लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी खासगी डॉक्टरांनी क्लिनिकमध्ये ओपीडी बंद ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. लोकांना इतर आजारांचाही सामना करावा लागू शकतो त्यामुळे खासगी डॉक्टरांनी ओपीडी बंद ठेऊ नयेत, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
करोनाच्या उद्रेकाच्या काळात इतर आरोग्य सेवा, तातडीची वैद्यकीय सेवा जनतेला मिळणे आवश्यक. त्यामुळे कोणीही ओपीडी अथवा इतर आरोग्य सेवा बंद ठेवू नयेत, आरोग्य खात्यामार्फत संबंधितांना आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, होम क्वारंटाइन असतानाही काही नागरिक घराबाहेर दिसत असल्याच्या तक्रारीही आरोग्य विभागाकडे आल्या आहेत. स्थानिक प्रशासनामार्फत जबाबदार अधिकाऱ्याकडे होम क्वारंटाईन व्यक्तींची यादी दिली जाणार आहे. तसेच विलगीकरण सूचनांचे या यादीतील प्रत्येकजण पालन करत असल्याची खातरजमा करण्यात येणा आहे. यासाठी निवासी सोसायटीच्या समित्यांचीही मदत घेण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.