वसुबारस षोडपचार पूजन, या प्रकारे करा गोमातेची पूजा आणि प्रार्थना
रविवार, 31 ऑक्टोबर 2021 (16:53 IST)
गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारस हा दिवस साजरा केला जातो. वसुबारस दिवाळीच्या पहिल्या दिवशी साजरा केला जाणारा सण. संस्कृतमध्ये याला गो-वत्स द्वादशी असे म्हणतात. आश्विन कृष्ण द्वादशीचेच नाव आहे गोवत्स द्वादशी. या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तावेळी अर्थात दिवे लागणीच्या थोडेसे आधीच गायवासरुची पूजा करायची असते. यावेळी तांब्याचा लोट्यात पाणी भरून गायवासरांच्या पायावर (डाव्या हातातील पाणी उजव्या हातातून) पाणी सोडावे अथार्त अर्घ्य द्यावे.
हे अर्घ्य देताना म्हणावयाचा मंत्र-
क्षीरोदार्णव-संभूते सुरसुर -नमस्कृते ।
सर्व-देव-मये मातर् गृहाण अर्घ्यं नमोस्तुते॥
अर्थात क्षीरसागरातून जन्म झालेल्या देव आणि राक्षसांनी प्रणाम केलेल्या सर्व देवस्वरूप अशा (कामधेनू) माते, मी देत असलेल्या या सत्काराचा स्वीकार कर. तुला आमचे अनंत प्रणाम.!
ज्या गायवासरांचे पूजन करायचे ती शक्य तर एका वर्णाची असावीत.
गाय भरपूर दूध देणारी असावी.
गायीला गंध, कुंकूम, अक्षता वाहून, पुष्पहार घालून आणि अर्घ्य देऊन पूजा केल्यावर उडीद वडे खायला घालावे.
या वेळी गोमातेची प्रार्थना करावी-
सर्व-देव-मये देवि । सर्व-देवैर अलंकृते ।
मातर् मम अभिलषितं सफलं कुरु नन्दिनी ॥
अर्थात सर्वांना आनंद देणार्या हे नंदिनी गोमाते ! सर्वदेव तुझ्या ठायी निवास करतात म्हणून तू सर्वदेवमयी. सर्व देवांनी तुझा गौरव केलेला आहे. तेव्हा हे आई, आमच्या इच्छा पूर्ण कर.
या दिवशी आपण गायीचे दूध, दही, तूप, ताक; तसेच तेलात तळलेले वडे इ. पदार्थ वर्ज्य करावे. याच गोवत्स द्वादशीपासून पाच दिवस अर्थात पाडव्यापर्यंत देव, विद्वान, गुरुजन, गाई, घोडे, वडीलधारी मंडळी, मुलेबाळे या सर्वांचे घरातील माताभगिनींनी नीरांजनाने ओवाळून औक्षण करावे, असे नारदवचन आहे.
वसुबारसनिमित्त अशी प्रार्थना करा
या लक्ष्मी सर्वभूतानां या च देवेषु संस्थिता ।
धेनुरूपेण सा देवी मम शान्ति प्रयच्छतु ।
चतुर्मुखस्य या लक्ष्मीर या लक्ष्मीर धनदस्यच ।
लक्ष्मीर या लोकपालानां सा धेनुर वरदास्तु मे ।
स्वधा या पितृमुख्यानां स्वाहा यज्ञभुजांच या ।
सर्व-पाप-हरा धेनुस तस्मात् शान्ति प्रयच्छ मे ।
विष्णोर वक्षसि या लक्ष्मीः स्वाहा या च विभावसो ।
चन्द्रार्क-शक्र-शक्तिर या धेनु-रूपास्तु सा श्रिये ॥
या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते. घरावर आकाशकंदिल लावावे. अंगणातील तुळशी वृंदावनापुढे पणती लावावी. घरात फराळाचे साहित्य करावे.