मराठी.वेबदुनिया.कॉम या संकेतस्थळातर्फे अवघ्या महाराष्ट्रभर प्रसिद्धी मोहिम आखली असून याचा शुभारंभ सोमवारी (ता. १४) नागपूरमध्ये अपूर्व प्रतिसादात झाला. या उपक्रमाच्या माध्यमातून हे मराठी संकेतस्थळ जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
आज सकाळी नागपूरच्या डॉल्फिन शाळेतून या उपक्रमाला प्रारंभ झाला. प्रचारक संदीप कदम यांनी विद्यार्थ्यांना वेबदुनियातील विविध सदरांची माहिती दिली. यात ठळक बातम्या, करीयर, साहित्य, फोटो गॅलरी, गेम्स, मेल, आदी सदरांचा समावेश होता. वेबदुनियाच्या विविध सेवाही त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या.
इंटरनेटचे जग सध्या विध्यार्थ्यांना आकर्षित करत असून, अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंटरनेट विश्वाची माहिती मिळते आणि त्यांच्या ज्ञानात वाढ होत असल्याचे मत डॉल्फीनच्या मुख्याध्यापिका नीता दुबे यांनी व्यक्त केले. गेम्सच्या माध्यमातून चांगले मनोरंजन झाल्याचे संदीप झा या विद्यार्थ्याने सांगितले.
विद्यार्थ्यांना विविध प्रश्न यावेळी विचारण्यात आले. उत्तरे देणार्या विद्यार्थ्यांना बक्षिस म्हणून वेबदुनियाच्या कॅप्स देण्यात आल्या. याच सोबत सिंधी हिंदी स्कूलमध्येही असेच कार्यक्रम घेण्यात आले.
अवघ्या वर्षभरापूर्वी मराठीत पाय ठेवलेल्या वेबदुनियाने आता पाय रोवण्यापर्यंतची मजल मारली आहे. बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडींवरील लेख, धर्म, साहित्य, आरोग्य, क्रीडा, बॉलीवूड, भटकंती यासह अनेक विषयांना स्पर्श करणारे विभाग सुरू केले आहेत. याशिवाय अनेक सेवा मराठीत प्रथम देण्याचा बहुमानही पटकावला आहे. क्लासीफाईड, क्वेस्ट, ई-मेल या सेवा मराठीत देण्याबरोबरच जन्मकुंडली, पत्रिका जुळवणी या सेवाही सहजगत्या आणि अगदी मोफत आपल्या मातृभाषेत उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेवांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.