गेल्या शनिवारपासून मुंबईतील लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे ही मोहीम दोन दिवस स्थगित केल्यानंतर पुन्हा मंगळवारपासून सुरू करण्यात आली. मात्र कोविन ॲपमधील गोंधळ, कर्मचाऱ्यांमध्ये भीती आदींमुळे दररोज चार हजार कर्मचाऱ्यांना लस देण्याची मोहीम फोल ठरत होती. त्यामुळे तीन दिवसांत केवळ पाच हजार २५१ कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले होते.
त्यामुळे लसीकरणाविषयीची कर्मचाऱ्यांमधील भीती घालवण्यासाठी पालिकेने समुपदेशन सुरू केले. त्याचबरोबर नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही केंद्रावर लस घेण्याची सूट देण्यात आली. याचे चांगले परिणाम चौथ्या दिवशी दिसून आले. शुक्रवारी ३८५२ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी बोलावण्यात आले होते. यापैकी तीन हजार ५३९ कर्मचाऱ्यांनी लस घेतली.