श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय १६
गुरूवार, 10 डिसेंबर 2020 (05:47 IST)
॥ श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी परशुधरा । हे जमदग्नीच्या कुमारा ।
परशुरामा परमेश्वरा । आतां उपेक्षा करूं नको ॥१॥
तूं सहस्त्रार्जुनातें दंडून । केलें द्विजांचें संरक्षण ।
ब्राह्मणांचा अपमान । सहन झाला नाहीं तुला ॥२॥
आतां मात्र डोळे मिटिसी । कां रे देवा ब्राह्मणांविशीं ? ।
काय आहे लागली तुसी । गाढ निद्रा येधवां ॥३॥
म्हणून डोळे मिटूं नका । स्वस्थ ऐसें बसूं नका ।
आणीबाणीचा प्रसंग देखा । आहे हरी सांप्रत ॥४॥
तुझ्या वशिल्यावांचून । अवघीं कृत्यें आहेत शीण ।
आर्यसंस्कृतीचें रक्षण । होणें नाहीं तुझ्याविण ॥५॥
गजाननमाया अघटित । कोण जाणें तिजप्रत ।
महाराजांचा एक भक्त । पुंडलिक नामें मूंडगांवीं ॥६॥
हा शेगांवची करी वारी । समर्थाविषयीं प्रेम भारी ।
हमेश त्यांचें चिंतन करी । एकाग्रशा मनानें ॥७॥
त्याच गांवीं भागाबाई । एक ठाकरीण होती पाही ।
निष्ठा तिची एक्याही । ठिकाणासीं बसत नसे ॥८॥
ती दांभिक होती फार । सदा दंभाचा बाजार ।
भरवून भोंदी नारीनर । हाच धंदा तियेचा ॥९॥
ती बोलली पुंडलिकाला । तुझा जन्म वाया गेला ।
कां कीं तूं नाहीं केला । सद्गुरु तो आपणांतें ॥१०॥
गजाननाच्या वार्या करिसीं । सद्गुरु त्याला मानिसी ।
परी त्यानें सांग तुसी । मंत्र कानीं कथिला कां ? ॥११॥
अरे विधीवांचून । गुरु न होत कधीं जाण ।
शेगांवचा गजानन । वेडापिसा साच असे ॥१२॥
तुझा ताप बरा झाला । म्हणून तूं मानिसी त्याला ।
या काकतालीयन्यायाला । बळी पुंडलिका पडूं नको ॥१३॥
' गिन गिन गणातें ' हें भजन । पिशापरी आचरण ।
कोणाचेंही खाई जाण । ऐसा मुळीं भ्रष्ट तो ॥१४॥
म्हणून तुला सांगतें । चाल अंजनगांवातें ।
केजाजीच्या शिष्यातें । आपण दोघे गुरु करूं ॥१५॥
उद्यां त्यांचें कीर्तन । अंजनगांवीं असे जाण ।
तें ऐकावया कारण । उठून जाऊं प्रातःकाळीं ॥१६॥
गुरु असावा महाज्ञानी । चातुर्य-शास्त्र-चिंतामणी ।
गुरु असावा परमगुणी । भक्तिपथातें दावितां ॥१७॥
यांतील लक्षण एकही । गजाननाच्या नसे ठायीं ।
म्हणून वेळ न करी कांहीं । चाल अंजनगांवांतें ॥१८॥
तो भोकरे पुंडलिक । होता मनाचा भाविक ।
भागीच्या भाषणें देख । चित्त त्याचें घोटाळलें ॥१९॥
त्यानें ऐसा विचार केला । उदईक अंजनगांवाला ।
जाऊं कीर्तन ऐकण्याला । पुढचा विचार पुढें करूं ॥२०॥
ऐसा विचार करून । भागीसी बोलला जाण ।
अंजनगांवालागून । चाल येतों तुझ्यासवें ॥२१॥
दोघांचा विचार झाला । पुंडलिक रात्रीं स्वस्थ निजला ।
तों तीन प्रहर रात्रीला । काय घडलें तें ऐका ॥२२॥
पुंडलिकाच्या समोर । एक पुरुष दिगंबर ।
उभा राहिला साचार । थेट समर्थांच्या परी ॥२३॥
पुरुष म्हणे रे पुंडलिका । अंजनगांवासी जातोस कां ? ।
गुरु करायातें निका । त्या भागीच्या सल्ल्यानें ॥२४॥
जातोस तरी जावें त्वरित । त्याचें नांव काशीनाथ ।
तेथें जातां फिटेल भ्रांत । तुझी वेड्या निश्चयें ॥२५॥
कानांत कांहीं बोलला । म्हणून कां तो गुरु झाला ।
लोक कानगोष्टीला । किती तरी करतात ॥२६॥
मग ते एकमेकांचे । काय गुरु होती साचे ।
नादीं दंभाचाराचे । त्वां पुंडलिका पडूं नये ॥२७॥
तूं इकडे करी कान । मंत्र देतों तुजकारण ।
' गण गण ' ऐसें बोलून । महाराज स्तब्ध जहाले ॥२८॥
आणखी काय आहे आस । ती मी आज पुरवीन खास ।
ऐसे ऐकतां पुंडलिकास । आनंद अति जाहला ॥२९॥
पाहूं लागला निरखून । स्वप्नीं त्या पुरुषालागून ।
तों पाहिलें गजानन । शेगांवचे स्वामी पहा ॥३०॥
पुंडलिक म्हणे गुरुराया । पादुका द्या ह्या मला सदया ।
नित्य पूजा करावया । यावीण आणखी आस नसे ॥३१॥
बरें उद्या दोन प्रहर । दिवस येतां साचार ।
पादुकांची पूजा कर । ह्या मी दिधल्या घेई तुला ॥३२॥
पादुका त्या घ्यावयाला । स्वप्नीं पुंडलिक उठून बसला ।
तोंच आली तयाला । साक्षात् जागृति श्रोते हो ॥३३॥
जागा होऊनी सभोंवार । पाहूं लागला साचार ।
तो कोणीच दिसेना अखेर । नाहीं पत्ता पादुकांचा ॥३४॥
उलगडा कांहीं होईना । संशय मनींचा जाईना ।
म्हणे स्वामींच्या भाषणा । बाट न लागला आजवरी ॥३५॥
स्वप्नीं येऊन दर्शन । त्यांनीं दिलें मजकारण ।
कशी भागी ठाकरीण । तेंही स्वप्नीं कथन केलें ॥३६॥
तैसेंच उद्यां दोन प्रहरीं । पादुकांची पूजा करी ।
ऐसें बोलले साक्षात्कारी । त्याचा समजूं काय अर्थ ? ॥३७॥
किंवा नव्या पादुका करून । म्यां करावें पूजन ।
ऐसें त्यांचें आहे मन । हें कांहीं कळेना ॥३८॥
मी पदींच्या मागितल्या । पादुका त्या होत्या भल्या ।
त्याच त्यांनीं मसी दिल्या । मग नव्या घेऊं कशास ? ॥३९॥
ऐसें नाना तर्क करी । पुंडलिक आपल्या अंतरीं ।
तों इतक्यांत आली घरीं । भागी ठाकरीण बोलावण्या ॥४०॥
अंजनगांवीं चाल आतां । मोक्ष गुरू करण्याकरितां ।
दिसूं लागला आहे आतां रस्ता । अरुणोदयाचे प्रकाशें ॥४१॥
पुंडलिक म्हणे भागाबाई । मी कांहीं येत नाहीं ।
मर्जी असल्यास तूंच जाई । अंजनगांवाकारणें ॥४२॥
मीं जो एकदां गुरु केला । श्रीगजानन महाराजाला ।
तो न आतां सोडी भला । हाच माझा निश्चय ॥४३॥
तें ऐकतां भागाबाई । अंजनगांवास गेली पाही ।
आतां मुंडगांवाचें ठाईं । काय झालें तें ऐका ॥४४॥
झ्यामसिंग रजपूत । गेला होता शेगांवांत ।
दर्शन स्वामींचें घेण्याप्रत । दोन दिवस याच्या आधीं ॥४५॥
तो जेव्हां मूंडगावाला । येण्या परत निघाला ।
तईं बाळाभाऊला । ऐसें बोलले महाराज ॥४६॥
या पादुका पुंडलिकासी । द्याया देई याच्यापासी ।
समर्थ आज्ञा होतां ऐसी । तैसेंच केलें बाळानें ॥४७॥
करीं घेऊन पादुका । झ्यामसिंगास बोलला देखा ।
भोकरे जो का पुंडलिका । तुमच्या गांवींचा असे हो ॥४८॥
त्यास ह्या द्या नेऊन । करायासी पूजन ।
तें झ्यामसिंगें ऐकून । पादुका घेतां जहाला ॥४९॥
झ्यामसिंग आला मुंडगांवांत । तों पुंडलिक भेटला वेशींत ।
पुसूं लागला त्याप्रत । कुशलवृत्त समर्थांचें ॥५०॥
प्रसाद मला द्यावयासी । कांहीं दिला का तुम्हांपासी ? ।
हें ऐकतां झ्यामसिंगासी । महदाश्चर्य वाटलें ॥५१॥
सवें घेऊन पुंडलिकाला । झ्यामसिंग घेऊन घरीं गेला ।
खोदून विचारूं लागला । तूं ऐसें कां विचारिलें ? ॥५२॥
पुंडलिकानें स्वप्नाची । गोष्ट त्याला कथिली साची ।
ती ऐकतां झ्यामसिंगाची । भ्रांति नष्ट झाली हो ॥५३॥
लगेच पादुका काढिल्या । पुंडलिकाच्या हातीं दिल्या ।
त्याच अजून आहेत भल्या । मुंडगांवांत त्याच्या घरीं ॥५४॥
दोन प्रहरीं पूजन । पुंडलिकानें केलें जाण ।
मनोभावें करून । त्या प्रसादी पादुकांचें ॥५५॥
पहा श्रोते खरें संत । सांभाळिती आपुलें भक्त ।
आडमार्गानें किंचित् । जाऊं न देती तयांला ॥५६॥
निज भक्ताचे मनोरथ । समर्थ कैसे पुरवितात ।
तें येईल ध्यानांत । या कथेतें ऐकतां ॥५७॥
एक माध्यंदिन ब्राह्मण । कवर राजाराम म्हणून ।
होता धंदा करून । अकोल्यांत सराफीचा ॥५८॥
सोने चांदी भुसार । घेणें देणें साचार ।
मध्यम प्रतीचा सावकार । हा राजाराम कवर असे ॥५९॥
या राजारामाप्रती । महाराजाची होती भक्ती ।
म्हणून त्याची संतती । मानूं लागली समर्था ॥६०॥
या कवराकारण । दोन पुत्र होते जाण ।
गोपाळ त्र्यंबक म्हणून । लव्हांकुशांसारिखे ॥६१॥
कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती । भाऊस व्यवहारीं बोलती ।
तो हैद्राबादेप्रती । गेला डाँक्टरी शिकावया ॥६२॥
लहानपणापासून । भाऊस होतें देवध्यान ।
म्हणजे त्र्यंबकालागून । हें येथें विसरूं नका ॥६३॥
कांहीं संकट पडल्यावरी । तो समर्थांचा आठव करी ।
राहून त्या भागानगरीं । मुसा नदीच्या कांठाला ॥६४॥
एवंच भाऊ भक्तिमान । होता लहानपणापासून ।
त्याचें दैवत गजानन । स्वामी शेगांवग्रामींचें ॥६५॥
तो सुटीमाजीं आला घरीं । इच्छा उपजली अंतरीं ।
जाऊनिया शेगांवनगरीं । जेवूं घालावें महाराजा ॥६६॥
पदार्थ त्यांच्या आवडीचे । करोनिया सर्व साचे ।
परी हें कैसें व्हावयाचें ? । हाच विचार पडला कीं ॥६७॥
भाऊ म्हणे गुरुनाथा । काय तरी करूं आतां ।
मरून गेली माझी माता । लहानपणींच दयाळा ॥६८॥
घरीं माझें नाही कोणी । एक बंधूची कामिनी ।
जिचें नांव आहे नानी । स्वभाव तापट तियेचा ॥६९॥
माझ्या आहे ऐसें मनीं । आपण करावी मेजवानी ।
आपुल्या आवडीचे करोनी । पदार्थ सारे गुरुराया ! ॥७०॥
भाकरी ती ज्वारीची । कांदा भाजी आंबाड्याची ।
ऊन पिठलें हिरवी मिर्ची । ऐसें तयार करावें ॥७१॥
हे पदार्थ करण्याला । सांगूं कसा मी भावजईला ? ।
हट्ट एक करण्याला । माता तेंच स्थान असे ॥७२॥
ऐसा विचार करीत । भाऊ राहिला निवांत ।
तों कांहीं कामानिमित्त । नानी आली ते ठायां ॥७३॥
नानी दिराला बोलली । चिंता कशाची लागली ? ।
