Gajanan Maharaj Punyatithi विदर्भाची पंढरी अशी ओळख असणार्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील गजानन महाराज हे दत्तात्रेय संप्रदायाचे गुरू म्हणून पूजले जातात. त्यांचा जन्म नक्की कधी झाला हे माहीत नाही, परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात 23 फेब्रुवारी 1878 साली दिसले होते. म्हणून त्यांचे भक्त ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरी करतात. तसेच गजानन महाराजांनी 8 सप्टेंबर 1910 ऋषीपंचमी या दिवशी समाधी घेतली होती म्हणून हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळतात.
गजानन महाराजांचे चरित्र दासगणू महाराजांनी 'श्रीगजानन विजय' ग्रंथामध्ये लिहिले आहे. या ग्रंथात महाराजांच्या आयुष्यातील अनेक आख्यायिका आणि ऐतिहासिक घटना वाचायला मिळतात. शिवाय आजही अनेक भक्तांना महाराजांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे भाविकांचे अनुभव आहे.
गजानन महाराज शेगांव येथे दिगंबरावस्थेत लोकांच्या प्रथम दृष्टीस पडले होते. त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. असे म्हटले जाते की गजानन महाराज शेगावी येण्याच्या आधी बाल दिगंबर अवस्थेत अक्कोलकोटचे दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांकडे राहिले तेथे राहुन त्यांनी बाललीला दाखवल्या. मग स्वामींनी त्यांना त्यांच्या कार्याची अनुभुती करून दिली व गुरुदिक्षा दिली. तिथुन गजानन महाराज शेगावी आले.
सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस, वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात अशी त्यांची शरीरयष्टी होती. पाय अनवाणी आणि हाती असलीच तर कपडा गुंडाळलेली चिलीम असे.
गजानन महाराजांनी जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करुन देण्यासाठी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग असल्याचे सांगितले.
गजानन महाराज समाधी
गजानन महाराजांना जेव्हा आपल्या अवतार समाप्तीची वेळ आल्याचे समजले तेव्हा ते हरी पाटलासोबत पंढरीला गेले. त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा असल्याचे सांगितले जाते परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले. गजानन महाराजांनी ऋषिपंचमीच्या पुण्यदिवशी समाधी घेतली.
समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले भाविकांना धीर देत सांगितले की मी गेलों ऐसें मानूं नका । भक्तींत अंतर करुं नका । कदा मजलागीं विसरुं नका । मी आहे येथेंच ॥
शके अठराशें बत्तीस । साधारण नाम संवत्सरास ।
भाद्रपद शुद्ध पंचमीस । गुरुवारीं प्रहर दिवसाला ॥
प्राण रोधिता शब्द केला । जय गजानन ऐसा भला ।
सच्चिदानंदीं लीन झाला । शेगांवामाझारीं ॥
महाराजांनी समाधी घेतल्याचे समजतात लाखोंच्या संख्येने लोक त्या प्रसंगी हजर होते. श्रृंगारित रथात ठेवलेल्या महाराजांच्या देहावर अबीर, गुलाल, फुले, तुळशी आणि पैसे उधळले असून संपूर्ण शेगावातून मिरवणूक काढून पहाटे मंदिरात आल्यावर महाराजांवर पुन्हा अभिषेक केला गेला. शास्त्राप्रमाणे देह उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला. अखेरची आरती ओवाळून मीठ, अर्गजा, अबीर ह्यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जयजयकार केला, जय स्वामी गजानन आणि शिळा लावून समाधीची जागा बंद केली.
गजानन महाराजांनी 8 सप्टेंबर 1910 रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी शेगाव येथे समाधी घेतली. गजानन महाराज पुण्यतिथी या निमित्ताने समाधी उत्सव म्हणून येथे भक्तांची दर्शनासाठी गर्दी असते.