उत्तर प्रदेशच्या मेरठमधील मेडिकल कॉलेजच्या लॅबमध्ये एका माकडाने शिरकाव करुन गोंधळ घातला. या माकडाने कोरोनाच्या लॅबमध्ये प्रवेश करुन लॅब टेक्निशियनच्या हातात असलेले रक्ताचे नमुने घेऊन धूम ठोकली आहे. त्या माकडाच्या हातातील नमुने घेण्यासाठी टेक्निशियने त्या माकडाचा पाठलाग केला. मात्र, माकड झाडावर जाऊन बसला. या संपूर्ण घटनेचा टेक्निशियने व्हिडीओ काढला. यामुळे टेक्निशियनला मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाने नोटीस बजावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार; कोरोना रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी मेरठच्या एलएलआरएम लॅबमध्ये नेण्यात येतात. त्याच लॅबमधून माकडाने टेक्निशियनच्या हातातील सॅम्पल घेऊन पळ काढल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या माकडाकडून ते सॅम्पल मिळवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच त्या माकडाने रक्ताच्या नमुन्याचे सील तोडले आणि चावण्यास सुरुवात केली. दरम्यान, या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. मात्र, त्या आधीच माकडाने पळ काढला.