मुंबईच्‍या रक्षणासाठी 'फोर्स वन' सज्ज

वेबदुनिया

बुधवार, 25 नोव्हेंबर 2009 (18:06 IST)
PTI
देशाच्‍या आर्थिक राजधानी मुंबईवर झालेल्‍या हल्‍ल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर भविष्‍यात अशा प्रकारच्‍या हल्‍ल्‍यांना प्रत्युत्तर देण्‍यासाठी एनएसजी प्रमाणे मुंबईसाठी 'फोर्स वन' या नवीन विशेष कमांडो पथकाची पहिली बॅच ट्रेनिंग घेऊन तयार झाली असून या पहिल्‍या तुकडीने गोरेगाव येथे आपला मोर्चा सांभाळला आहे. या तुकडीत सध्‍या 216 जवान असून मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्‍या उपस्थितीत 24 नोव्‍हेंबर रोजी या तुकडीचे पहिल्‍या संचलन करण्‍यात आले.

PTI
मुंबईत 26/11 च्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी राज्य पातळीवर दहशतवाद्यांच्‍या मुकाबल्‍यासाठी एनएसजीच्‍या धर्तीवर अशा प्रकारचे कमांडो पथक तयार करण्‍याचा निर्णय घेतला होता. फोर्स वनच्‍या जवानांना सुमारे 126 कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक शस्‍त्रास्‍त्रे तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण देण्‍यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी आणखी शंभर कोटी रुपये खर्च करून त्‍याची व्‍याप्‍ती वाढविण्‍याचा सरकारचा विचार आहे. अत्याधुनिक शस्‍त्रांनी सज्ज असलेली महाराष्ट्र पोलीस दलाची फोर्सवन कुठेही आवश्‍यकता भासल्‍यास जाण्‍यास सज्ज असणार आहे.

PTI
या पथकाचे लोकार्पण मुख्‍यमंत्री अशोक चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते नुकतेच करण्‍यात आले यावेळी उपमुख्‍यमंत्री छगन भूजबळ आणि गृह मंत्री आर.आर.पाटील हे देखिल उपस्थित होते. हल्‍ल्‍यानंतर एका वर्षाच्‍या आत अशा प्रकारचे दल तयार केल्‍याबद्दल मुख्‍यमंत्र्यांनी यावेळी अधिका-यांना शुभेच्‍छा दिल्‍या आहेत.

PTI
राज्‍याच्‍या संरक्षण विषयक गरजा पूर्ण करण्‍यासाठी आणि पोलीस व संरक्षण दलाच्‍या अत्याधुनिकरणासाठी गृह विभागाला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्‍ध करून देण्‍याचे आश्‍वासनही त्यांनी दिले. तर 26/11 च्‍या हल्‍ल्‍यातील मृतांच्‍या कुटुंबीयांसाठी विशेष योजना उभारण्‍याचे वचनही यावेळी मुख्‍यमंत्र्यांनी दिले.

‘फोर्स वन’ दहशतवादी आव्‍हानांचा सामना करण्‍यास सदैव सज्ज असल्‍याचे यावेळी एटीएस प्रमुख के. पी.रघुवंशी यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा