राज्यात निर्बंध अधिक कठोर केले जातील : टोपे

सोमवार, 15 मार्च 2021 (20:37 IST)
राज्यात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील निर्बंध कठोर करण्यासंदर्भात भूमिका मांडली आहे. “वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. पण राज्यातल्या जनतेने नियमांचं पालन करून सहकार्य करावं”, असं आवाहन राजेश टोपेंनी राज्यातल्या जनतेला केलं आहे. 
याबाबत बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले, “राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली मात्र त्या तुलनेत मृत्युदर कमी आहे. पण जनतेनं काळजी घेणं आवश्यक आहे.” यासोबतच, “राज्यात बाधीत होणाऱ्या एकूण रुग्णांपैकी 85 टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यातील बहुतांश जणांना गृह विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे”, असंही राजेश टोपे म्हणाले.
दरम्यान, राजेश टोपेंनी नागरिकांना खबरदारीचं आवाहन केलं आहे. “संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार काम केले जात असून राज्यात करोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम आदी ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध घातले जात असून नागरिकांनीदेखील स्वयंशिस्तीने गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे या कोरोना प्रतिबंध नियमांचा वापर नागरिकांकडून झाल्यास रुग्णसंख्येला आळा घालू शकतो. त्यामुळे लॉकडाऊन टाळण्याकरिता निर्बंधांचे पालन करावे”, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती