Lakshmi Pujan Vidhi 2023 लक्ष्मी पूजन कसे करावे? संपूर्ण विधी जाणून घ्या

लक्ष्मी पूजन साहित्य - कलश, पाणी, आंब्याची पाने, कापुर, गुलाल, सिंदूर, कुंकु, हळद, अक्षता, शंख, घंटा, गंध, गुलाबाच्या फुलांच्या माळा, कमळाचे फुलं, हिशेबाच्या वह्या, तेलवात, 5 फळ त्यात सीताफळ आणि शिंगाडे हे लक्ष्मी देवीची आवडते फळ याचा समावेश असावा, विविध प्रकारची फुले, गंगाजल, पंचामृत, पितळी दिवा, मातीचा दिवा, कापूस, ताम्हण-पळी, नीरांजन,धूपारती, चंदन, सुपारी, दिव्यासाठी तूप, उदबत्ती, लाह्या आणि बत्तासे, पेढे, समई, अत्तर, गुलाबपाणी, गूळ-खोबरे, लाकडी चौरंग, चौरंगावर पसरवण्यासाठी लाल कापड, देवी लक्ष्मी आणि भगवान गणेश यांच्या मूर्ती किंवा चित्रे, नारळ, धणे, सोन्याचे दागिने, सुपार्‍या, अष्टगंध,
तांदूळ, गहू धान्य, दूर्वा, केळीचे पान, लाल वस्त्रे, विड्याची पाने, धूप, रांगोळी, आरतीचे ताट, झाडू, दक्षिणा
 
पूजास्थान स्वच्छ करावे. तोरण आणि रोशनाईने आरस करून ती जागा सुशाभित करावी.
रांगोळी काढावी. स्वस्तिक काढावे.
लक्ष्मी पूजन करण्यासाठी सोनं-चांदीची नाणी, दागिने, भांडी, नगदी पैसे यांची व्यवस्था करावी. 
शाईच्या दौती, लेखणी, तराजू, वजने, मापे हे देखील पूजेसाठी ठेवावे. 
पूजनासाठी जमाखर्चाच्या वह्यांच्या पहिल्या पृष्ठावर कुंकुमिश्रित गंधाने स्वस्तिक रेखाटावे. संवत्सर, तिथी, महिना यांचा तेथे उल्लेख करावा.
लाल गंधाने त्यावर ॥शुभ॥ ॥लाभ॥ असे लिहावे. 
पाटावर किंवा चौरंगावर तांदूळ किंवा गहू टाकून त्यावर कलश स्थापन करावा. 
कलशात हळद, कुंकू, गुलाल, अक्षता, फुल, रुपयाचे नाणे, सुपारी, एक नारळ असे ठेवावे. 
यासह पाटावर 5 विडे ठेवावे ज्यावर प्रत्येकी 1 सुपारी, खारीक, बदाम, हळकुंड ठेवावे. 
यावर गणपती सहित पंचायतन देवतांचे पुजन करायचे असतात.
 
शंखपूजा - देवघरातील शंखाला स्नान घालून जागेवर ठेवून त्याला गंधफूल वाहावे. शंखात तीन पळ्या शुद्ध पाणी देवाच्या उजव्या बाजूस ठेवावा.
 
घंटापूजा - घंटेला स्नान घालून पुसून ती जागेवर ठेवावी. हळद-कुंकू गंधाक्षता व फूल वाहावीत. नंतर निरंजन ओवाळून थोडी वाजवावी.
 
दीपपूजा- समईला हळदकुंकू, गंधफूल व अक्षता वाहून नमस्कार करावा.
 
गणपती पूजन- पूजास्थळी थोडे तांदूळ ठेवून त्यावर नारळ ठेवावा. आवाहन व आसन म्हणून दोन दूर्वा ठेवून त्यावर सुपारी किंवा गणेशाची मुर्ती ठेवावी. फूलाने पळीत पाणी घेऊन शिंपडावे. पळीभर पाण्यात गंध अक्षता व फूल घेऊन गणपतीवर वाहावे. पळीत पाणी घेऊन फुलाने शिंपडावे. जानवे आणि अक्षता वाहाव्यात. चंदन-गंध वाहावे. मुर्तीला हळद-कुंकू आणि फूले वाहावीत. विड्याची दोन पाने त्यावर सुपारी व दक्षिणा ठेवून त्यावर पळीभर पाणी सोडावे. उदबत्ती लावून ती उजव्या हाताने देवाला ओवाळावी. डाव्या हातात घंटा घेऊन त्यावेळी घंटानाद करावा. निरांजन ओवाळावी. घंटानाद करावा. देवासमोर पाण्याने लहानसा चौकोन करून त्यावर दूध किंवा गूळ-खोबरं किंवा इतर काही नैवेद्य असेल तो ठेवावा. त्याभोवती पाणी परिसिंचन करावे व नैवेद्यावर दूर्वेने किंवा फुलाने पाणी शिंपडावे. स्वाहाकार म्हणावेत. प्रत्येक वेळी देवाला घास भरवीत असल्याची क्रिया  करावी.
 
लक्ष्मी पूजन कसे करावे?
श्री लक्ष्मी पूजनासाठी कलशाची स्थापना करावी. लक्ष्मी-सरस्वती आणि गणपतीचे फोटो किंवा मूर्ती ठेवावी. कलशाला कुंकुवाचे बोट लावून त्यावर गंध, अक्षता, फुल वाहावे. कलशाजवळच किंवा ताम्हणात तांदूळावर नाणी, दागिने, कॅश ठेवावीत. जवळच जमाखर्चाच्या वह्या, लेखणी, दौत, तराजू, वजने इत्यादि ठेवावे. 
 
आवाहन- देवीवर अक्षता वाहाव्यात.
आसन -देवीच्या मूर्तीखाली अक्षता ठेवाव्यात.
पाद्य-पळीभर पाणी फुलाने शिंपडावे.
अर्घ्य-पळीभर पाण्यात गंध, अक्षता घालून ते फुलाने शिंपडावे.
आचमन-फूलाने पाणी शिंपडावे.
पंचामृतस्नान- पंचामृत वाहावेत. प्रत्येक पदार्थानंतर शुद्धोदक अर्पण करावे. तसबीर असेल तर पंचामृताचे पदार्थ फुलाने किंचित् शिंपडावेत व शुद्धोदक उजव्या हाताने ताम्हनात सोडावे. देवीला पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. पाटावर पाण्याने लहानसा चौकोन करून त्यावर पंचामृताचे भांडे ठेवावे. त्याभोवती उजव्या हाताने पाणि परिसिंचन करावे व नैवेद्यावरही फुलाने किंचित्त् पाणी शिंपडावे. उजव्या हाताने देवीला नैवेद्य भरवीत आहोत अशी क्रिया करावी. निरांजन, घंटानाद करत उदबत्ती ओवाळून घंटानाद करावा.
लेखणी आणि वही पूजा -यावर गंधाक्षता, हळदकुंकू व लाल फूल वाहावे.
कुबेर पूजा- ताम्हणात किंवा केळीच्या पानावर ठेवलेल्या चांदीच्या नाण्यांची, दागिन्यांची, नोटांची धनपति कुबेर म्हणून पूजा करावी. संपत्तीवर गंधाक्षता व फूल वाहावे. नमस्कार करावा.
तुला पूजा- तराजू व वजने-मापे यांवर लाल गंध, अक्षता, हळदकुंकू व फुले वाहावीत.
दीप पूजा- दिव्यांच्या सजावटीला गंधपुष्प, अक्षता व हळदकुंकू वाहून नमस्कार करावा.
 
दिवाली लक्ष्मी पूजन मंत्र 
मां लक्ष्मी मंत्र- ऊं श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद, ऊं श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नम:॥
सौभाग्य प्राप्ति मंत्र- ऊं श्रीं ल्कीं महालक्ष्मी महालक्ष्मी एह्येहि सर्व सौभाग्यं देहि मे स्वाहा।।
कुबेर मंत्र-ऊं यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्यसमृद्धिं में देहि दापय।
ॐ श्रीं ल्कीं महालक्ष्मी महालक्ष्मी एह्येहि सर्व सौभाग्यं देहि मे स्वाहा।।
ॐ श्रींह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्मी नम:।।
ॐ ह्रीं श्री क्रीं क्लीं श्री लक्ष्मी मम गृहे धन पूरये, धन पूरये, चिंताएं दूरये-दूरये स्वाहा:।
 
लक्ष्मी देवीची आरती करावी. श्री सुक्त किंवा महालक्ष्मी अष्टक पाठ करावे.
 
तयार केलेल्या पक्वांनाचे नैवेद्य दाखवावे. देवी लक्ष्मीला लाह्या-बत्ताशे, दूध-पोहे, खीर, पेढे, अनारसे, करंज्या, तांदळाचे आणि मुगाचे लाडू, रव्याचा शिरा, सिताफळ, शिंगाडे, डाळिंब आणि विडा हे अती प्रिय आहेत. नैवेद्य दाखवून प्रसाद ग्रहण करावा.
 
लक्ष्मी पूजन नियम
या रात्री घराभोवती रोशनाई करावी. मातीचे दिवे लावावे. या रात्री अखंड ज्योत जळावी. घरातील सर्व दिवे सुरु ठेवावे. या दिवशी पूजन करताना घराचे सर्व दरवाजे, खिडक्या खुल्या असाव्यात. तसेच लक्ष्मी पूजनावेळी कोणासोबतही नगद पैशांच्या व्यवहार करु नये. लक्ष्मी पूजनावेळी लक्ष्मी देवीच्या दोन मूर्त्या किंवा फोटो ठेवू नये. लक्ष्मी देवी सोबत गणपती आणि सरस्वती देवीची पूजा करावी.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती