‘अननोन वॉटर्स’ या संस्थेने पुण्यात नुकतीच आंतरआयटी एकांकिका स्पर्धा आयोजित केलेली होती. या स्पर्धेत योगेश शेजवलकर लिखित ‘वन बॉल टू गो’ ही एकांकिका विजेती ठरली. क्रिकेट सामन्यात शेवटच्या चेंडूआधी होणा-या फलंदाजांमधील संवादाची ही एकांकिका आहे. मंदार गोरे आणि सागर दातार यांनी यांनी या फलंदाजांच्या भूमिका केल्या.
हा २०-२० सामना गल्लीतील दादाने आयोजित केलेला असतो. नाट्य मैदानाच्या खेळपट्टीवर घडते. सामन्यात शेवटच्या चेंडूवर तीन धावा फटकविल्या की फलंदाजी करणारा संघ विजयी होणार असतो. या शेवटच्या चेंडूच्या आधी दोन्ही फलंदाजांमध्ये झालेला संवाद म्हणजेच हे नाटक. फलंदाज म्हणतो की, दोन धावा काढू म्हणजे धावसंख्या समान होईल व सामना बॉलआउटवर निकाली ठरेल. गोलंदाजाच्या बाजूचा गडी म्हणतो की, मी पळेन पण एकच धाव काढेन. कारण हा सामना फिक्स झालेला आहे. सामना जिंकायचा असेल तर चौकार मार. माझ्याकडून सहकार्याची अपेक्षा ठेवू नकोस. फलंदाज म्हणतो की, तोच प्रॉब्लेम आहे. क्षेत्ररक्षण असे आहे की, चौकार मारता येत नाही. दुसरा गडी म्हणतो, “मला माहीत आहे तुला नाही जमणार. मी तुला लहानपणापासून ओळखतोय..”.
त्यांच्यात बरीच चर्चा होऊनअखेर फलंदाज चौकार मारतो. पण तो फटका सीमारेषेपर्यंत जातच नाही. फलंदाज हताश होऊन खेळपट्टीच्या मध्यावर थांबतो. पण गोलंदाजाच्या बाजूचा फलंदाज पळू लागतो. फटका मारणारा फलंदाज विचारतो की, “आता तू का पळत आहेस ? तो उत्तरतो, “जेव्हा तीन धावांसाठी प्रयत्न करण्याची गरज होती तेव्हा आपण दोन धावांविषयी बोलत होतो. चारसाठी प्रयत्न केले म्हणून तीन धावा तरी मिळतील. जितकं पाहिजे असतं त्यापेक्षा थोडं कमीच मिळतं, हा जीवनाचा नियम आहे. चल पळ..” याच मुद्यावर एकांकिका संपते.
एकांकिकेत एक प्लॅशबॅक आहे. तो असा की, फटका मारणा-या फलंदाजावर निर्णय घेण्याची वेळ या आधीही आलेली असते. ‘करीअर की गर्लफ्रेंड’, असा तो पेच असतो. त्यावेळी तो द्विधा मनःस्थितीत सापडलेला असतो. आता खेळातील निर्णायक फटका मारण्याची वेळ असते.
अतिशय निराळ्या ‘पीच’ वरील या बक्षीसपात्र एकांकिकेबद्दल योगेशला बोलतं केलं.
योगेश, एकांकिकेतून तुला काय सांगायचे आहे ? जे सांगायचे आहे ते असे की, निर्णय घेण्याची वेळ आली की माणूस कोणत्याही एका दिशेला झुकून ‘आर या पार’ असे करत नाही. अर्धवट मनःस्थितीचे परिणाम त्याला भोगावे लागतात. या सामन्याही ‘दोन धावा तर काढू, पुढचे पुढे..’ असा विचार असतो. मात्र, अखेर त्याला चौकारासाठी फटका मारावाच लागतो...
या एकांकिकेत ठरीव साचेबध्द नेपथ्य नाही. त्याची योजना करताना खूप विचार करावा लागला का ? निश्चितच. वर्तमान आणि भूतकाळातील घटनांचा संदर्भ कळेल, अशा पध्दतीनेच नेपथ्य केले. रंगमंचावरील जागेचा पूर्ण वापर कसा होईल, हे पाहिले. नाट्यशास्त्रातील नियमांचा वापर करून नेपथ्य केले.
संगीताबाबत काय विचार केला होता ? क्रिकेटचा फील देणारे असे, त्याप्रमाणेच शाळेतील प्रसंगांना, प्रेमप्रसंगांना अनुरूप असे संगीत दिले. या तीनही गोष्टींचा विचार करावा लागला.
ब्लॅकआउट ठेवायचेच नाही, असा निर्णय का घेतला ? ओढून ताणून ब्लॅकआउट ठेवला असता तर नाट्याचा परिणाम नष्ट होण्याची भीती होती. मुळात, हे नाटक शेवटच्या चेंडूभोवती फिरणारे असल्याने कोणताही खंड पडणे सयुक्तिक नव्हते.
क्रिकेट सोडून दुस-या एखाद्या पार्श्वभूमीवरही हे नाट्य बसवता आले असते. जिवाची घालमेल आणि निर्णयक्षमतेचा कस जीवनातील इतरही प्रसंगातून दाखविला जाऊ शकला असता... गेली काही वर्षे क्रिकेट आपल्या जीवनाचा एक भाग झालेले आहे. या खेळातील शब्दप्रयोग सर्वांना परिचयाची झालेली आहे. स्वतःच्या जीवनाशी प्रत्येकजण या खेळाचे नाते मनातल्या मनात लावू शकतो. या खेळात निर्णयक्षमतेला खूप महत्व आलेले आहे. आपल्या जीवनातही निर्णयक्षमतेला महत्व आलेले आहे. जो निर्णय घेऊ त्याचे परिणाम सामना संपेपर्यंत भोगावे लागतात. चांगले आणि वाईट दोन्ही. क्रिकेटच्या सामन्याचा प्रतीकात्मक वापर करण्याचा हा प्रयत्न आहे. क्लिष्ट गोष्टी क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर सोप्या पध्दतीने सांगता आल्या आणि त्यामुळेच नाट्य वाढायला मदत झाली.
दोन पात्रातही ही एकांकिका झाली असती, असे वाटत नाही का ? उर्वरीत बाबी नेपथ्यातील हुषारीतून सूचित करणे शक्य होते… विषयाचा आवाका पाहता इतर पात्रांची गरज आहे, असे वाटले. त्याशिवाय, विषयाला न्याय देता आला नसता, असे वाटले.
परीक्षकांना हीच एकांकिका का आवडली असावी ? अवघड विषय खूप सोप्या भाषेत मांडला होता. कलाकारांनी भूमिकांना न्याय दिला होता. एकांकिका करताना बक्षिसाचा वगैरे विचार केला नव्हता.
लेखनासह संगीताचीही जबाबदारी योगेशने सांभांळली. तेजस देवधरने त्याला प्रकाशयोजनेद्वारे मदत केली. मंदार आणि सागर यांनी प्रमुख भूमिकांसह ‘सेट’ ची जबाबदारीही सांभाळली. यापुढेही या एकांकिकेचे प्रयोग करण्याचा योगेशचा मनोदय आहे.