वसुबारस : संपूर्ण माहिती आणि पूजा करण्याची योग्य पद्धत

गुरूवार, 12 नोव्हेंबर 2020 (08:05 IST)
आश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस साजरी केले जाते. गोवत्सद्वादशी म्हणजे गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हणतात.
 
हिंदू धर्मात गाईला महत्वाचे स्थान असून तिचा सन्मान करण्याचा हा दिवस. या दिवशी गाईची पाडसासह पूजा करतात. 
 
काय करावे-
या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळीची सुरुवात होते.
घरी गुरे, वासरे असणार्‍यांकडे ह्या दिवशी पुरणा-वरणाचा स्वयंपाक करुन नैवेद्य दाखवला जातो. 
सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सायंकाळी संवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गायीचे पूजन करतात.
सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. 
नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. 
निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. 
स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात.
आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.
या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. 
घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती