नाशिक : येथील गणेशोत्सवात पोलिसांची सकारात्मक भूमिका असून त्यामुळे विसर्जन मिरवणुकीमध्ये सार्वजनिक मंडळानी प्रबोधनात्मक विषयावरील देखावे सादरीकरणासह शांतता उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप द्यावा. तसेच विसर्जन हे रात्री १२ वाजेपर्यंत पूर्ण करावे असा निर्णय गणेश विसर्जन मिरवणूक नियोजन बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदा गणेश विसर्जन मिरवणूकीत धुमशान पाहायला मिळणार आहे.
दरम्यान गणेश विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनासाठी मनपा, पोलिस प्रशासन गणेश मंडळांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक मंगळवारी भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये पार पडली. यावेळी शहरातील २९ मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. यंदा प्रथमच सकाळी ११ वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होणार आहे. आज झालेल्या गणपती मंडळ आणि पोलिसांच्या बैठकीमध्ये ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. प्रथमच सकाळी मिरवणुकीला सुरवात होणार असल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साह आहे.
सकाळी ११ वाजता मिरवणूक सुरु होणार असून रात्री १२ वाजेपर्यंत मिरवणूक चालणार आहे. जर मिरवणुकीला उशीर केला तर त्या मंडळावर गुन्हे दाखल केला जाईल. तसेच लाईट असलेले मंडळ शेवटी राहणार असून स्वागत करण्यासाठी मंडळ पदाधिकाऱ्यांनी स्टेजवर जाणे टाळावे. महत्वाचे म्हणजे गणेश विसर्जन मिरवणूक यंदा कठोर नियम लावण्यात आले असून ज्या मंडळाची मिरवणूक रेंगाळेल, त्या पदाधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केला जाणार असल्याची माहिती भद्रकाली पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत देण्यात आली आहे.