असा केला कसाबने हल्ला

वेबदुनिया

सोमवार, 3 मे 2010 (16:39 IST)
कुबेर नावाच्या बोटीतून आपल्या सहकार्‍यांसमवेत गेट वे ऑफ इंडियाला आल्यानंतर कसाबने मोर्चा वळवला तो छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे. त्याच्याबरोबर होता इस्माईल खान हा अन्य एक दहशतवादी. सीएसटीमध्ये अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर कसाब टाईम्स ऑफ इंडियाजवळच्या एका गल्लीतून बाहेर पडला.

कामा हॉस्पिटलच्या दिशेने जाणार्‍या पोलिसांच्या टोयोटो क्वालिस या गाडीवर त्याने हल्ला चढवला. यातच महाराष्ट्र एटिएसचे प्रमुख हेमंत करकरे, पोलिस उपायुक्त अशोक कामटे, एनकाऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांचा मृत्यू झाला. त्यांना मारल्यानंतर दोघे गाडी घेऊन मेट्रो सिनेमाच्या दिशेने गेले. जाताना गाडीत दोन जिवंत कॉन्स्टेबलही होते. पण ते मेलेले असावेत असे त्यांना वाटले. पण त्यातल्या एका हवालदाराच्या मोबाईलची रिंग वाजल्यानंतर त्याने मागे गोळीबार केला. त्यात तो हवालदार ठार झाला. विधान भवनाच्या दिशेने जात असतानाही त्यांनी गोळीबार केला. पण पुढे त्यांची गाडी पंक्चर झाली. मग त्यांनी एक स्कोडा गाडी पळवली. आणि गिरगाव चौपाटीच्या दिशेने गेले.

तत्पूर्वी डि.बी.मार्ग पोलिस स्टेशनच्या कंट्रोल रूममध्ये दोन सशस्त्र लोक सीएसटीवर गोळीबार करून पळाले आहेत, असा संदेश आला होता. यानंतर डिबी मार्ग ठाण्याचे पंधरा पोलिस चौपाटीवर बॅरीकेड टाकून तपास अभियान राबवत होते. त्यांच्याकडे दोन रायफल, दोन रिव्हॉल्वर आणि लाठ्या तेवढ्या होत्या. कसाबची स्कोडा गाडी बॅरीकेडपर्यंत पोहोचली. पण ती अडल्याने वळविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिस व त्यांच्यात चकमक सुरू झाली. यात अबू इस्लमाईल ठार झाला. कसाबने आपणही मेल्याचे ढोंग केले. त्याचवेळी पोलिस उपनिरिक्षक तुकाराम ओंबळे यांनी धाव घेऊन कसाबला पकडले. परंतु, कसाबने गोळ्या झाडत त्यांना ठार केले. परंतु, ओंबळेंनी त्याला सोडले नाही. घट्ट पकडून ठेवले होते. त्याचा फायदा उचलत बाकीच्या पोलिसांनी त्याला पकडले. परंतु, या घडामोडीत ओंबळे मात्र शहिद झाले.

अशा रितीने कित्येकांना ठार मारणारा क्रूरकर्मा कसाब पकडला गेला.

वेबदुनिया वर वाचा