कोविन अॅपवर नोंदणी न करता लस कशी घ्यायची? Co-Win, Aarogya Setu अॅप वापरून नोंदणी कशी करायची?
बुधवार, 2 जून 2021 (23:31 IST)
कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन लसीकरणावर भर देणं आवश्यक आहे. आता 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना ऑनलाईन नोंदणीशिवाय लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेता येणार आहे.
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, 18 ते 44 या वयोगटातील नागरिक नोंदणीशिवाय थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात.
तेथे पोचल्यानंतर त्यांची नोंदणी कोविन ॲपवर cowin.gov.in केली जाईल.
ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर काही लोक दिलेल्या दिवशी आणि वेळी अनुपस्थित राहतात. ग्रामीण भागात वीजपुरवठा, इंटरनेट यांचाही प्रश्न असतो. त्यामुळे कोव्हिन अॅपवर लशीसाठी नोंदणी करताना अडचण जाणवते. या सगळ्या गोष्टींचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे.
लोकांना जागेवर लस देण्याच्या सुविधेमुळं लस वाया जाण्याचं प्रमाण देखील कमी होईल.
मोबाईल नंबरवरून 4 जणांची अपॉईंटमेंट घेण्याची सुविधा सरकारनं दिली असली, तरी त्यानंतरही ज्या लोकांकडे इंटरनेट किंवा स्मार्टफोन नाही त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
अशा परिस्थितीत सरकारने आता 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांना जागेवर नोंदणी आणि लस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही सुविधा केवळ सरकारी कोव्हिड लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असेल.
सध्या ही सुविधा खासगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध होणार नाही. खासगी केंद्रांमध्ये लसीकरणासाठी अद्याप ऑनलाइन नोंदणीद्वारेच स्लॉट बुक करावे लागतील.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते-ते संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांवर अवलंबून आहे की, त्यांना हा निर्णय लागू करायचा आहे की नाही. ऑनलाईन नोंदणीची सुविधा राबविण्यासाठी आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्यांना जिल्हा प्रशासनाबरोबर काम करण्याचे आदेश दिले आहेत.
भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, 1 मे 2021 पासून 18 वर्षे वयाच्या वरील सर्वांचं लसीकरण सुरू झालं. अनेक राज्यांमध्ये लशींच्या उपलब्धतेनुसार 18-44 वयोगटाचं लसीकरण करण्यात येतंय.
दरम्यान ऑनलाईन नोंदणी करून लसीकरण सुरूच असून, ज्यांना शक्य आहे ते याद्वारे नोंदणी करून लस घेण्यासाठी बुकिंग करू शकतात.
लसीकरणासाठीची नोंदणी भारत सरकारच्या कोविन आणि आरोग्यसेतू अॅपवरून करता येत आहे. ही नोंदणी कशी करायची हे जाणून घेऊया.
महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, केरळ, सिक्कीम यासांरख्या राज्यांनी 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण मोफत करणार असल्याचं जाहीर केलंय.
16 जानेवारीपासून भारतात कोव्हिड 19साठीच्या लसीकरणाला सुरुवात झाली आणि 1 मार्चपासून 60 वर्षांवरील नागरिक आणि सहव्याधी असणारे 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येत होती. त्यानंतर 1 एप्रिलपासून देशातील 45 वर्षं वयाच्या पुढील सर्व व्यक्तींना कोव्हिडची लस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
नवीन नियमांनुसार राज्य सरकार आणि खासगी हॉस्पिटल्स आता लस उत्पादकांकडून थेट साठा विकत घेऊ शकतील, आणि यासाठीच्या किंमती लस उत्पादकांना आधीच जाहीर कराव्या लागतील.
सिरम इन्स्टिट्यूटने त्यांच्या कोव्हिशील्ड लसीचे दर जाहीर केले आहेत. उत्पादन करण्यात आलेल्या लशींचा 50 टक्के साठा केंद्र सरकारला पूर्वीच्याच 150 रुपये प्रति डोस दराने देण्यात येईल. तर उर्वरित 50 टक्के उत्पादनाची विक्री राज्य सरकारांना 300 रुपये आणि खासगी हॉस्पिटल्सना 600 रुपयांनी करण्यात येईल.
तर आपण आता पाहूया की, 18 वर्षांवरील लोकांना लस मिळवण्यासाठी काय करावं लागेल, कुठं नाव नोंदवावं लागेल?
लसीकरण मोहीमेसाठी भारत सरकारनं को-विन (Co-WIN) नावाचा डिजीटल प्लॅटफॉर्म विकसित केलाय. हा प्लॅटफॉर्म लसीकरण मोहीम राबवणारी यंत्रणा, लस देणारी आरोग्य सेवा आणि लस घेणाऱ्या व्यक्ती या सगळ्यांना वापरता येतो.
यासोबतच आरोग्य सेतू (Aarogya Setu) अॅपवरूनही तुम्हाला लशीसाठी नोंदणी करता येईल.
Co-Win वरून लशीसाठी नोंदणी कशी करायची?
कोविनच्या वेबसाईटवरून किंवा कोविन अॅपवरून लसीकरणासाठी नोंदणी करणं बंधनकारक आहे. जेणेकरून लसीकरण केंद्र, तारीख, वेळ इत्यादी माहिती तुम्हाला आधीच कळवलं जाईल.
नोंदणीसाठी https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवर जा.
वेबसाईट उघडल्यानंतर Register / Sign in yourself पर्यायावर क्लिक करा.
त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल आणि त्यावर OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर नवीन विंडो उघडेल.
त्यानंतर Register for Vaccination ची विंडो दिसेल. फोटो आयडी प्रूफ, फोटो आयडी नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग आणि सहव्याधी इत्यादी माहिती इथे तुम्हाला द्यावी लागेल. त्यानंतर Register पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दिसतील. एका मोबाईल नंबरच्या नोंदणीत तुम्हाला तीन जणांसाठी लसीकरणाची नोंद करता येऊ शकते. त्यासाठी Add या पर्यायावर क्लिक करून पुढील नावं आणि त्यांची माहिती समाविष्ट करता येईल. एखादं नाव डिलिट करण्याचाही पर्याय देण्यात आला आहे.
या अकाऊंट डिटेल्सच्या पानावरच युजर लसीकरणाची तारीख देऊ शकतात.
नंतर तुम्ही लसीकरण केंद्रासाठीही संपूर्ण माहिती भरू शकता. राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि पिन कोड अशी माहिती दिल्यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला लसीकरण केंद्रांची यादी दिसेल.
तुम्हाला जवळ असलेल्या केंद्रावर क्लिक केल्यानंतर उपलब्ध वेळ सांगितली जाईल. तिथे Book पर्यायावर क्लिक केल्यानंतर Appointment Confirmation चं पान उघडेल. तिथे Confirm करा.
तुम्हाला नोंदणी झाल्याचा संदेश स्क्रीनवर दिसेल. ते पान तुम्हाला डाऊनलोडही करता येईल.
आरोग्य सेतू (Aarogya Setu) वरून लशीसाठी नोंदणी कशी करायची?
सर्वात आधी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करा. हे अॅप सुरू केल्यानंतर होम पेजला उजव्या कोपऱ्यात कोविनसाठीचा लोगो आहे.
यामध्ये वॅक्सिन इन्फोर्मेशन म्हणजे लशींबद्दलची माहिती, वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण, वॅक्सिनेशन सर्टिफिकेट आणि वॅक्सिनेशन डॅशबोर्ड म्हणजे आकडेवारी असे पर्याय आहेत. यातल्या वॅक्सिनेशनवर क्लिक करा.
तुमचा मोबाईल नंबर टाकून क्लिक करा. OTP आल्यानंतर तो भरा.
यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव, लिंग, जन्म वर्ष, फोटो आयडीचे तपशील भरावे लागतील. एका मोबाईल नंबरवर 4 जणांची नोंदणी करता येईल.
यानंतर शेड्यूल अपॉइंटमेंट पर्यायावर क्लिक करून पिन कोड टाकून तुम्हाला लसीकरण केंद्र आणि उपलब्ध स्लॉट शोधता येईल. यामध्ये तुम्हाला मोफत लस देणारी केंद्र आणि पैसे भरून लस घेता येणारी केंद्र यातला पर्याय निवडता येईल.
स्लॉट बुक केल्यावर तुम्हाला त्याविषयीचा एसएमएस येईल.
नोंदणीसाठी कोणती कागदपत्रं लागतील?
नोंदणी करण्यासाठी फोटो असणारं ओळखपत्रं असणं आवश्यक असेल. स्वतःची नोंदणी करताना इलेक्ट्रॉनिक KYC साठी ओळखपत्रं स्कॅन करून जोडावं लागेल. यासाठी 12 ओळखपत्रांचा पर्याय देण्यात आलेला आहे.
ही कागदपत्रं वापरता येतील -
मतदार ओळखपत्र
आधार कार्ड
ड्रायव्हिंग लायसन्स
पॅन कार्ड
मनरेगा रोजगार कार्ड
बँक किंवा पोस्ट ऑफिसचं पासबुक
पासबुक
पेन्शनची कागदपत्रं
नोंदणी करताना जे ओळखपत्रं वापरण्यात आलेलं आहे, तेच ओळखपत्र लस घेण्यासाठी जाताना दाखवावं लागेल. त्यावेळी इतर ओळखपत्रं वापरता येणार नाहीत.
लस घेण्यासाठी या नोंदणी केल्यानंतर ही नोंदणी करणाऱ्याला SMS मार्फत तारीख, वेळ आणि लसीकरण केंद्राचा तपशील पुरवला जाईल.
प्रत्येक व्यक्तीला लशीचे दोन डोस घ्यावे लागणार असल्याने पहिला डोस घेतल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या डोससाठी स्लॉट बुक करावा लागेल.
लस घेतल्याचं सर्टिफिकेट कसं डाऊनलोड करायचं?
लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर त्या व्यक्तीला QR कोडच्या स्वरूपातलं सर्टिफिकेट दिलं जाईल.
हे सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या कोविन लॉगिनमध्येही पाहता येईल आणि तिथून डाऊनलोड करता येईल.
पहिला डोस घेतल्यानंतर या सर्टिफिकेटवर 'Partially Vaccinated' असा स्टेटस असेल आणि दुसरा डोस घेताना हे सर्टिफिकेट दाखवावं लागेल.
दोन्ही डोस झाल्यावर हा स्टेटस Fully Vaccinated असा दिसेल.