Bhai Dooj 2022 यमद्वितीया या मंत्राने भावाची स्तुती करावी

मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (00:37 IST)
कार्तिक शु. द्वितीयेस हे नाव आहे. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवावयास गेला. या तिथीस यमाची पूजा करतात, म्हणून या तिथीचा 'यमद्वितीया' असा उल्लेख करतात. तसेच याच दिवशी भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जेवण करतो, म्हणून त्यास भाऊबीज असे म्हणतात. हे एक व्रत आहे.
 
ही तिथी हेमाद्रीच्या मते मध्याह्‌ नव्यापिनी पूर्वविद्धा भाऊबीज श्रेष्ठ. स्मार्तमतानुसार दिवसाच्या पाचव्या प्रहरात भाऊबीज श्रेष्ठ. तर स्कंदच्या मते अपराह नव्यापिनी श्रेष्ठ. पण स्कंदाचे मत सयुक्तिक वाटते.
 
या दिवशी यमधर्म, यमदूत, यमुना, चित्रगुप्त, मार्कंडेय आणि पितर यांचे पूजन करतात. या दिवशी बहिणीच्या घरी जाऊन बहिणीकडून भावाने पूजा स्वीकारावी. यावेळी बहिणीने भावास उत्तम आसन देऊन त्याचे हातपाय धुवावे व गंधाक्षतांनी त्याची पूजा करावी. नंतर भावाने बहिणीस यथाशक्ती वस्त्रेभूषणे, द्रव्य वगैरे देऊन तिचा बहुमान करावा, व बहिणीने भावास यथाशक्‍ति त्यास आवडणार्‍या पदार्थांचे भोजन घालावे.
 
'भ्राअस्तवानुजाताहं भुङ्‌क्ष्व भक्‍तमिमं शुभम् ।
प्रीतये यमराजस्य यमुनाया विशेषत: ॥'
 
अशा मंत्राने भावाची स्तुती करावी. ज्यांना सख्खी बहीण नसेल त्यांनी चुलत बहिणीला, मामे बहिणीला अगर मित्र-भगिनीला सख्खी बहीण मानून भावाने तिच्या घरी जेवण करावे. या दिवशी यमुनेकाठी बहिणीच्या हातचे जेवण केल्यास भावाच्या आयुष्यात वाढ व बहिणीच्या नवर्‍याचे रक्षण होते.
 
 * या दिवशी यमुनेत स्नान करणे पुण्यकारक मानतात. हा स्नानोत्सव सर्वात मोठा आहे. या दिवशी यमुनेबरोबर यमाची पूजा करतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती