1 जानेवारी 2021 पासून मुंबईच्या लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचं राज्य सरकारने म्हटलं होतं. पण जानेवारी महिना अर्धा संपला तरीही याबाबत सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
आज (13 जानेवारी) उच्च न्यायालयात लोकल ट्रेनबाबतच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
कोरोनाच्या संकटामुळे मुंबईची लोकल पहिल्यांदाच सर्वसामान्यांसाठी 10 महिन्यांपेक्षा जास्त काळ बंद आहे. याबाबत सरकार काय विचार करतंय, कोणकोणते पर्याय तपासून पाहत आहे याचा हा आढावा.
3 तास लोकल सुरू करणार?
सध्या अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी, पत्रकार, सरकारी बँक कर्मचारी आणि महिला यांच्यासाठी लोकल सेवा सुरू आहे. पण सर्वांसाठी ही लोकल सेवा अद्याप सुरू करण्यात आलेली नाही.
मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले "ज्या लोकांसाठी लोकल सेवा सुरू आहे, त्या लोकांची सकाळी 7 च्या नंतर आणि संध्याकाळी 5 नंतर गर्दी असते. पहाटे आणि रात्री उशीरा या ट्रेन रिकाम्या असतात. त्यामुळे पहाटेच्या पहिल्या ट्रेनपासून ते सकाळी 7 आणि रात्री 10 नंतर शेवटच्या ट्रेनपर्यंत सर्वसामान्यांसाठी लोकल खुली करण्याच्या पर्यायाचा सरकार विचार करत आहे."
पहाटे आणि रात्री उशीरा लोकल ट्रेन सर्वांसाठी खुली केल्याचा काय फायदा होणार आहे? हा प्रश्न आम्ही हा प्रश्न संबंधित अधिकार्यांना विचारला.
ते म्हणाले, "खाजगी ऑफिसमध्ये सकाळच्या शिफ्टला पोहचण्यासाठी लांबून प्रवास करणाऱ्या लोकांचे हाल होतात. जर बदलापूरहून सीएसटीला येणारा प्रवासी असेल तर पहाटेच्या ट्रेनने प्रवास करून त्यांना ऑफीसला पोहचणं सोपं जाईल. हाच विचार रात्री उशिरा लांबचा प्रवास करणाऱ्या लोकांबाबत केला जात आहे. पण अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही. "
ऑफिसच्या वेळा बदलणार?
मुंबईच्या लोकल ट्रेन्सची गर्दी कमी करण्यासाठी ऑफिसच्या वेळा बदलण्याचा विचार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. कोरोनाच्या काळात यावर कामही सुरू केलं गेलं.
राज्याचे माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं, "मुंबईतली काही ऑफिस सकाळी लवकर उघडली जातील. तर काही ऑफिस दुपारनंतर आणि संध्याकाळी उघडली जातील. लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी या पर्यायाचा विचार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. त्यावर आम्ही करत आहोत".
पण सध्याच्या परिस्थितीत या हा पर्याय मागे पडल्याचं चित्र आहे.
नवीन अॅप तयार करणार?
लोकल ट्रेनने प्रवास करण्यासाठी एक 'अॅप्लिकेशन' तयार करण्यात येणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली होती.
त्यांनी म्हटलं होतं, "लोकल ट्रेनची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार एक नवीन अॅप तयार करण्याचा विचार करतय. ज्यामध्ये जे लोक ट्रेनने प्रवास करत आहेत ते अॅपद्वारे तिकीटं काढून प्रवास करतील त्यातून किती प्रवासी एकावेळी प्रवास करतात हे कळू शकेल. त्या त्या वेळी मर्यादित प्रवाश्यांनाच ट्रेनने प्रवास करता येईल." पण सध्या सरकारचा हा पर्याय मागे पडलेला दिसत आहे.
90 टक्के गाड्या सुरू?
सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी लोकल ट्रेन सुरू आहेत. नेहमीच्या दिवसांत मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणारे 80 लाख प्रवासी आहेत. त्या प्रवाशांचा विचार करून सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार सांगतात "मध्य रेल्वेवर सध्या ज्यांना परवानगी आहे ते जवळपास 8 लाख प्रवासी दररोज प्रवास करत आहेत. आम्ही 90 क्षमतेने गाड्या सुरू ठेवल्या आहेत. जेव्हा सर्वांसाठी लोकल सुरू होतील ते 100 टक्के क्षमतेने या गाड्या सुरू करू पण सर्वासाठी लोकल सुरू केल्यानंतर सध्याच्या 8 लाख प्रवाशांचा आकडा हा 45 लाखांवर जाईल".