महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या १०७ वरुन ११६ वर गेली आहे. आज सांगली येथील एकाच कुटुंबातील पाच सदस्यांना संसर्गातून बाधा झाली. तर चार व्यक्ती अशा आहेत ज्या मुंबईतल्या आहेत. त्यांना प्रवासाचा इतिहास किंवा संसर्ग असे कारण आहे. ही माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान १४ सदस्य हे डिस्चार्जच्या प्रक्रियेत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. मंगळवार संध्याकाळ ते बुधवार दुपार या कालावधीत नऊ नवे रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ११६ झाली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सोमवारपर्यंत महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ९७ वर होती. मंगळवारी सकाळी ४ नवे रुग्ण आढळल्याने ती १०१ वर पोहचली. त्यानंतर संध्याकाळपर्यंत ही संख्या १०७ वर पोहचली. आता नऊ नवे रुग्ण आढळल्याने ही संख्या ११६ झाली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंता वाढवणारीच ही बातमी आहे. तरीही घाबरुन जाऊ नका आणि स्वयंशिस्त पाळा असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.