कोरोना व्हायरसचा 'डेल्टा प्लस' व्हेरियंट महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा?

मंगळवार, 22 जून 2021 (20:20 IST)
मयांक भागवत
कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असतानाच महाराष्ट्रात कोव्हिड-19 चा नवीन 'डेल्टा प्लस' व्हेरियंट आढळून आलाय.रोगप्रतिकारशक्तीला चकवा देणाऱ्या या व्हेरियंटची महाराष्ट्रात 21 रुग्णांना लागण झाली आहे.
 
डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे आरोग्य विभागही सतर्क झालाय. "या व्हेरियंटने ग्रस्त रुग्णांनी कुठे प्रवास केला. त्यांचं लसीकरण झालं होतं का, कोरोनाची पुन्हा लागण झाली होती का? ही माहिती गोळा केली जात असल्याचं," आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
 
कोरोना संसर्गाची दुसरी लाट झपाट्याने पसरण्यास 'डेल्टा' व्हेरियंट कारणीभूत ठरला होता. कोरोना व्हायरसमधील डबल म्युटेशन सर्वात आधी महाराष्ट्रात आढळून आलं होतं.
देशात कोव्हिड-19 ची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवण्यात येत असतानाच 'डेल्टा प्लस' व्हेरियंट महाराष्ट्रासाठी धोकादायक ठरू शकतो का? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.


महाराष्ट्रात कुठे आढळून आलाय 'डेल्टा प्लस' व्हेरियंट?
महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यात 'डेल्टा प्लस' व्हेरियंट आढळून आल्याची माहिती, आरोग्य विभागाने दिलीये.
 
रत्नागिरीत 'डेल्टा प्लस' व्हेरियंटचे सर्वात जास्त 9 रुग्ण
 
जळगावात 7 रुग्णांना 'डेल्टा प्लस' व्हेरियंटची लागण झाल्याची माहिती
 
मुंबईत 2 रुग्णांना 'डेल्टा प्लस'चा संसर्ग
 
पालघर, ठाणे, सिंधुदुर्गमध्ये 'डेल्टा प्लस' व्हेरियंटचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.
 
बीबीसीशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "'डेल्टा प्लस' व्हेरियंटने ग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू कऱण्यात आली आहे."
 
'डेल्टा प्लस' व्हेरियंटच्या तपासासाठी राज्यभरातून 7500 नमुने पाठवण्यात आले होते.
 
कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित सांगतात, "प्रत्येक 'Variant of Interest' हा धोक्याचा इशारा मानला पाहिजे."
 
 
'डेल्टा प्लस' व्हेरियंट कसा तयार झाला?
 
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ सांगतात, कोव्हिड-19 हा RNA व्हायरस आहे. त्यामुळे व्हारस म्युटेट होण्याची शक्यता खूप जास्त असते. "डेल्टा व्हेरियंटमध्ये आणखी म्युटेशन झाल्यामुळे, नवीन डेल्टा प्लस व्हेरियंट तयार झाला," असं डॉ. लीना गजभर म्हणतात.
 
'डेल्टा प्लस' व्हेरियंटमध्ये डेल्टा व्हेरियंटमध्ये असलेले सर्व म्युटेशन आहेत. त्यासोबत स्पाईक प्रोटीममध्ये झालेलं K417N म्युटेशनदेखील आढळून आलंय, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
 
भारतात सर्वात पहिल्यांदा आढळून आलेल्या 'डेल्टा व्हेरियंट'चं शास्त्रीय नाव B.1.617.2 आहे. त्यानंतर डेल्टा व्हेरियंटमध्ये हळूहळू बदल होत गेले. 'डेल्टा प्लस' व्हेरियंट'चं शास्त्रीय नाव B.1.617.2.1 असं आहे.
 
'डेल्टा प्लस' व्हेरियंट' कसा तयार झाला याची माहिती देताना, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल सांगतात, "कोरोना संसर्गाची दुसरी लाट अधिक झपाट्याने पसरण्यासाठी 'डेल्टा व्हेरियंट' कारणीभूत होता. यात आणखी एक म्युटेशन (बदल) झाल्याचं आढळून आलं. याला 'डेल्टा प्लस' किंवा 'AY.1' असं नाव देण्यात आलं."
 
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ पुढे सांगतात, "mRNA व्हायरसची संख्या वाढताना (replication) त्याच्या मूळ रूपात बदल होतो. ज्यामुळे विषाणूला नवीन रूप प्राप्त होतं. काहीवेळा म्युटेशन व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनमध्ये होतं."
 
केंद्राच्या माहितीनुसार, 'डेल्टा प्लस' व्हेरियंट सर्वात पहिल्यांदा युरोपमध्ये आढळून आला होता.
 
"आजाराच्या दृष्टीने व्हायरसचं म्युटेशन कुठे झालं हे फार महत्त्वाचं आहे. स्पाईक प्रोटीनच्या मदतीने व्हायरस शरीरातील पेशींना चिकटतो. त्यामुळे व्हायरसमध्ये झालेला बदल आपल्यासाठी प्रतिकूल ठरू शकतो. त्यामुळे म्युटेशन झालेले व्हेरियंट चिंतेचा विषय असतो, " असं डॉ. पॉल पुढे म्हणतात.
 
डेल्टा व्हेरियंट महाराष्ट्रासाठी धोकादायक?
देशात डबल म्युटंट महाराष्ट्रातूनच पसरला. त्यामुळे, डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण राज्यात आढळून आल्याने, चिंता अधिक वाढली आहे.
 
संशोधकांच्या मते, डेल्टा व्हेरियंट "Variant of Interest" आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर या व्हेरियंटकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं पहिजे.
 
देशात कोरोनासंसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यात, डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळून येणं हा धोक्याचा इशारा आहे का? यावर डॉ. राहुल पंडीत म्हणतात, "प्रत्येक "Variant of Interest" हा धोक्याचा इशारा मानला पाहिजे."
 
"कोरोनाव्हायरसचा हा व्हेरियंट किती संसर्गजन्य आहे.रुग्णांना झालेला संसर्ग तीव्र आहे का. यावर अभ्यास होणं गरजेचं आहे."
 
तर,IGIBचे प्रमुख डॉ. अग्रवाल म्हणाले, "हा व्हेरियंट राज्यात मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचा पुरावा मिळालेला नाही. यावर संशोधन सुरू आहे." तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार,कोव्हिडचा हा नवीन व्हेरियंट किती धोकादायक आहे. हे आपल्याला पुढील काही दिवसात समजून येईल.
 
लस डेल्टा प्लस व्हेरियंटवर प्रभावी ठरेल?
डेल्टा प्लस हा डेल्टा व्हेरियंटमधून तयार झालाय. मग, कोव्हिडविरोधी लस यावर प्रभावी ठरेल? याबाबत संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. इश्वर गिलाडा यांच्याशी चर्चा केली.
 
ते म्हणतात, "डेल्टा व्हेरियंट लस घेतल्यानंतर तयार झालेल्या रोगप्रतिकारशक्तीला चकवा देतो हे सिद्ध झालंय. त्यामुळे, डेल्टा प्लसही रोगप्रतिकारशक्तीला चकवा देण्याची (immune escape) शक्यता नाकारता येणार नाही."
 
आरोग्य सचिव राजेश भूषण याबद्दल म्हणाले, "कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सीन डेल्टा व्हेरियंटवर प्रभावी आहेत. डेल्टा प्लसचा लशीवर परिणाम होतो का याबाबत 3-4 दिवसात माहिती दिली जाईल."
 
'डेल्टा प्लस' व्हेरियंटपासून धोका आहे?
कोरोना संसर्गाची दुसरी लाट अधिक संसर्गजन्य डेल्टा व्हेरियंटमुळे पसरली होती. डॉ. लीना गजभर सांगतात, "संशोधकांच्या माहितीनुसार, 'डेल्टा प्लस' व्हेरियंटची संसर्ग पसरवण्याची क्षमता पहिल्यापेक्षा अधिक वाढलीये."
 
