मुंबई हल्ला आणि टेक्नॉलॉजी

वेबदुनिया

मंगळवार, 24 नोव्हेंबर 2009 (15:44 IST)
ND
ND
मुंबई हल्ल्यातून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे तंत्रज्ञानाचा झालेला वापर. अर्थात दोघांकडून अतिरेकी आणि लोकांकडूनही. या दहशतवाद्यांना इतका मोठा हल्ला करण्यात तंत्रज्ञानाची फार मोठी मदत झाली.

अतिरेक्यांनी गुगल अर्थ या गुगलच्या सेवेचा उपयोग करून त्यांना हल्ला करण्याची ठिकाणे नकाशाच्या माध्यमातून समाजावून घेतली. बारीक सारीक माहिती त्यांना या आयत्या नकाशाच्या आधारे मिळाली. ज्या हॉटेल्सवर हल्ला करायचे त्यांचे नकाशे तर त्यांनी मिळवलेच, पण त्याच्या आतली रचनाही त्यांना याच माध्यमातून कळाली. ब्लॅकबेरी, जीपीएस नेव्हिगेटर्स, हल्ल्याच्या ठिकाणांची सुस्पष्ट चित्रे असलेल्या सीडी, स्विचेबल सिमकार्ड्स असलेले मल्टिपल सेलफोन (यांना ट्रॅक करणे अवघड असते), सॅटेलाईट फोन अशा अत्याधुनिक तंत्रज्ञनाने हे दहशतवादी सज्ज होते.

या अतिरेक्यांना ही टेक्नॉलॉजी कशी वापरायची याचे शिक्षणही देण्यात आले होते. या हल्ल्याच्या काळात इंटरनेटच्या माध्यमातून कॉल केल्याचेही उघड झाल्यानंतर पोलिसही हैराण झाले. शिवाय सॅटेलाईट फोनचाही त्यांना वापर केला. सॅटेलाईट फोनच्या माध्यमातून ते पाकिस्तानात बसलेल्या म्होरक्यांशी संपर्क साधत होते. तिकडे तीच मंडळी टिव्हीवर चाललेल्या लाईव्ह कव्हरेजच्या आधारे या दहशतवाद्यांना सुचना देत होती. सॅटेलाईट फोन आणि मल्टिपल सीम फोन या दोहोच्या माध्यमातून होणारे बोलणे ट्रॅक करणे अवघड जाते. अतिरेक्यांनी जे ई -मेल्स पाठवले तेही वेगवेगल्या सर्व्हरच्या माध्यमातून. त्यामुळे ते शोधणे अत्यंत जिकिरीचे होते. या दहशतवाद्यांना अरबी समुद्रात प्रसंगी होडी चालवता येत नसेल, पण जीपीरएस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने इच्छित दिशेला कसे जायचे याचे ज्ञान होते, म्हणूनच कराची ते मुंबई हे अंतर ते विनायास पार करू शकले.

तंत्रज्ञानाचा उपयोग लोकांनाही भरपूर झाला. या काळात मोबाईल फोनच्या माध्यमातून बरीच माहिती बाहेर पडली. हल्ल्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष असलेल्यांनी मोबाईल फोनच्या माध्यमातून हा हल्ला जगभर पोहोचविला. ताज किंवा इतर हॉटेलमध्ये अडकलेले फोनच्या माध्यमातून जगाशी संवाद साधत होते. हल्ल्याच्या परिसरात असलेल्यांनी फ्लिकरसारख्या साईट्सवर तातडीने ताजे फोटो अपलोड करून हा हल्ला जगात पोहोचवला. त्याचवेळी ट्विटवरवरही जोरदार ब्लॉगिंग सुरू होते. मिनिटामिनिटाची खबर पोहोचवली जात होती. टिव्हीवर या घटनांचे लाईव्ह कव्हरेज होतेच, पण न्यूज वेबसाईट्सही या घटनेचा इत्यंभूत रिपोर्ताज लोकांना कळविण्यात तत्पर भूमिका पार पाडत होत्या.

एकीकडे तंत्रज्ञानाचा इतका मुक्त हस्ते वापर होत असताना लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी असलेल्या सरकारी यंत्रणा तंत्रज्ञानाच्या बाबतीत मागे पडल्याचे दिसून आले. दहशतवाद्यांनी ओलिस ठेवलेल्या हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर रात्रीच्या अंधारात दिसू शकेल असे विशिष्ट प्रकारचे गॉगल्सही या यंत्रणेकडे नव्हते. अत्याधुनिक शस्त्रांचा अभाव तर होताच. पण हॉटेल्सच्या आतल्या खोल्यांचे नकाशेही त्यांच्याकडे नव्हते. कुठून कसे जायचे हेही त्यांना माहित नव्हते. त्याचवेळी अतिरेकी मात्र या सार्‍या गोष्टींनी सुसज्ज होते.

वेबदुनिया वर वाचा