यक्षही, झाले पक्षी तशींच वन तरु हीं ॥२९॥
नागादि सर्व मानव, साधक सिद्धादि गिरि मुर हे ।
जनिता सर्व जगाचा, साक्षी द्रष्टा तसाच मी आहें ॥३०॥
सर्व करुनियां लिप्तहि, नाहीं मापक तसाच अविकार ।
(गणेशगीता श्लोक २२ ते २८)
अव्यक्त सर्व जगतीं, नाशहि नाहीं गतींत अनिवार ॥३१॥
मी ब्रह्म जाण भूपा, माझी माया महंत से भुलवी ।
त्यांच्यांत षड्विकारां, स्थापुन करिती निमग्नशी डुलवी ॥३२॥
नंतर अनेक जन्मीं, माया पटलास सारुनी विषया ।
मिथ्या मानुन सर्वहि, विरक्त होती सुलीन ब्रह्मा या ॥३३॥
छेदन दाहन अथवा, ओलें नोहे उडून नच जाय ।
लेशहि अपाय नाहीं, ऐशा ब्रह्मास तेधवां जाय ॥३४॥
कांहीं अज्ञ असे जे, वेदत्रयि नी श्रुतींत फलवाणीं ।
तीतें वानुन भूपा, अन्य नसे कर्म करित हे प्राणी ॥३५॥
जो केवळ आनंदें, भोगी तो विषय सर्वदा इष्ट ।
कर्म करुनियां विधिनें, स्वर्गांतिल भोग लाधतो सुष्ट ॥३६॥
एणेपरि वर्ते जो, जन्मा येतो मरुन तो जातो ।
(गणेशगीता श्लोक २९ ते ३५)
पडतो भवचक्रीं तो, कर्माच्या त्या फलास अनुसरतो ॥३७॥
श्रुतिपूर्वक कर्मानें, भवबंधन हें सुखें तया होतें ।
तें कर्म तो मदर्पण, करुनी मिळवी सदैव ज्ञानातें ॥३८॥
कर्माचे बीजांकुर, विलया जातां त्वरीत मन शुद्ध ।
ज्ञानार्थ हेंच साधन, ब्रह्मचि जाणे तपोनिधी सिद्धा ॥३९॥
विधिपरि कर्में कर तूं, सोडुन अर्पी फलाभिसंधीस ।
कर्मे करणें योग्यच, आहे भूपा स्वधर्मसाध्यास ॥४०॥
नाहींच चित्तशुद्धी, कर्मांवांचून जाण नच सिद्धी ।
यास्तव कर्म करावें, ज्ञानासाठींच कर्म कर आधीं ॥४१॥
कर्मापासून मानस, शुद्धहि होतें अभेदपण येतें ।
(गणेशगीता श्लोक ३६ ते ४०)
यालाच योग म्हणती, मोक्षाच्या साधनास भूपा ते ॥४२॥
गणपति म्हणे वरेण्या, योगी ऐसें कुणास म्हणतात ।
स्पष्टपणानें सांगे, ऐकें आतां पुढील कथनास ॥४३॥
पशु पुत्र रिपु मित्रा, आणिक बंधू तसेच आप्तगण ।
सुख दुःख हर्ष भीति, आणिक क्रोधा समान जोडगण ॥४४॥
भोगासी रोगासी, समान गनि तो तसेच जय-अजया ।
येवो अथवा जावो, धन हें लाभो अलाभ सम गणि या ॥४५॥
जन्माला मरणाला, समान मानी अशा नरा योगी ।
म्हणतात हे वरेण्या, कथितों तुजसी कसा असे योगी ॥४६॥
रविशशि उदका अग्नी, शिव शक्ती वायु वा सकल वस्तू ।
यामध्यें मजलागीं, पाहति दृष्टी सबाह्यशा अस्तू ॥४७॥
याला योग म्हणावें, हृदय द्विजांचें समस्त हीं तीर्थें ।
मोठया सरिता आणिक, पातकनाशक समस्त क्षेत्रें हीं ॥४८॥
हरि सर्व देव यक्षहि, उरगादी या समस्त ठायां तें ।
(गणेशगीता श्लोक ४१ ते ४५)
पाहति समान यांसी, योग म्हणावें ययास हें तूंतें ॥४९॥
तिर्यग्योनी कीटक, मानव तैसे समस्त गंधर्व ।
मजला बघती तेथें, योग्य असे बोलतात ते सर्व ॥५०॥
स्वार्थापासुन मागें, फिरविति योगी समस्त इंद्रीयें ।
समता सर्व ठिकाणीं, मान्य असे चित्त सर्वथा न्यायें ॥५१॥
अपुल्या धर्माविषयीं, सक्त असे चित्त सर्वथा ज्याचें ।
आत्मानात्म विचारें, दैवें होई ससिद्ध तें त्यांचें ॥५२॥
ऐशी बुद्धी ज्याची, तत्पर होते सदैव ज्या योगी ।
त्यालाच योग्य सिद्धी, झाली हें तत्त्व जाणती योगी ॥५३॥
ऐशी बुद्धी होतां, विचार करणें अधर्म धर्माचा ।
नंतर त्याग करावा, योग कराया तदर्थ बुद्धीचा ॥५४॥
धर्माधर्मफलांचा, विचारपूर्वक करुनियां त्याग ।
इंद्रियनिग्रह करुनी, साध्य करी तो अधींच हा योग ॥५५॥
नंतर जन्मा मरणा, पासुन होतो त्वरीत तो मुक्त ।
(गणेशगीता श्लोक ४६ ते ५०)
अक्षय स्थान तयाला, मिळतें तत्काळ त्याजला उक्त ॥५६॥
जेव्हां मानव बुद्धी, अज्ञाना त्यजिल वेदआज्ञेनें ।
तेव्हां मानव होतो, वैराग्या पूर्ण सत्य ज्ञानानें ॥५७॥
वेदत्रयियुक्त अशी, जडेल जेव्हां सुबुद्धि प्रभु ठायां ।
दृढतर स्थीरही होई, जेव्हां लाभेल योग नृपराया ॥५८॥
गणपति म्हणे नृपाला, जेव्हां मानव निरिच्छ मनिं होती ।
तेव्हां तयास समजे, तोषितसे नी तसेंच स्थीरमती ॥५९॥
जो इच्छितो सुखातें, दुःखानें तो नसेच खिन्नमनें ।
(गणेशगीता श्लोक ५१ ते ५४)
प्रीतिभयक्रोधादी, सोडी तो स्थीरबुद्धि जाण मनें ॥६०॥
जैसें कासव करितें, अंग अकुंचन तशींच इंद्रियें ।
अवरीं त्वरीत होई, मानव तो स्थीरबुद्धिविषयीं ये ॥६१॥
आहारत्याग करितां, सहजच होती सुदूर ते विषय ।
ब्रह्मज्ञानें योगें, रागादिक नष्ट होति नृपराय ॥६२॥
विद्वज्जन करिती हे, अवलंबन योगसाधनास्थितिचें ।
योगाभ्यासासाठीं, प्रयत्न करिती यथाविधी त्याचे ॥६३॥
इंद्रियशोधन करिती, हरति मन तेधवां बळें उचित ।
(गणेशगीता श्लोक ५५ ते ५७)
योगाभ्यासीं रंगुनि, सज्जन जाती सदैव ते त्यांत ॥६४॥
इंद्रियं जिंकुन आधीं, माझेवर भाव ठेवणें नित्य ।
कृत्य असें हें ज्याचें, त्यासि म्हणावें असें कृतधि सत्य ॥६५॥
विषयांचें चिंतन हें, प्रीती उपजे तयावरी बरवी ।
भीतीपासून उपजे, काम नृपा हें तुला अधीं कळवी ॥६६॥
कामापासुन क्रोधा, जन्म असे कीं तयापुढें उपजे ।
अज्ञान हें स्मृतीचें, भ्रामक आहे सुबुद्धिनाशज जें ॥६७॥
बुद्धी नासुन मानव, वायां जातो नृपा असें समज ।
याचेपुढेंच कथितों, ऐक वरेण्या सुबोध तो समज ॥६८॥
प्रीतिद्वेषहि त्यागुनी, घेईं उपभोग गोचरा वस्तू ।
वशमान इंद्रियांनीं, तोषित होतो हृदींच सुखवस्तू ॥६९॥
तोषित झाला असतां, कायिक वाचिक तसेंच मानसिक ।
दुःखें त्रिवीध नासुनि, प्रमुदित होतो सुवृद्धि हृदिं ऐक ॥७०॥
प्रसन्न मन नसतांना, सुबुद्धि नुपजे म्हणून श्रद्धा ही ।
श्रद्धेवांचुन शांती, शांतीवांचुन तसेंच सुख पाही ॥७१॥
इंद्रियरुपी वारु, त्यावरि बसुनी करीत संचार ।
विषयांकडेच जातें, मन चंचल हें बहूत साचार ॥७२॥
वायू नौकेस जसा, बुडवी जलधींत तेधवां जेवीं ।
(गणेशगीता ५८ ते ६४)
विषयांत मग्न मन हें, बुडून जातें तयापरी तेवीं ॥७३॥
निशि भूतांची जेव्हां, तेव्हां जागा सदैव तो आत्मा ।
निजतो आत्मा जेव्हां, तेव्हां निशिं हो सदैव भूतात्मा ॥७४॥
ज्यापरि जलधीमध्यें, उदकें होती समस्त तीं गुप्त ।
होती समस्त इच्छा, त्यापरि शांती नसेच ती तृप्त ॥७५॥
अर्थासाठीं धावति, इंद्रियं सारीं तयाकडे बघती ।
त्याचा निरोध करितां, बुद्धी होते स्थगीत ठायीं ती ॥७६॥
ममता आणि अहंता, सोडुन सर्वहि स्वकामना त्यागी ।
ज्ञानी ज्ञानें करुनी, मुक्तीला पावतो त्वरें योगी ॥७७॥
जो दैवानें जाणे, तूर्यावस्थेंत ब्रह्म बुद्धीस ।
(गणेशगीता ६५ ते ६९)
जीवन्मुक्तिस पावे, भूपा हें तत्त्व योगसिद्धीस ॥७८॥
गणपतिबोध वेरण्या, पहिला अध्याय योग-सार सांख्यास ।
कथिला सकल जनांला, कथिला गीती करुन काव्यास ॥७९॥
श्रीमत्गणेश कंठीं, पुष्पें गुंफून काव्यमाळेला ।
अर्पी मयूरसुत हा, प्रभुगीतेचा प्रसंग हा पहिला ॥८०॥