योग्य उपचार आणि सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे संकटातून बाहेर पडल्याचा आनंद
शनिवार, 18 एप्रिल 2020 (09:05 IST)
“परवा आई बरी होऊन घरी आल्यावर काकूने तिचे औक्षण करुन घरात स्वागत केले. तो क्षण म्हणजे गेल्या ३० मार्च पासून सोळा-सतरा दिवस ज्या काळजीत, धावपळीत, भीतीत आम्ही सगळे कुटुंबिय मानसिक ताण सहन करत होतो त्याचा समाधानी विसावा होता. वेळेत चाचणी करुन योग्य उपचार मिळाल्याने आणि सर्व नातेवाईक, आप्तांच्या शुभेच्छा, आईबाबांच्या चांगल्या वागण्याचे संचित या सगळ्या गोष्टींमुळे आई बरी होऊन घरी आली, अशा भावनिक शब्दांत कोरोना आजाराला यशस्वीरित्या लढा देत चांगल्या झालेल्या महिला रुग्णाच्या मुलाने आपल्या भावना व्यक्त केल्या.
औरंगाबाद येथील ५८ वर्षीय महिला रुग्णाला ३० मार्च रोजी ताप आणि छातीत वेदना होण्याचा त्रास सुरु झाला. खाजगी दवाखान्यात दाखवल्यानंतर त्यांनी कोरोनाचा संसर्गाचा धोका लक्षात घेत घाटीमध्ये तपासणी करण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांच्या पतीला ही कोरोना संसर्गाचा संशयित रुग्ण म्हणून दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला होता. पण तरीही डॉक्टरांनी खबरदारी म्हणून त्यांना निरिक्षणाखाली राहण्याचा सल्ला दिला होता. त्या पाश्वभूमीवर त्यांच्या पत्नीला ताप, छातीत दुखण्याचा त्रास लक्षात घेऊन लगेचच त्यांचे सीटी स्कॅन, आवश्यक चाचण्या करण्यात आल्या. ‘बाबांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आईलाही काही झालेल नसेल असं आम्हा सगळ्यांना वाटत होतं, मात्र तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि आईसह आम्हा कुटुंबियांची भीती, काळजी वाढल्याचे’ त्यांच्या मुलाने सांगितले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यातील सतर्कता म्हणून त्यांच्या सहवासातील त्यांच्या मुलासह घरातील इतर सर्व सदस्यांची त्यासोबत त्यांच्या घराजवळील संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही तपासणी करण्यात आली. सुदैवाने सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्या तणावाच्या परिस्थितीत तेवढा तो थोडासा दिलासा होता.
'खूप मोठ्या संकटातून आम्ही जात आहोत. यात आम्हाला दवाखान्यातील सर्व डॉक्टर, त्यांचा स्टाफ यांनी खूप सहकार्य केले आहे. कारण आईच्या जवळ जाऊन आम्ही तिची काळजी घेऊ शकत नव्हतो. रोज फक्त दुरुनच आईला पाहून डॉक्टरांकडून तिच्या तब्येतीत सुधारणा होतेय का, धोका टळला का, हे विचारू शकत होतो. तिच्या जवळ जाऊन तिची विचारपूस करणे, तिला खायला प्यायला देणे, तिच्या तब्बेतीची काळजी घेणे हे काहीच खूप इच्छा असूनही आम्हाला करता येणे शक्य नव्हते. पण त्यात आम्हाला दवाखान्यातील डॉक्टर, नर्स त्यांचे सहकारी यांनी मदत केली. आईला मानसिक आधार देत सकारत्मकतेने तिचे मनोधैर्य वाढवण्यासाठी देखील सगळ्यांनी सहकार्य केले. त्यामुळे चौदा दिवस ती दवाखान्यात राहून स्वतःच्या जीवावर आलेले संकट परतवून लावू शकली. विशेषत्वाने यामध्ये डॉक्टर, नर्स त्यांचे सहकारी जे स्वतःच्या जीवाला धोका होण्याची शक्यता असतानाही ज्या पद्धतीने थेट पेशंटच्या जवळ राहून त्यांना आवश्यक औषधोपचार वेळेवर देतात ते खूप महत्वाचे आहे. कारण आज सगळीकडे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे सर्वजण आपापली काळजी घेत आहेत. त्या परिस्थितीत मिनी घाटीतील सर्व डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक तेथील सर्व कोरोना रुग्णांच्या सहवासात राहून खबरदारीपूर्वक त्यांची चांगली काळजी घेत आहेत, याबद्दल आम्ही सर्व त्यांचे आभारी आहोत.
'दि. १५ एप्रिल रोजी आईला दवाखान्यातून घरी सोडण्यात आले आहे. आता आईला होम क्वारंटाईन केले असून डॉक्टरांनी सांगितलेल्या नियमांनुसार तिची काळजी घेत आहोत. डॉक्टर रोज तिची दूरध्वनीवरुन चौकशी करुन तब्येतीबाबत, औषध-गोळ्या घेतल्या का त्याबाबत विचारणा करत असतात. या संकटातून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी आमच्या आप्त, नातेवाईकांनी आमची चांगली, साथसोबत करत आमेच मनोधैर्य वाढते ठेवले, अशा शब्दांत त्यांच्या मुलाने आरोग्य यंत्रणेने, नातेवाईक, मित्र परिवार यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सतर्कता, योग्य उपचार आणि सकारात्मक हिमतीने लढणे हे कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक आहे, हे मात्र निश्चित.