विश्वचषक स्पर्धेत आज ऑस्ट्रेलियाचे इंग्लंडला कडवे आव्हान
मंगळवार, 25 जून 2019 (11:12 IST)
ठणठणीत खेळपट्टीवरच इंग्लंडचे खेळाडू मर्दुमकी गाजवितात व अन्य मैदानांवर त्यांची कामगिरी अपेक्षेइतकी होत नाही हा दावा खोडून काढण्यासाठी त्यांना आज येथे ऑस्ट्रेलियाविरूद्ध सर्वोत्तम कौशल्य दाखवावे लागणार आहे. या दोन संघांमधील सामना ऍशेस मालिकेतील लढतीसारखाच चुरशीने खेळला जाईल अशी अपेक्षा आहे.
इंग्लंडला नुकताच श्रीलंकेविरूद्ध 20 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. या पराभवातून त्यांचे खेळाडू अद्याप सावरलेले नाहीत. पाकिस्तानकडून झालेल्या पराभवापासून त्यांनी बोध घेतला नाही. त्यामुळेच त्यांना लंकेविरूद्ध विजय मिळविता आला नाही. अर्थात दोन सामने गमावूनही त्यांच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम राहिल्या आहेत. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या कांगारूंवर विजय मिळविणे सोपे नाही. हे लक्षात घेऊनच त्यांना सर्व आघाड्यांवर चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा संघ पराभूत होऊ शकतो हे भारतीय खेळाडूंनी दाखवून दिले आहे. साहजिकच इंग्लंडचे खेळाडूही अशाच कामगिरीचे स्वप्न पाहत आहेत. क्रिकेटचे माहेरघर असलेल्या इंग्लंडला एक दिवसीय सामन्यांच्या विश्वचषकावर नाव कोरता आलेले नाही. घरच्या मैदानावर हे स्वप्न साकार करण्यासाठी कमालीचे उत्सुक झाले असले तरी त्यांच्यासाठी बाद फेरीत स्थान मिळविणे हीच परिक्षा आहे. त्यांना ऑस्ट्रेलियापाठोपाठ भारत व न्यूझीलंड या बलाढ्य संघांबरोबर झुंज द्यावी लागणार आहे. त्यादृष्टीनेच त्यांना प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध गतवर्षी त्यांनी एक दिवसीय सामन्यात 6 बाद 481 अशी विक्रमी धावसंख्या रचली होती. त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी त्यांचा प्रयत्न राहणार आहे.
फलंदाजीस अनुकुल असलेल्या खेळपट्टीवर जेसन रॉय याची अनुपस्थिती इंग्लंडला निश्चित जाणविणार आहे. त्यांचा कर्णधार इऑन मॉर्गन याला सूर गवसला असला तरी जेसनची अनुपस्थिती त्यांना लंक्रविरूद्ध प्रकर्षाने जाणविली होती. त्याची उणीव मोईन अली याला भरून काढता आली नव्हती.जोस बटलर , जॉनी बेयरस्टो, जेम्स विन्स, बेन स्टोक्स यांच्यावरही त्यांच्या फलंदाजीची भिस्त आहे. गोलंदाजीत त्यांना जोफ्रा आर्चर, मार्क वुड, स्टोक्स, आदिल रशीद यांच्याकडून प्रभावी कामगिरी अपेक्षित आहे.
डेव्हिड वॉर्नर व कर्णधार ऍरोन फिंच यांनी या स्पर्धेत आतापर्यंत सातत्यपूर्ण खेळ केला आहे. आजही त्यांच्या बॅटी तळपतील अशी अपेक्षा आहे. उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, अलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल यांच्यावरही त्यांची मदार आहे. गोलंदाजीत मिचेल स्टार्क , पॅट कमिन्स, नॅथन कोल्टिअर नील ही त्यांच्यासाठी प्रभावी अस्त्रे मानली जातात.