Pak Vs Aus : 'पाकिस्तान जिंदाबाद' घोषणा देणाऱ्या प्रेक्षकाला पोलिसांनी रोखलं, व्हीडिओ व्हायरल
शनिवार, 21 ऑक्टोबर 2023 (11:31 IST)
Social Media
बेंगळुरुत चिन्नास्वामी स्टेडियमवर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या प्रेक्षकाला पोलिसांनी रोखल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना सुरू असताना एक प्रेक्षक पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देत होता. त्यावेळी त्याला तेथील एका पोलिसानं रोखलं
"पाकिस्तानचा सामना सुरू आहे. मी पाकिस्तानमधून आलोय. पाकिस्तान जिंदाबाद का म्हणू शकत नाही?" असा प्रश्न व्हीडितला तरुण त्या पोलीस कर्मचाऱ्याला विचारत आहे.
पोलीसानं घोषणा देण्यापासून रोखल्यानंतर हा तरुण नाराज झाला होता. त्यानं हा सर्व प्रकार मोबाईलवर चित्रित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अन्य एका कर्मचाऱ्यानं त्याच्या जवळ जाऊन शांत राहण्याची विनंती केली, असं या व्हीडिओत दिसतंय.
सोशल मीडियावर हा व्हीडिओ व्हायरल झाला असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
बंगळुरु पोलीसाच्या या कृतीवर काही जणांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केलीय.
"पाकिस्तानला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या चाहत्याला पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देण्याची परवानगी नाही. या प्रकारची (मल्टीनॅशनल) स्पर्धा घेण्यासाठी भारत योग्य नाही," अशी प्रतिक्रिया जॉय (@joydas) यांनी दिलीय.
"मला संताप येतोय. त्यांनी पाकिस्तानी फॅनला पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देण्यापासून रोखलं. इरफान पठाण हे काय सुरू आहे? पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं विश्वचषकावर बहिष्कार घालावा. आयसीसी, बीसीसीआय तुम्ही काय करताय? आमच्या लोकांनी काय घोषणा द्यावी अशी तुमची अपेक्षा आहे ?" असा प्रश्न पाकिस्तानमधील क्रीडा पत्रकार फरीद खान यांनी त्यांच्या X हँडलवरून विचारलाय.
फरीद खान यांनी या ट्विटमध्ये भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणसह पीसीबी, बीसीसीआय आणि आयसीसीला टॅग केलंय
त्याचबरोबर बंगळुरु पोलिसाच्या कृतीचं समर्थन करण्यासाठीही काही जण पुढे आले आहेत.
"ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देण्यापासून पोलीस कर्मचाऱ्यानं अडवलं. त्या पोलीस कर्मचाऱ्याला सलाम. भारतामध्ये फक्त भारत जिंदाबाद,"असं मत आकिब मीर यांनी व्यक्त केलंय.
"हा भारत आहे. तुम्ही इथं पाकिस्तान जिंदाबाद म्हणू शकत नाही. त्या पोलीस कर्मचाऱ्याला कडक सॅल्युट," असं ट्विट करत दिप्ती (@SaffronJivi) यांनी या प्रकारचं समर्थन केलंय.
बेंगलुरू पोलीस आणि बीसीसीआयची मात्र या विषयावर अजून काही प्रतिक्रिया आलेली नाही.
वॉर्नरची वादळी खेळी
बेंगळुरूतल्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना सुरू आहे.
पहिल्या इनिंगमध्ये डेव्हिड वॉर्नरला पाकिस्तानच्या खराब फिल्डिंगचाही फायदा मिळाला. शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर उसामा मीरनं त्याचा सोपा झेल सोडला. त्यावेळी वॉर्नर फक्त 10 धावांवर खेळत होता.
या जीवदानानंतर वॉर्नरनं आक्रमक खेळ करत पाकिस्तानी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. वॉर्नरचं त्याचं अर्धशतक 39 बॉलमध्ये तर शतक 85 बॉलमध्ये पूर्ण केलं.
डेव्हिड वॉर्नरचं हे विश्वकप क्रिकेट स्पर्धेतील पाचवं शतक आहे. तर, पाकिस्तान विरुद्ध त्यानं सलग चौथ्या एकदिवसीय सामन्यात शंभरी ओलांडली.
डेव्हिड वॉर्नरच्या धावांचा ओघ शतकानंतरही सुरू होता. त्यानं दीडशे धावांचा टप्पाही सहज ओलांडला. त्याला अखेर 163 धावांवर हॅरीस रौफनं बाद केलं. वॉर्नरनं या धावा 124 बॉलमध्ये 14 चौकार आणि 9 षटकारांसह केल्या.
वाढदिवशी मार्शचा धमाका
मिच मार्शनं त्याच्या वाढदिवशी आक्रमक खेळत करत वॉर्नरला साथ दिली. या स्पर्धेपूर्वी ट्रॅव्हिस हेड जखमी झाल्यानं मार्श वॉर्नरसोबत सलामीला येतोय.
श्रीलंकेविरुद्ध अर्धशतक झळकावणाऱ्या मार्शनं तोच फॉर्म कायम ठेवत शतक झळकावलं. मार्शचं हे वन-डे कारकिर्दीमधील दुसर शतक आहे. त्यानं 108 बॉलमध्ये 10 चौकार आणि 9 षटकारांसह 121 धावांची खेळी केली.
ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी
मिच मार्श बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियानं ग्लेन मॅक्सवेलला बढती देत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवलं. मॅक्सवेलला या बढतीचा फायदा उठवता आला नाही. तो पहिल्याच बॉलवर बाद झाला.
माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथचा खराब फॉर्म या सामन्यातही कायम होता. त्याला फक्त 8 धावा करता आल्या.
जॉश इंग्लिस वेगानं धावा करण्याच्या प्रयत्नात (13) बाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या नंतरच्या फलंदाजांना वेगानं धावा काढण्यात अपयश आले. त्यामुळे वॉर्नर आणि मार्श यांनी करुन दिलेल्या सुरूवातीचा त्यांना फायदा घेता आला नाही.
वॉर्नर – मार्श खेळत असताना ऑस्ट्रेलिया 400 धावा करेल असं वाटत होतं. पण, त्यांना 9 बाद 367 धावांपर्यंतच मजल मारता आली.
शाहीन आफ्रिदीच्या 5 विकेट्स
पाकिस्तानचा प्रमुख फास्ट बॉलर शाहीन आफ्रिदीनं 5 विकेट्स घेतल्या. आफ्रिदीच्या गोलंदाजीमुळे पाकिस्ताननं शेवटच्या ओव्हर्समध्ये कमॅबॅक केलं. पाकिस्ताननं शेवटच्या 7 ओव्हर्समध्ये 37 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.
हॅरीस रौफ सर्वात महगडा ठरला. त्यानं 8 ओव्हरमध्ये 83 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. उसामा मीरनंही 9 ओव्हरमध्ये 83 धावा दिल्या.