'डेल्टा प्लस' व्हेरियंटबद्दल बीबीसीशी बोलताना इंन्स्टिट्युट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेडेट बायोलॉजीचे (IGIB) प्रमुख डॉ. अनुराग अग्रवाल म्हणाले, "डेल्टा प्लस व्हेरियंट चिंता करण्यासारखा नक्कीच आहे. त्यामुळे, याकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं पहिजे. सध्या तरी हा व्हेरियंट डेल्टापेक्षा वेगळा असेल असं मानण्यासाठी काही ठोस कारण नाही."
 
तज्ज्ञांच्या माहितीनुसार डेल्टा व्हेरियंटप्रमाणेच डेल्टा प्लस रोगप्रतिकारशक्तीला चकवणारा आहे. इंडिया टुडेशी बोलताना व्हायरोलॉजिस्ट प्रो. डॉ. शाहिद जमील म्हणतात, "कोरोनाविरोधी लस आणि संसर्गामुळे निर्माण झालेली रोगप्रतिकारशक्ती दोघांनाही चकवण्याची क्षमता 'डेल्टा प्लस' असण्याची शक्यता आहे."
 
कोरोनासंक्रमित रुग्णांवर उपचारासाठी अँटीबॉडी कॉकटेलला आपात्कालीन वापराची मंजूरी देण्यात आली आहे. मुंबई, दिल्लीतील काही रुग्णांवर अँटीबॉडी कॉकटेल देऊन उपचार करण्यात आले आहेत. पण, संशोधकांना भीती आहे की, डेल्टा प्लस व्हेरियंट अँटीबॉडी कॉकटेलवर प्रभावी ठरणार नाही.
 
यावर डॉ. पंडीत म्हणतात, "मोनोक्लोनल अॅन्टीबॉडी डेल्टा व्हेरियंटवर प्रभावी ठरणार नाही असा दावा केला जातोय. पण, अॅन्टीबॉडीज कॉकटेलच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. त्यामुळे नव्या व्हेरियंटवर त्या प्रभावी ठरल्या पाहिजेत."
 
'डेल्टा प्लस' व्हेरियंटबाबत केंद्राची भूमिका काय?
केंद्र सरकारच्या माहितीनुसार, 'डेल्टा प्लस' व्हेरियंट अजूनही "Variant of Concern" म्हणजेच चिंता करण्यासारखा मानण्यात आलेला नाही.
 
निती आयोगाचे डॉ. पॉल म्हणतात, "कोरोना व्हायरसच्या या नवीन व्हेरियंटवर लक्ष ठेवावं लागेल. शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करावा लागेल. विषाणूमध्ये होणारे बदल थांबवता येणार नाहीत. त्यामुळे यांच्यात होणारे बदल आणि उपाययोजना यावर लक्ष केंद्रीत करावं लागेल."
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी (22 जून) डेल्टा प्लस व्हेरियंटबाबत माहिती दिली. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटलं, "डेल्टा प्लस व्हेरियंटबाबत काय उपाययोजना करायच्या याबाबत केंद्राने महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि केरळला पत्र लिहिलंय."
 
जगभरात आढळून आलेली डेल्टा प्लस व्हेरियंटची प्रकरणं
युकेतील आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत जगभरातील 10 देशांमध्ये डेल्टा प्ल्स व्हेरियंटची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. यात भारत, अमेरिका, युके, कॅनडा, जर्मनी, रशिया, जपानसारख्या देशांचा समावेश आहे.
 
इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेडेट बायोलॉजीचे (IGIB) शास्त्रज्ञ विनोद स्कारिया यांनी ट्विटवर दिलेल्या माहितीनुसार, आतार्यंत जिनोम सिक्वेंन्सिंग करण्यात आलेले डेल्टा प्लस व्हेरियंटचे नमुने युरोप, आशिया आणि अमेरिकेतील आहेत.
 
युकेमध्ये डेल्टा प्ल्स व्हेरियंटचे 36 रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे. यातील दोन रुग्णांचे नमुने लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवसांनी घेण्यात आले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती