रविवार, 20 जून 2021 (10:34 IST)
आज मनाच्या खोल भावनांना,
शब्दांचं रूप देऊन,
एका कवितेत लिहायचं होतं
कारण तुमच्या वियोगाच्या चटक्यांना,
तुमच्या आठवणींच्या मुसळधार पाऊसाने,
भिजूनच विसरायचं होतं
खायला दवडणाऱ्या या जगात,
तुमच्या सुरक्षेच्या छायेत अजून बसायचं होतं
तुमच्या शांत,स्नेही डोळ्या मागचं,
प्रेमाचं गणित आणि कोडं समजायचं होतं
अडथळ्यांनी भरलेल्या काट्यांच्या रस्त्यावर,
तुमचं बोट धरूनच चालायचं होतं
पण तुमच्या अशक्त आणि वृद्ध शरीराला,
रोगांच्या कष्टांपासून जपायचं होतं
ओंजळीत भरून आणलेल्या पूजेच्या फुलांना,
कोथिंबीर सोबतच निवडायचं होतं
मधेच एखाद्या जुन्या विनोदावर,
तुमच्या सोबत उगाचच हसायचं होतं
टी. व्ही बघताना औषध विसरल्यावर,
खोटं नाटं तुमच्यावर रागवायचं होतं
ओथंबून आलेल्या सर्व भावनांना,
मनमोकळ करून सांगायचं होतं
नातवंडांच्या लग्न सोहळ्यात,
स्मित चेहरा घेऊन मिरवताना..
खुदकन हसून सर्वांशी बोलताना,
गर्वाने तुम्हाला पाहायचं होतं
ऊन पावसाच्या खेळात,
स्वयंपाकात आज काय करायचं
किती मीठ कमी, किती गोड कमी
हे अजून ठरवायचं होतं
माझी नवीन रचना प्रकाशित झाल्याचं,
सर्वप्रथम तुम्हालाच कळवायचं होतं
एखादं चित्र काढल्यावर पण,
प्रथम तुम्हालाच दाखवायचं होतं
तुमच्या वेगळेपणाच्या गंधानी,
ह्या घराचं वातावरण भरायचं होतं
तुम्हाला तुमच्या आवडत्या कलाकाराच्या,
एखाद्या चलचित्र किंवा नाटकाला न्यायचं होतं
कसल्याही परिस्थितीला हसून हाताळायचे,
हे तुमच्या कडूनच शिकायचं होतं
तुमच्या प्रोत्साहनाची दोर धरून,
आकाशात उन्मुक्त उडायचं होतं
बरच काही तुमच्या साठी
मला अजून करायचं होतं
आईच्या गळ्यात तुमच्या नावाचं,
एक नवं मंगळसूत्र घालायचं होतं
नातवंडांचे व्हिडीओ पाहून,
तृप्तीने कौतुक करताना पाहायचं होतं
संसाराच्या गूढ वनात आम्हाला एकटे सोडून,
असं घाईने तुम्हाला कुठे जायचं होतं?
ज्यांना आहे वडील
त्यांनी मनसोक्त संवाद साधावे,
नाही तर शेवटी म्हणाल,
" बाबा तुमच्याशी काही तरी म्हणायचं होतं,
काही तरी बोलायचं होतं.."
अंजना माणके