मुखश्री ती म्लान झाली । तुमची कशानें ये वेळां ? ॥७४॥
भाऊ वदे दीनवाणी । काय तुला सांगूं वहिनी ? ।
माझे जे कां आले मनीं । विचार ते ये वेळां ॥७५॥
पूर्ण सत्तेवांचून । मनोरथ ना होती पूर्ण ।
म्हणून तुला सांगून । काय करणें आहे गें ॥७६॥
नानी म्हणे त्यावर । सांगून पहा एकवार ।
तूं माझा धाकटा दीर । मशीं पडदा ठेवूं नये ॥७७॥
ज्येष्ठ भ्राता पित्यापरी । तत् कांता माय खरी ।
मानिली पाहिजे साजिरी । तें तुम्ही जाणतसा ॥७८॥
तें ऐकून भाऊ हंसला । नानीप्रती बोलता झाला ।
नानी माझ्या मनाला । आज ऐसें वाटतें ॥७९॥
गजाननाच्या आवडीचे । सर्व पदार्थ करून साचे ।
आहेत मला न्यावयाचे । त्यांना द्याया शेगांवीं ॥८०॥
तें तूं जरी करशील । तरी तुलाही लागेल ।
पुण्य आणि होईल । काम माझें त्यायोगें ॥८१॥
तें ऐकतां बोले नानी । दिराप्रती हास्यवदनीं ।
यासाठींच कां हो मनीं । सचिंत तुम्हीं बैसलात ? ॥८२॥
सांगा आहे काय कारणें । मजला स्पष्ट शब्दानें ? ।
कांहीं ना आपुल्या गेहीं उणें । कृपेनें गजाननाच्या ॥८३॥
मग भाऊनें सर्व कांहीं । निवेदन केलें तिला पाही ।
तीही लागली लवलाही । आनंदानें स्वयंपाका ॥८४॥
भाजी चून भाकर । हिरव्या मिरच्या ओंजळभर ।
ठेविल्या आणून समोर । आपुल्या त्या दिराच्या ॥८५॥
भाकरी तीन, कांदे तीन । हरभर्याचें चून जाण ।
लोणी ठेविलें माखून । प्रत्येक त्या भाकरीला ॥८६॥
नानी म्हणाली दिराला । जा आतां शेगांवाला ।
वेळ थोडका राहिला । आहे पाहा गाडीस ॥८७॥
ती गाडी चुकल्यावरी । वाया जाईल तयारी ।
भोजनाच्या वेळेवरी । गेलांत तरी उपयोग ॥८८॥
ऐसेम नानीं बोलतां । भाऊ निघाला तत्त्वतां ।
पुसूनियां आपुल्या ताता । येतां झाला स्टेशनासी ॥८९॥
तों गाडी बाराची । निघूनियां गेली साची ।
तेणें चित्तवृत्ति भाऊची । होती झाली शोकाकुल ॥९०॥
अति हिरमोड त्याचा झाला । पाणी आलें लोचनांला ।
म्हणे महाराज कां हो केला । अव्हेर माझा ये कालीं ? ॥९१॥
मी मुळींच हीन दीन । कोठून घडावें मला पुण्य ? ।
आम्हां कावळ्यांकारण । लाभ केवीं मानसाचा ॥९२॥
अक्षम्य ऐसी कोणती । चुकी झाली माझ्या हातीं ।
म्हणून माझी गुरुमूर्ति । गाडी चुकली ये वेळां ? ॥९३॥
हाय हाय हे दुर्दैवा ! । त्वां माझा साधिला दावा ।
माझ्या करीं गुरुसेवा । घडूं न दिली आज तूं ॥९४॥
ही माझी शिदोरी । ऐशीच आज राहिली जरी ।
नाहीं करणार भोजन तरी । सत्य सत्य त्रिवाचा ॥९५॥
गुरुराया कृपारासी । नका उपेक्षूं लेंकरासी ।
ही शिदोरी सेवण्यासी । यावें धांवून सत्वर ॥९६॥
थोर आपुला अधिकार । क्षणांत पहातां केदार ।
मग या या येथवर । कां हो अनमान करितसां ? ॥९७॥
मी न आज्ञा तुम्हां करितों । प्रेमानें हांका मारितों ।
म्हणूनियां हा न होतो । अपमान तुमचा यत्किंचित् ॥९८॥
तीन घंटे अजून । अवकाश गाडीकारण ।
तोंवरी आपुलें भोजन । होईल ऐसें वाटतें ॥९९॥
ऐसा विचार करीत । तेथेंच बैसला उपोषित ।
चतुर्थ प्रहरीं शेगांवांत । आला तिहीच्या गाडीनें ॥१००॥
कवर गेला दर्शना । तईं तो योगीराणा ।
न करितां भोजना । बसला होता आसनीं ॥१॥
नैवेद्याची अतोनात । ताटें होतीं मठांत ।
पक्वान्नांनीं परिप्लुत । तीं वर्णावी कोठवरी ? ॥२॥
कोणाच्या जिलब्या घीवर । कोणाचा तो मोतीचूर ।
कोणाची ती नुसती खीर । श्रीखंड पुर्या कोणाच्या ॥३॥
परी त्या नैवेद्याला । समर्थांनीं ना स्पर्श केला ।
वरच्यावरी ताटाला । बाळा आणून ठेवीं पुढें ॥४॥
आणि म्हणे हें करा ग्रहण । गेला एक वाजून ।
आपुलें न झाल्या जेवण । प्रसाद भक्तां मिळतो कसा ? ॥५॥
त्यांची ते वाट पाहती । करण्या आपणां विनंति ।
त्यांची नसे होत छाती । म्हणून मी बोललों ॥६॥
तैं महाराज म्हणती थांब जरा । आग्रह नको करूंस खरा ।
आज भोजन चौथे प्रहरा । माझें होणार आहे रे ॥७॥
मर्जी असल्यास थांबावें । ना तरी खुशाल जेवावें ।
नैवेद्य घेऊनि घरा जावें । पर्वा नाही त्याची मला ॥८॥
ऐसा प्रकार तेथें झाला । तों इतुक्यांत भाऊ आला ।
समर्थ पाहतां आनंदला । भाऊ आपल्या मानसीं ॥९॥
दुरावलेली माय जेवीं । बाळकें दृष्टि पहावी ।
झालें असे पहा तेवीं । भाऊ कवराकारणें ॥११०॥
समर्थासी नमस्कार । केला साष्टांग साचार ।
उभा राहिला जोडोनी कर । वाट पाहत आज्ञेची ॥११॥
त्या भाऊस पाहून । समर्थें केलें हास्यवदन ।
बरेंच दिलेंस आमंत्रण । ही कां वेळ जेवण्याची ? ॥१२॥
तुझ्या भाकेंत गुंतलों । मी उपोषित राहिलों ।
नाहीं अजून जेवलों । आण तुझी शिदोरी ॥१३॥
ऐसें महाराज बोलतां । हर्षलासे कवर चित्ता ।
म्हणे काय करूं गुरुनाथा । गाडी चुकली बाराची ॥१४॥
कवरास म्हणे बाळाभाऊ । आतां नको दुःखित होऊं ।
काय आणलें आहेस पाहूं ? । समर्थासी जेवावया ॥१५॥
ऐसें ऐकतां सत्वरीं । कांदे भाजी भाकरी ।
कवरानें ठेविल्या समोरी । स्वामी गजाननाच्या ॥१६॥
त्यांतील भाकरी दोन । समर्थें केल्या भक्षण ।
एकीची तो प्रसाद म्हणून । अवघ्या भक्तां वांटिली ॥१७॥
तो प्रकार पहातां । आश्चर्य झालें समस्तां ।
कळली स्वामींची योग्यता । खरेच भक्तवत्सल ते ॥१८॥
जेवीं हस्तिनापुरांत । भगवंतानें ठेविला हेत ।
सोडून पक्वानाप्रत । विदुराच्या हुलग्यांवरी ॥१९॥
तैसेंच येथें आज झालें । आमचें पक्वान्न नाहीं रुचलें ।
भाकरीवरी गुंतलें । चित्त कवराच्या स्वामींचें ॥१२०॥
भाऊंनीही घेतला । सनर्थप्रसाद शेगांवला ।
सद्भाव येथें उदेला । तेथें ऐसेंच होणार ॥२१॥
समर्थ बोलले कवरासी । जा आतां अकोल्यासी ।
पास होशील पुढचे वर्षी । तूं डाँक्टरी परीक्षेंत ॥२२॥
भाऊ म्हणे गुरुराया । आपुली असूं द्यावी दया ।
यांविण दुसरें मागावया । मी न आलों ये ठाया ॥२३॥
आपुले हे दिव्य चरण । हेंच माझें धनमान ।
सर्वदा घडो चिंतन । आपल्या दिव्य मूर्तीचें ॥२४॥
ऐसें बोलून अकोल्याला । भाऊ कवर निघून गेला ।
समर्थ आपल्या भक्ताला । नुपेक्षिती कधींही ॥२५॥
शेगांवींचा राहणार । तुकाराम शेगोकार ।
एक होता भाविक नर । कृषिकर्म करीतसे ॥२६॥
घरची गरीबी होती खरी । काम करोनी शेतांतरीं ।
अस्तमानाचे अवसरीं । दर्शना यावें मठांत ॥२७॥
चिलीम द्यावी भरून । घ्यावें पदाचें दर्शन ।
कांहीं वेळ बसून । जावें पुन्हां शेतांतें ॥२८॥
ऐसा नित्यक्रम तयाचा । बहुत दिवस चालला साचा ।
घाला विचित्र दैवाचा । तो न कोणा सोडितसे ॥२९॥
जें जें असेल दैवांत । तें तें श्रोते घडून येत ।
एके दिनीं शेतांत । असतां तुकाराम आपुल्या ॥१३०॥
तों एक आला शिकारी । बंदुक ज्याच्या खांद्यावरी ।
नेम धरून ससे मारी । छरे घालून बंदुकींत ॥३१॥
ती प्रभातीची होती वेळा । सूर्य नुकतां उदयाला ।
तुकाराम होता बसला । आपल्या शेंती शेकत ॥३२॥
तों त्याच्या मागें कुपाटिला । एक होता बसलेला ।
ससा शुभ्र तोचि पडला । शिकार्याच्या दृष्टीसी ॥३३॥
त्याची शिकार करण्या भली । शिकार्यानें आपुली ।
नेम धरून झाडिली । खांद्यावरील बंदुक ॥३४॥
त्यायोगें ससा मेला । एक छरा लागला ।
त्या तुकाराम माळ्याला । कानामागें अवचित ॥३५॥
छरा मोठा जोरदार । मस्तकीं शिरला अखेर ।
थकले अवघे डाँक्टर । प्रयोग करून त्याचेवरी ॥३६॥
कांहीं केल्या निघेना । छरा तो डाँक्टरांना ।
होऊं लागल्या यातना । तुकारामासी अतिशय ॥३७॥
मस्तक दुखे अहोरात्र । निद्रा न लागे किंचित ।
नवस सायास केले बहुत । परी गुण येईना ॥३८॥
ऐशाही अवस्थेंत । यावें त्यानें मठांत ।
एके दिवशीं तो समर्थांचा एक भक्त । ऐसें बोलला तयाला ॥३९॥
डाँक्टर वैद्य सोडा आतां । साधूचिया सेवेपरता ।
नाहीं उपाय कोणता । उत्तम या जगामध्यें ॥१४०॥
कृपा त्यांची झाल्यास । चुकेल हा तुझा त्रास ।
झाडीत जा आसपास । या मठाच्या नित्य तूं ॥४१॥
तेव्हां सेवा ही घडेल । पुण्य़ तेंही लाधेल ।
कृपा झाल्या होशील । त्रासापासून मोकळा ॥४२॥
मात्र आपुल्या पित्यावरी । दांभिकतेनें हें ना करी ।
शुध्द भाव अंतरीं । सर्वकाळ धरावा ॥४३॥
तें तुकारामासी मानवलें । झाडणें त्यानें सुरूं केलें ।
अवघ्या मठास ठेविलें । स्वच्छ त्यानें आरशापरी ॥४४॥
ऐसीं चौदा वर्षें झालीं । तुकारामाई सेवा भली ।
तईं गोष्ट घडून आली । ऐशा रीतिं श्रोते हो ॥४५॥
झाडतां झाडतां कानांतून । छरा पडला गळून ।
जैसी कांती भोकरांतून । दावितां सुटे आंठोळी ॥४६॥
तैसें साच येथें झालें । छरा पडतां थांबलें ।
दुखावयाचें मस्तक भलें । ऐसा प्रभाव सेवेचा ॥४७॥
ही सेवा झाडण्याची । अखेरपर्यंत केली साची ।
प्रचीतिवीण कवणाची । परमार्थीं न निष्ठा बसे ॥४८॥
ती एकदां बसल्यावर । मग मात्र होते स्थिर ।
संतसेवा महाथोर । हे भाविक जाणती ॥४९॥
स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
तारक होवो भाविकांप्रत । भवसिंधुमाझारीं ॥१५०॥
शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