सामान्य नागरिकांच्या लसीकरणाला आणखी चार ते पाच महिन्यांची प्रतीक्षा : टोपे

शनिवार, 30 जानेवारी 2021 (07:55 IST)
राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा 2 लाखांचा टप्पा पूर्ण झाला आहे. आता लसीकरणासाठी लोक स्वतःहून पुढे येत आहेत. त्यांचा आत्मविश्वास वाढत आहे. पण सामान्य नागरिकांच्या लसीकरणाला आणखी चार ते पाच महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी दिली आहे. पुण्यात पुरस्कार वितरण समारंभानिमित्त आरोग्य मंत्री राजेश टोपे हे पुणे दौऱ्यावर ते आले होते. यावेळी ते बोलत होते. 
 
टोपे म्हणाले, लसीकरण करणाची मोहीम राबविताना लसींच्या संख्येत कमतरता होणार नाही. आता आरोग्याच्या दृष्टीने पुरेसा लसींचा साठा मिळाला आहे. तसेच पुढेही आवश्यक लसींच्या उपलब्धतेसाठी सरकार योग्य ते पाठपुरावा करत राहील. पण आरोग्यमंत्री म्हणून सांगतो आहे की, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी नावे नोंदवून घेतली पाहिजे. ३० कोटी लोकांना लसीकरण करणार आहोत. त्याचा टप्पाही लवकरात लवकर घेण्यात येईल. 
 
पुरस्कार सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना राजेश टोपे म्हणाले,  आरोग्य विभागात सुधारणेला खूप वाव आहे. विभागाला कायम अपुरा निधी मिळतो. ६ टक्के तरतूद अपेक्षित असताना जीडीपीच्या केवळ १ टक्का तरतूद होते. कमी मनुष्यबळ, रिक्त जागा या आव्हानांचा सामना करत आरोग्य सेवा सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्ता गाजवण्यासाठी नाही, गांजलेलल्यासाठी असते. प्रत्येकाला संतुष्ट करता आले नाही तरी चांगल्या हेतूने सेवा करता येते. समस्यांना पाठ दाखवली तर त्या पाठीशी लागतात. याउलट, खंबीरपणे सामोरे गेल्यास समस्या कमी होतात. कोरोना काळ हा नफेखोरीचा कालावधी नाही. त्यामुळे चाचण्या, मास्क, प्लझ्मा, इंजेक्शन यांच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न केला. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती