नागपूरमध्ये लॉकडाऊन ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आला, काय सुरू काय बंद जाणून घ्या

शनिवार, 20 मार्च 2021 (16:17 IST)
पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी माहिती दिली आहे की नागपूरमध्ये लावलेले (Nagpur Lockdown) लॉकडाऊन हे ३१ मार्चपर्यंत लागू करण्यात आले आहेत. आधी हे निर्बंध १५ ते २१ मार्चपुरता लावण्यात आले होते. मात्र नागपुरातील सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता, हे निर्बंध आता ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आले आहेत.
 
आज नागपुरातील सर्व लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली होती, त्यानंतर पालकमंत्री नितीन राऊत यांनी ३१ मार्चपर्यंतच्या निर्बंधाबाबत निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. मात्र निर्बंधांमुळे अर्थचक्राला कोणतीही बाधा येणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. 
 
नागपूरमध्ये काय सुरू, काय बंद? 
1. जिवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ४ पर्यंत खुली
२. भाजीपला दुपारी ४ वाजेपर्यंत मिळणार
३. हॉटेल, रेस्टॉरंट संध्याकाळी ७ पर्यंत खुले राहणार, ऑनलाईन पद्धतीने रात्री ११ पर्यंत डिलिव्हरीसाठी मुभा 
४. परीक्षा कोविड नियमांअतर्गत होतील 
५. शाळा आणि कॉलेज बंद राहणार
 
नागपूरमध्ये लॉकडाऊन लावल्यानंतरही कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली नाही. कालही नागपुरात ३ हजार २३५ नव्या रुग्णांची नोंद झाली. यात एकट्या नागपूर शहरात २ हजार ५२४ रुग्णांचा समावेश आहे, तर ग्रामीण भागात ७०८ रुग्णांचा समावेश आहे. मृतांचा आकडाही गंभीर आहे. नागपूरमध्ये काल ३५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा हाच वाढता प्रकोप नियंत्रणात आणण्यासाठी नागपुरातील निर्बंध ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती