बॉलीवूड निर्माता- दिग्दर्शक नेहमीच चांगल्या कथेच्या शोधात असतात.त्यातल्या त्यात सत्य घटनांवर आधारीत चित्रपट बनविणे त्यांना नेहमीच खुणावते. मुंबईवरील झालेला हल्ला ही अशीच एक घटना. त्यानंतरही अनेक निर्माता, दिग्दर्शकांनी त्यावर चित्रपट बनविण्याचे जाहिर केले. अनेकांनी चित्रपटाची नावे रजिस्टर्ड केली. असे वाटले की पुढच्या दोन-तीन महिन्यांत हे चित्रपट आपल्याला पहायला मिळतील. पण तसे झाले नाही. जेमतेम एखाद-दुसर्या चित्रपटांचे शुटींग सुरू असल्याची बातमी तेवढी हाती येते आहे.
याचे कारण असे की चित्रपटांची घोषणा करणारे निर्माता-दिग्दर्शक दुय्यम-तिय्यम दर्जाचे होते. त्यांना फक्त संधीचा फायदा उठवून चर्चेत यायचे होते. अनेकांनी हा विषय आपल्याला झेपणार नाही म्हणून सोडून दिला.
दहशतवादी हल्ल्यानंतर ताज हॉटेल पहायला मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासोबत रामगोपाल वर्माही आला होता. रामूला यावर चित्रपट बनवायचा होता, म्हणूनच तो त्यांच्यासोबत आला अशी टीकाही त्यावेळी झाली. रामू आणि विलासराव दोघेही मीडीयाच्या टीकेचे लक्ष्य ठरले. विलासरावांना आपल्या 'बॉलीवूड कनेक्शनमुळे' दुसर्यांदा मुख्यमंत्रिपद सोडावे लागले. रामूने या घटनेतून चित्रपटाचा मसाला शोधण्याचा प्रयत्न केला, त्याला त्यातून लोकांचे दुःख दिसले नाही, अशी टीकाही झाली. पण अजूनपर्यंत रामूचा या विषयावर चित्रपट आलेला नाही.
सफायर ओरिजन यांनी 'उन हजारों के नाम' नावाची टेलिफिल्म तयार करून हा विषय मांडला आहे. त्यात विनोद खन्ना, सीमा विश्वास आणि सादिया सिद्दकी यांनी काम केले आहे. स्टार प्लसवर २६ नोव्हेंबरला रात्री ही फिल्म दाखवली जाईल.
अमेरिकी हल्ल्यांवर आधारीत अनेक चित्रपट बनविले जात आहेत. त्याची हाताळणीही तितक्याच गंभीरपणे केली जात आहे. मुंबई हल्ल्याच्या बाबतीत तसे घडले नाही. या विषयाची हाताळणी गंभीर दिग्दर्शकानेच करण्याची गरज आहे. तोच या विषयाला न्याय देऊ शकेल. अन्यथा त्याला काहीही अर्थ उरणार नाही.